Press "Enter" to skip to content

रायगड जिल्ह्यातील वृक्षारोपणाचा शुभारंभ

वृक्षारोपणाची परंपरा पुढे सुरू रहावी म्हणून शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा — मनोज रानडे

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

‘देशाचा अमृत महोत्सव साजरा करताना समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता, हर घर तिरंगा आदी मोहीमे बरोबरच वृक्षारोपण व संवर्धन मोहीम तितकीच महत्वाची आहे. शोभेची झाडे लावून पर्यावरणाचे रक्षण होणार नाही तर मोठ्या प्रमाण वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे महत्वाचे असून ही परंपरा पुढे सुरू रहावी म्हणून शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा आहे. वृक्षारोपणाने पशु, पक्षी आदींचे एकत्रित संवर्धन होते. आपण या मोहिमेत विदेशी झाडे न लावता पर्यावरण राखण्यासाठी आपण या परिसरात सुमारे सहा हजार देशी झाडे लावत आहोत.’ असे महत्वपूर्ण प्रतिपादन कोंकण विभागाचे उपायुक्त मनोज रानडे यांनी केले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील वृक्षारोपणाचा शुभारंभ सोहळ्याचे आयोजन कर्जत आणि खालापूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या तिघर धनगरवाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या समोर कोंकण विभाग विभागीय आयुक्त कार्यालय रोहियो शाखा आणि कर्जत तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी सामान्य प्रशासनाचे उपायुक्त मनोज रानडे व रोहियो उपायुक्त वैशाली राज चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी प्रांताधिकारी अजित नैराळे, कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख, खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी, गट विकास अधिकारी चंद्रकांत साबळे, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजलक्ष्मी एरकुडे, क्षितिजा साळुंखे, संगीता पवार, प्रियांका गाडे, वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण, समीर खेडकर, सरपंच जयेंद्र देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी आंबा, कांचन, शिरस, बकुळ, कडुनिंब, पेरू, आवळा, वड, पिंपळ या देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

शाळेच्या प्रांगणात आयोजित केलेल्या विशेष समारंभात जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत व शिवरायांचे गीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात येऊन समारंभाचे उदघाटन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी हर घर तिरंगा या मोहिमेंतर्गत तिरंगा ध्वजाचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी मनोगतात वैशाली चव्हाण यांनी, ‘या लहान मुलांना पर्यावरणाचे महत्व समजावे म्हणून हा वृक्षारोपणाचा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. कारण पुढच्या पिढ्यांनी ही परंपरा कायम ठेवणे गरजेचे आहे. रोजगार हमी योजनाही ठीक ठिकाणी राबविली गेली पाहिजे. घरकुले, विहिरी, रस्ते आदी रोजगार हमी योजनेद्वारे केले पाहिजेत. त्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा.’ अशी विनंती केली. सूत्र संचालन नायब तहसीलदार सोपान बाचकर यांनी केले.

याप्रसंगी कृषी अधिकारी शीतल शेवाळे, विरेंद्रसिंग परदेशी, पंजाब पवार, अमृता पोफळे, संतोष जांभळे, उपसरपंच मनीषा गोरे, ॲड. वसंत रवणे, भिसेगाव केंद्र प्रमुख नलिनी साळोखे, संतोष देशमुख आदींसह शासकीय कर्मचारी, वनविभागाचे कर्मचारी, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.