व्यायाम करताना मुंबई व ठाण्यामध्ये दोन वर्षांत शंभरहून अधिक मृत्यू
सिटी बेल ∆ आरोग्य प्रतिनिधी ∆
दोनच दिवसापूर्वी सिद्धार्थ सूर्यवंशी (वय ४६) यांचा व्यायाम करताना जिममध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला तसेच गेल्यावर्षी कर्नाटकातील कन्नड चित्रपटांचा सुपरस्टार पुनीथ राजकुमार यांचेहि जिममध्ये असताना हृदयविकाराने निधन झाले. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी ते जिममध्ये व्यायाम करीत होते भारताचे माजी कर्णधार व यशस्वी क्रिकेटपटू सौरभ गांगुली यांना हृदयविकाराचा झटका आला होता. प्रसिद्ध सिनेकलाकार सिद्धार्थ शुक्ला याचंही वयाच्या चाळीसाव्या वर्षी निधन झाले होते. ऐन चाळीशीमध्ये हृदयविकार वाढण्याचे प्रमाण भारतामध्ये वाढत असून अतिरिक्त व्यायाम व डायट फूड कोठेतरी कारणीभूत ठरत आहे. उत्तम प्रकृती असलेल्या या लोकप्रिय कलाकाराची वयाच्या ४६ व्या वर्षी एक्सिस्ट हि नक्कीच दुःखदायक आहे , म्हणूच चाळीशी पार केल्यानंतर जिम अथवा कार्डिओ ट्रैनिंग घेणाऱ्यांनी शारीरिक तपासणी करणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
हृदयाचे ठोके जोपर्यंत चालू असतात, तोपर्यंत माणूस जिवंत असतो. मग या इतक्या महत्त्वाच्या अवयवाची आपण नीट काळजी घ्यायलाच हवी. याविषयी अधिक माहिती देताना नेरुळ येथील शुश्रूषा हार्ट केयर व स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदय शल्यविशारद डॉ. संजय तारळेकर म्हणाले, ” मॉडेल सिद्धार्थ अथवा पुनीथ राजकुमारला व्यायाम करताना हृद्यविकाराचा झटका येणे हि काही पहिली घटना नाही, यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. अनेकवेळा तर मॅरॅथॉन स्पर्धेत युवा स्पर्धकांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. जर आपण या यशस्वी कलाकारांचे उदाहरण घेतल्यास ते शरीराने तंदुरुस्त होते तसेच त्यांचा आहार चांगल्या प्रतीचा होता परंतु अचानक कोणतीही लक्षणे नसताना त्याना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. यामध्ये सेलेब्रिटीच नाही तर अनेक सामान्य नागरिक सुद्धा अशा हृदयविकाराला बळी पडले आहेत म्ह्णूचच हृदयाची तंदुरुस्ती फारच महत्वाची आहे. हृदय संपूर्ण शरीरात तसेच स्वतःमध्ये रक्त वाहून नेते. यासाठी हृदयात ३ कोरोनरी धमन्या असतात, जेव्हा यापैकी कोणत्याही किंवा तीन धमन्यांना ७५% पेक्षा जास्त रक्त पुरवठा अचानक कमी होतो, तेव्हा त्याला हृदयविकाराचा झटका म्हणतात. याचा अर्थ असा की रक्तात ऑक्सिजनची मागणी आणि पुरवठा यांच्यात किंवा अप्रत्यक्षपणे विसंगती असल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. झटका येण्यामध्ये अनेक कारणे आहेत यामध्ये अति धूम्रपान, मद्यपान, झोपेचा अभाव, मानसिक ताणतणाव, आधुनिक डायट पद्धती, शरीर डौलदार दिसण्यासाठी प्रोटीन व स्टिरॉईडचे अतिसेवन कारणीभूत आहेत. कधीकधी चोर पावलांनी मधुमेह – उच्च रक्तदाब यांचा शरीरात प्रवेश झालेला असतो परंतु याची कल्पना आपल्याला नसते परंतु हे शत्रू तुमचे हृदय पोखरयाला सुरुवात करतात. तुमचे हृदय हे तुम्हाला संकेत देत असते. निद्रानाश, श्वास घेण्यास अडचण, आंबट ढेकर, हाता – पायांना सूज येणेअशी लक्षणे आढळल्यास त्वरित शारीरिक तपासणी करणे गरजेचे आहे. व्यायामाला जाण्यापूर्वी आपले हृदय कुमकुवत तर नाही ना याची तपासणी करणे गरजेचे आहे.”
“डौलदार शरीर कोणाला आवडत नाही ?? परंतु या डौलदार शरीराचा मुख्य दुवा हे तुमचे हृदय असते याचाच विसर पडत आहे. एखादा रियालिटीशो अथवा मालिका बघितल्यावर त्यातील सिक्स पॅक असलेल्या हिरोसारखे आपण पण दिसले पाहिजे या भावनेतून अनेकजण जिममध्ये ऍडमिशन घेतात परंतु आपल्या शरीराची किती झीज झाली आहे, आपल्या सांध्याचे तसेच हृदयाचे आरोग्य कसे आहे याची चाचपणी करीत नाही, तसेच तुमचा स्वभाव, तुमचा आहार, रोजची दिनचर्या याचा परिणाम आपल्या हृदयावर होत असतो म्हणूनच हृदयाला तुम्ही मनावर घेणे गरजेचे आहे. जिमला जाण्यापूर्वी रात्री शांत आणि पुरेशी झोप आवश्यक असते तसेच आहार व जिम करण्यामध्ये कमीत कमी एका तासाचे अंतर हवे. आपल्याला झेपत असेल तेवढाच व्यायाम करावा. त्वरित रिझल्टसाठी अति व्यायाम टाळावा, व्यायाम सुरू करण्यापूर्वी पाणी प्या. जिममध्ये व्यायाम सुरू करण्याच्या अर्ध्या तासाआधी कमीत कमी ५०० एमएल पाणी पिणं गरजेचं आहे. म्हणजे पोटभर पाणी पिऊन जाऊ नका,” अशी माहिती तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरचे हृदयविकारतज्ञ डॉ. तमिरुद्दीन दानवडे यांनी दिली.
Be First to Comment