हजारोंचे नुकसान: सुदैवाने जीवितहानी नाही
# सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे दि.(धम्मशिल सावंत)#
सुधागड तालुक्यातील उद्धर येथील प्रयोगशील तरुण शेतकरी तुषार केळकर यांचा कार्वी प्रकल्प सततच्या पावसामुळे सोमवारी कोसळला आहे. यावेळी तेथे कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र त्यांचे 40 हजारांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. निसर्ग चक्री वादळाने साऱ्यांचे मोठे नुकसान केले होते, अनेकांचे प्रकल्प देखील यात मोडून पडलेत.
इको टुरिझम व प्रयोगशील शेती बरोबरच तुषार केळकर हे इको आर्किटेक्त व सर्पमित्र देखील आहेत. आत्तापर्यंत त्यांच्याकडे 32 हुन अधिक देशांचे 200 नागरिकांनी भेट देऊन विविध उपक्रमात सहभाग घेतला आहे. मागील 2-3 दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने जमीन ओली झाली, खांबांवर कौलांचे वजन आले आणि केळकर यांचा कार्वी प्रकल्प कोसळला. तसेच कार्वीचा वापर राहण्यासाठी व वस्तू ठेवण्यासाठी देखील केला जात होता. या खाली असलेल्या सर्व वस्तूंचे नुकसान झाले आहे. सुदैवाने पत्नी तेथून बाहेर असल्याने बचावली. मागील साडेतीन महिन्यापासून असलेले लॉकडाऊन यामुळे पर्यटक नाहीत. आणि आता या झालेल्या नुकसानीमुळे केळकर मोठ्या आर्थिक गर्तेत सापडले आहेत. शासनाने याबाबत मदत किंवा नुकसान भरपाई करावी अशी मागणी केळकर यांनी केली आहे.
Be First to Comment