Press "Enter" to skip to content

१२५ जणांनी घेतला लाभ

डॉक्टर भोईर क्लिनिक व तेरणा हॉस्पिटलच्या वतीने शिहू येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न

सिटी बेल ∆ नागोठणे ∆ महेश पवार ∆

जिल्ह्य़ातील शिहू परिसरातील नावाजलेले डॉक्टर व सामाजिक कार्यकर्ते डॉ. पुरुषोत्तम भोईर यांचे भोईर क्लिनिक व तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर नेरुळ, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी आयोजित केलेले मोफत आरोग्य शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. या आरोग्य शिबिराला शिहू परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.

समाजातील गोरगरीब, आदिवासी जनतेकडे पैसा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना आपली नियमित आरोग्य तपासणी करता येत नाही. अशा घटकांसाठी डॉक्टर भोईर क्लिनिक दरवर्षीच असे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करून समाजातील वंचित घटकांना त्याचा फायदा व्हावा म्हणून काम करत आहे.

या वर्षी या शिबिरात शिहू परिसरातील जवळपास १२५ गरजू व्यक्तींनी डाॅ. अजित निळे, डाॅ. प्रविण शितोळे, डाॅ. गरूडे व सक्षम मेडिकल स्टाफ यांच्या उपस्थितीत आपली मोफत तपासणी करून घेतली.

कामगार नेते उध्दव कुथे यांनी आपल्या भाषणात डाॅ. भोईर यांच्यासह सर्व मेडिकल स्टाफचे त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल कौतुक करत डॉक्टर भोईर यांनी कोरोना काळात परिसराला दिलेल्या अविरत सेवेबद्दल ऋण व्यक्त करून आभार मानले.

रायगड जिल्हा भाजपा शिक्षक सेलचे अध्यक्ष हिरामण कोकाटे यांनीही डॉक्टर भोईर यांच्या प्रयत्नातून आरोग्यपूर्ण समाज निर्माण होईल असा आशावाद व्यक्त करून त्यांच्या या सामाजिक प्रयत्नांना आमची कायमच सकारात्मक साथ असेल अशी ग्वाही दिली.

यावेळेस व्यासपीठावर कामगार नेते उध्दव कुथे व गणपत खाडे, शिक्षक नेते हिरामण कोकाटे, सरपंच मधू पारधी, के. के. कुथे, माजी सरपंच एन. जी. पाटील, दामोदर भोईर, भास्कर म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ शेळके, डॉ सुनील पाटील, रोहा तालुका मेडिकल अससोसिएशनचे अध्यक्ष डॉ. धात्रक राजेंद्र यांनी शिबिराला भेट देऊन शिबिराचे कौतुक केले. डॉक्टर प्रिया भोईर, डॉ अभिषेक शहासने, डाॅ. पुरुषोत्तम भोईर, डाॅ. किरण सत्वे, यांच्यासह ज्योती, कांचन, आकाश, सूरज व चंद्रकला या मेडिकल स्टाफने शिबिर यशस्वी होण्याकरिता अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विजय पाटील यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.