लायक नसणाऱ्यांवर गरजेपेक्षा अधिक विश्वास ठेवला हीच चूक : युवा सेनाध्यक्ष आदित्य ठाकरे
सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆
महाविकास आघाडीच्या सरकारवर बोट ठेवणाऱ्या बंडखोर आमदारांनी बंड किंवा उठाव केला नाहीतर गद्दारी केली. लायक नसणाऱ्यांवर गरजेपेक्षा अधिक विश्वास ठेवला हीच चूक झाली. गद्दारांनी सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. आता राज्यात आलेले सरकार घटनाबाह्य आणि बेईमानांचे आहे . हे गद्दारांचे सरकार लवकरच कोसळणार आहे. राज्यातील जनतेने पुन्हा एकदा शिवसेनेला आशीर्वाद आणि प्रेम द्यावे या प्रेमातूनच महाराष्ट्राला पुढे नेणार असल्याचा विश्वास युवा सेने अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर झाले. या बंडखोरांच्या मतदारसंघात प्रत्यक्ष जाऊन शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांनी समाचार घेण्याचा सपाटा लावला आहे. बुधवारी आदित्य ठाकरे शिव संवाद यात्रेसाठी अलिबागनगरीत आले होते. अलिबाग शहरातून काढलेल्या रॅलीतून अलिबागकरांना शिवसेनेच्या चळवळीत सामील होण्याचे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.
यावेळी शिवसेनेच्या व्यासपीठावरून आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर आदेश बांदेकर , अनंत गीते, सुरेंद्र म्हात्रे , बबनदादा पाटील , मनोहर भोईर , विलास चावरी , किशोर जैन , सतीश पाटील , शंकर गुरव , संतोष ठाकूर , अजित पाटील , कमलेश खरिवले , राखी खरिवले , संदीप पालकर , रोशन पवार , प्रशांत मिसाळ , विष्णू पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नव्याने स्थापन झालेल्या सरकारला मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी तब्बल ४१ दिवस लागले. मंत्रिमंडळातील मंत्र्यांना खातेवाटप करण्यासाठी ५ दिवस लागले. आता झालेल्या सत्ता वाटपात निष्ठेला स्थान नाही. बंडखोरी करण्यासाठी गद्दारांनी महाराष्ट्र सोडून सुरत गाठली. आसाम मधील गुवाहाटीत पोहचले तेथून गोव्यात आले. बंडखोरी करणाऱ्यांच्या रक्तात शिवसेना आणि बाळासाहेबांचे वैचारिक गुण असते तर हाटेल … झाडी … डोंगार पाहत बसले नसते तेथील महापुरात अडकलेल्या नागरिकांना मदत केली असती. शिवसेना आमची म्हणणारे हे केवळ बंडखोर नाही तर यांच्या माथी गद्दारीचे लेबल कायमचे लावले जाईल असे आदित्य ठाकरे म्हणाले.
ठाकरे कुटुंबीयांची सहावी पिढी समाजकारणात कार्यरत आहे. तिसरी पिढी राजकारणात आहे. भारतीय जनता पार्टीने २०१९ मध्ये दिलेला शब्द पाळला नाही म्हणून महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी महाविकास आघाडी करावी लागली. शिवसेनेची भूमिका ठाम आहे. माणुसकीसाठी पुढाकार घेण्याचा वसा शिवसेनेने जपलेला आहे. भविष्यात राजकारणात चांगल्या नेतृत्वाला स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. जनतेची फसवणूक करणाऱ्या गद्दारांनी बंडखोरी केलीअसली तरी आजही या बंडखोरांना मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत. बंडखोरांवर दडपण असू शकते. बंडखोरांनो तुमच्यात हिम्मत असेलतर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा. असे आव्हान युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दिले.
राज्यात स्थापन झालेले शिंदे – फडणवीस सरकार लवकरच पडेल, असा दावा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. बंडखोरांवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, शिवसैनिकाने प्रश्न विचारला तर ते उत्तर देतील, पण पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही.
शिवसेनेतील बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे आपला पक्ष वाचवण्यासाठी सातत्याने प्रवास करत आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना आदित्य म्हणाले की, हा केवळ शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात नाही तर राज्यातील जनतेचाही विश्वासघात आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, बंडखोरांमध्ये हिंमत नाही, म्हणून त्यांनी राज्याबाहेर जाऊन आपले ध्येय पार पाडले. आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंडखोरांना निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे.
वडिलांच्या आजारपणात संधी शोधणे
आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेना अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारपणामुळे काही लोकांना भेटू शकले नाहीत, पण मुख्यमंत्री म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे. ते म्हणाले की बंडखोरांनी त्यांच्या वडिलांच्या आजारपणाचा फायदा घेतला आणि त्यांच्यात बंड करण्याची संधी शोधली. आमदारांसाठी आम्ही सर्व काही केल्याचे आदित्य म्हणाले. काही लोकांमध्ये क्षमता नव्हती. तरीही संधी दिली. ठाकरे कुटुंबीयांचे विधिमंडळात येणे ही बंडखोरांची मोठी अडचण झाल्याचे ते म्हणाले.
Be First to Comment