गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या भावाने केला सरळमार्गी भावावरती प्राणघातक हल्ला
वावंजे हद्दीतील धक्कादायक घटना
सिटी बेल ∆ तळोजा ∆
वावंजे ग्रामपंचायत हद्दीमध्ये राहणारे जलाल शेख यांच्यावर त्यांच्याच गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या भावाने प्राणघातक हल्ला केल्यामुळे ते पनवेलच्या गांधी हॉस्पिटल मधील अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.
जलाल शेख यांची पोलिसांनी जबानी घेतलेली असून हल्लेखोर जाफर शेख याचा पनवेल तालुका पोलीस शोध घेत आहेत. व्यवसायाने बांधकाम कॉन्ट्रॅक्टर असणारे 44 वर्षांचे जलाल शेख यांना गुन्हेगारी पार्श्वभूमीचा त्यांचा भाऊ जाफर शेख हा वारंवार त्रास देत असल्याचे सूत्रांकडून समजते.
याबाबत सविस्तर हकीकत अशी, जाफर शेख या इसमावर फसवणुकीसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून तो तडीपार आहे. नुकताच महावितरण कंपनीने देखील त्याच्यावरती गुन्हा नोंदविला असून त्या प्रकरणात तो फरार आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या जाफर शेख याची तीन लग्न झालेली असल्याचे सूत्रांकडून समजते. त्याची पहिली पत्नी व तिच्यापासून झालेले आपत्य युसुफ जाफर शेख हे वावंजे येथे वास्तव्यास असतात. त्यांना राहत्या घरातून हुसकावण्यासाठी जाफर शेख वारंवार येऊन भांडणे उकरून काढत असे. परंतु शेजारी राहणारे सरळ मार्गी बंधू जलाल शेख हे प्रत्येक वेळेला येऊन ही भांडणे सोडवत असत.
या साऱ्या पार्श्वभूमीवर जलाल शेख याच्याबद्दल मनात आढी ठेवून 14 ऑक्टोबर रोजी जाफर शेख याने कुटुंबातील कित्येक सदस्यांना लवकरच याच्यावर प्राणघातक हल्ला करीन अशा स्वरूपाचा संदेश पाठविला. दुसऱ्याच दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबरला जाफर शेख हा बदलापूर येथून सोबत एक स्त्री व अन्य दोन पुरुष यांना घेऊन आला आणि जलाल याच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करू लागला.
त्यावेळी जलाल शेख हे घरामध्ये नव्हते, जाफर शेख सोबत माणसे घेऊन शिवीगाळ करत असल्याचे समजताच त्यांनी तडक वावंजे बीट चौकी वरती कार्यरत असणाऱ्या अंधारे मॅडम यांना या प्रकरणाबाबत अवगत केले. तुम्ही पुढे व्हा मी लगोलग येतेच असे अंधारे मॅडम म्हणाल्या व जलाल शेख घराच्या दिशेने रवाना झाले. ते पोहोचताच जाफर शेख याने जलाल यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला.
आपल्या काकांवरती हल्ला होत असल्याचे पाहिल्यानंतर युसुफ जाफर शेख हा त्यांच्या बचावा करता मध्ये पडला. या झटापटीत जाफर शेख याच्यासोबत आलेल्या रुकसाना शेख हिने तिच्या जवळील चाकू जलाल शेख यांच्या पोटात खुपसला. युसुफ जाफर शेख याला देखील जबर मार लागला असल्याचे समजते.
प्रचंड रक्तप्रवाह होत असलेल्या परिस्थितीमध्ये जलाल शेख यांना पनवेल येथील डॉ.प्रमोद गांधी यांच्या गांधी एक्सीडेंटल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. पनवेल तालुका पोलीस स्थानकाने तात्काळ कारवाई करत जलाल शेख यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. पुढील कारवाई पनवेल तालुका पोलीस करत आहेत.
Be First to Comment