Press "Enter" to skip to content

जागतिक अंडी दिवस-१४ ऑक्टोबर

कोरोना महामारीनंतर अंड्याच्या विक्रीत ४० टक्के वाढ – मुंबईकर दरदिवशी फस्त  करतात ८० लाख अंडी

सिटी बेल ∆ आरोग्य प्रतिनिधी ∆ 

गल्ली ते दिल्लीपर्यंत मिळणारा प्रोटीनचा हमखास डोस  म्हणजे अंडे असून उद्या संपूर्ण जगभरात जागतिक अंडी दिन साजरा होणार आहे.  कोरोना जागतिक महामारीने अनेकांच्या आयुष्यात अनेक बदल झाले, यासोबतच अनेकांच्या आहारात सुद्धा खास बदल झाल्याचे दिसून आले आहेत.

चेंबूर येथे राहणारे कृष्ण विटावे हे पूर्णतः शाकाहारी होते परंतु जेंव्हा त्याना कोरोना झाला व  १४ दिवसांसाठी त्याला विलगीकरण कक्षात ठेवले होते त्यावेळी रोजच्या जेवणात प्रोटीनची गरज म्हणून  त्याना दोन अंडी देण्यात येत होती व ते न कंटाळता अंडी खात होते . कोरोना महामारीनंतर सुद्धा त्यांच्या आहारात अंड्यांचा समावेश झाला आहे. प्रत्येक वर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या शुक्रवारी अंड्याची शक्ती साजरी करण्यासाठी जागतिक अंडी दिवस साजरा केला जातो.

पृथ्वीवरील सर्वात पौष्टिक अन्नांपैकी, एक अंडे १३ आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे आणि ६  ग्रॅम प्रथिने प्रदान करण्याचा दावा अमेरिकेतील  इंटरनॅशन एग कमिशन ही  संस्था करते  त्यामुळे अंडी हा एक सर्व वयोगटातील लोकांच्या  परिपूर्ण आहार झाला असून एक सर्वसामान्याना परवडणारे आरोग्यदायी अन्न अशी मान्यता प्राप्त झाली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना बोरिवली येथील अपेक्स हॉस्पिटल समूहाच्या  पोषणतज्ञ सल्लागार आणि क्लिनिकल आहारतज्ञ मृणाली द्विवेदी सांगतात , ” जगात अंडी हा सर्वात लोकप्रिय नाश्ता मानला जातो. शरीर सुदृढ राहण्यासाठी आवश्यक असणारी अनेक जीवनसत्त्वे अंड्यातून मिळतात. अंड्यामध्ये फोलेट म्हणजेच अ, ब १२ ब ५ आणि ब २ ही जीवनसत्त्वे असतात. याबरोबरच फॉस्फरस,सेलेनियम,कॅल्शियम, ओमेगा ३ आणि इतर अनेक महत्त्वाचे घटक असतात. त्यामुळे तंदुरुस्तीसाठी दररोज एक अंडे खाणे अतिशय आवश्यक आहे. अंडी केवळ आरोग्यदायी अन्नच नाही तर केस आणि त्वचा नैसर्गिकरित्या निरोगी बनण्यासाठी औषधाची भूमिका देखील बजावते. केस आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी लोक घरगुती उपायांमध्ये अंड्यांचा वापर करतात. शालेय विद्यार्थ्यांमध्ये असलेले कुपोषण कमी करण्यासाठी देशभरातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश केला असून मुंबईतील अनेक शाळांमध्ये सरकारतर्फे शालेय विद्यार्थ्यांना अंडी दिली जातात.

कोरोना महामारीनंतर अंड्याच्या सेवनात ३० ते ४० टक्के वाढ झाली असल्याचे निरीक्षण अनेक संस्थांतर्फे करण्यात आले आहे. शहरी भागात ४० टक्के कुटुंबे अंड्यांचे सेवन करतात तर ग्रामीण भागात हे प्रमाण ६० टक्के आहे.”

२०२० मध्ये भारतामध्ये १५ हजार करोड अंड्याचे उत्पादन झाले होते हेच उत्पादन २०१८ साली १० हजार करोड होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अंड्यांच्या मागणीत वाढ झाल्याचे महाराष्ट्रातील अंडी  विक्रेत्यांनी सांगितले. चेन्नई शहरात  दरदिवशी ५५ लाख अंडी खाल्ली जातात तर मुंबईत हि संख्या ८० लाखापेक्षा अधिक आहे. बहुतेकांना अंड्याचे फायदे माहित आहे, परंतु प्रत्येक व्यक्तीने अंड्याच्या सेवनास प्राधान्य दिले पाहिजे आणि शरीराला ऊर्जा कशी दिली पाहिजे, त्या उद्देशाने दरवर्षी ऑक्टोबरचा दुसरा आठवडा जागतिक अंडी दिन म्हणून साजरा केला जातो.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.