आंबेनळी घाटातील गोवंश वाहतुकीबाबत महाबळेश्वर पोलीसांकडून गुन्हा दाखल
सिटी बेल ∆ पोलादपूर ∆ शैलेश पालकर ∆
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पोलादपूर दिशेने महाबळेश्वरकडे जाणाऱ्या वाहनातून सुरू असलेली गोवंश वाहतूक रोखण्यात गोरक्षक श्रीशिवप्रतिष्ठान महाबळेश्वर शाखा आणि बजरंगदलासह समाजसेवी कार्यकर्त्यांना यश आले असून याप्रकरणी महाबळेश्वर पोलीसांनी गुन्हा दाखल करून पोलादपूर पोलीसांकडे सदर प्रकरण पुढील तपासासाठी वर्ग केले आहे.
पुणे जिल्हयातील भोसरी येथील आळंदीरोड येथून बजरंग दलाचे मानद पशु कल्याण अधिकारी निलेश चासकर यांनी मोबाईलद्वारे कुंभरोशी येथील बांधकाम सुपरव्हायझर अक्षय सपकाळ यांना खबर दिल्यानुसार शुक्रवार, दि.16 सप्टेंबर 2022 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास आंबेनळी घाटातून गोवंश जातीचे बैल पिकअपमधून वाहतूक होणार असल्याने अक्षय सपकाळ यांनी प्रतापगड वाडाकुंभरोशी येथे पाळत ठेवली असता एक पिकअप काही वेळापूर्वीच महाबळेश्वरला गेल्याची माहिती मिळाली. याचवेळी महाबळेश्वरच्या महाडनाक्यावर एका पिकअपमध्ये 4 बैलांची वाहतुक होत असताना हटके असताना पिकअपमधून चार बैल हस्तगत करण्यात आले.
यावेळी पिकअपचा क्लिनर पळून गेला आणि ड्रायव्हरने अजून तीन पिकअपमधून जनावरे येत असल्याची माहिती निलेश चासकर यांनी दिली. त्यामुळे अक्षय सपकाळ आणि साथीदारांनी पाळत ठेवली असता दोन पिकअप त्यांच्यासमोरून महाबळेश्वरच्या दिशेने गेल्याने ही बाब त्यांनी बजरंग दलाचे मानद पशु कल्याण अधिकारी निलेश चासकर यांना दिल्यानंतर सपकाळ यांनी पिकअपचा पाठलाग केला. मात्र, अचानक दोन्ही पिकअप महाबळेश्वरकडे न जाता पुन्हा परत पोलादपूर दिशेला निघाल्याने सपकाळ यांनी पिकअपला थांबविण्याचा इशारा केला. मात्र, दोन्ही पिकअप न थांबता पोलादपूरच्या दिशेने निघाल्यामुळे सपकाळ आणि सहकाऱ्यांनी पिकअपचा पाठलाग केला.
दरम्यान, पिकअप गाडयांना ओव्हरटेक करून महाबळेश्वरकडे गेलेल्या स्कॉर्पिओ (क्र.एमएच06 बीएम 6313)च्या चालकाने पुन्हा स्कॉर्पिओ पोलादपूरच्या दिशेने आणून सपकाळ यांच्यासोबत पिकअपचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सहा जणांना अंगावर टायर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तुषार मनोहर मोरे, अक्षय मनोहर सपकाळ, ॠषिकेश सुनील सपकाळ, अविष्कार अनिल केळगणे, रोहित पांडूरंग सालेकर, निलेश हरी सपकाळ सर्व रा.कुंभरोशी ता.महाबळेश्वर, जि.सातारा यांना शरीराला दुखापती आणि जखमा झाल्या. अक्षय सपकाळ यांची रस्त्याबाहेर उभी असलेली मोटारसायकल (क्र.एमएच11सीयु 7124) ही स्कॉर्पिओच्या धडकेमुळे नुकसानग्रस्त झाली आहे.
या प्रकाराबाबत बजरंग दलाचे निलेश चासकर यांच्या कानावर माहिती घालून या तरूणांनी चासकर यांच्यासोबत जाऊन पोलादपूर पोलीस ठाण्यात सर्व प्रकारची माहिती सांगितली. मात्र, याप्रकरणातील पहिला पिकअप महाबळेश्वर महाडनाका येथे पकडल्याने पोलादपूर येथून सर्वजण महाबळेश्वर येथे गेले आणि तक्रार दिली.
यावेळी उर्वरित दोन पिकअप पोलादपूर हद्दीत पकडल्याने तसेच स्कॉपिओने धडक देण्याची घटना घडल्याने पुन्हा पोलादपूर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देणे शक्य नसल्याने ही तक्रार महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. सदरचे प्रकरण आता पोलादपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्याचे आता पोलादपूर पोलीसांकडून संबंधित गोवंश वाहतुक करणाऱ्यांची कसून चौकशी केली जाण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
Be First to Comment