Press "Enter" to skip to content

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर भारतात प्री डायबेटिज रुग्णांमध्ये वाढ

भारतामध्ये तीन दशकात मधुमेही रुग्णांमध्ये १५० टक्क्यांनी वाढ

सिटी बेल ∆ आरोग्य प्रतिनिधी ∆

भारतामध्ये कोरोनाची महामारी आल्यानंतर शारीरिक व मानसिक समस्या वाढल्या असल्याचे निदेर्शनास आले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार मधुमेह रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. गेल्या तीन दशकात भारतामध्ये मधुमेही रुग्णांमध्ये १५० टक्क्याची वाढ झाली असून आता भारत हि मधुमेहाची राजधानी नाही तर मधुमेह युक्त भारत अशी नवीन ओळख मिळत आहे. सध्या भारत हे जगातील दुसऱ्या क्रमांकावर प्रौढ मधुमेह असणारा देश असून चीन पहिल्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये २५ ते ३४ वयोगटातील शहरी व ग्रामीण भागात टाईप २ मधुमेहाचे रुग्ण आढळून येत आहे. प्रत्येकाने डायबिटीजबद्दल ऐकले असेल, परंतु आपल्याला प्री डायबिटीजबद्दल माहिती आहे का ? जर नसेल तर प्रत्येकासाठी हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

याविषयी अधिक माहिती देताना मुलुंड येथिल अपेक्स हॉस्पिटलचे मधुमेह तज्ज्ञ तसेच एमडी इंटर्नल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. हार्दिक ठक्कर म्हणाले , आपल्याला मधुमेह झाला हे कळल्यावर रुग्ण आपली स्वतःची काळजी घेतो परंतु ज्या नागरिकांना प्री-डायबिटीज आहे ते बेफिकीरपणे आयुष्य जगत असतात प्री-डायबिटीज ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण जास्त होते. मात्र, प्री-डायबिटीज असलेल्या लोकांना मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो. मधुमेह आणि प्री-डायबिटीज हे दोन्ही वेगळे आहे. मधुमेहामुळे हृदयविकाराचा झटका आणि मूत्रपिंडाच्या समस्या निर्माण होतात. प्री-डायबिटीजमुळे हृदयाचा झटका, स्ट्रोक आणि किडनीच्या समस्या यासारख्या गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात. प्री-डायबेटिसमध्ये रूग्णांनी हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी दर आठवड्याला किमान १५० मिनिटे निरोगी आहार आणि नियमित व्यायाम करायलाच हवा.

प्री-डायबिटीजच्या समस्येने त्रस्त असलेल्या व्यक्तींवर योग्य वेळी उपचार न केल्यास मधुमेहाचा धोका अनेक पटींनी वाढतो. एका अभ्यासानुसार, प्री-डायबिटीज असलेल्या लोकांना केवळ एका वर्षात मधुमेह होण्याचा धोका १० टक्के असतो. तर आयुष्यभर मधुमेह होण्याचा धोका ७० टक्क्यांपर्यंत असतो.

प्री-डायबिटीजवर योग्य वेळी उपचार सुरू केले तर मधुमेहाची समस्या सहज टाळता येते. जे निरोगी जीवनशैलीचा अवलंब करतात, त्यांची ही समस्या आपोआप संपुष्टात येऊ शकते.” भारतामध्ये मधुमेह रुग्ण वाढत असताना प्री-डायबिटीज हि समस्या मूळ धरू लागली आहे. त्यामुळे जर आपण लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल या समस्येने त्रस्त असाल तर वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्यावी जेणेकरून मधुमेहाचा धोका टाळता येईल अशी माहिती मधुमेह तज्ज्ञ तसेच एमडी इंटर्नल मेडिसिन डॉ. हार्दिक ठक्कर यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.