सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆
6 लाखासाठी मित्राचा खुन करून सदर मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पसार होणार्या 3 आरोपींना पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे.
टॉवरवाडी, मालडुंगे येथे या शिवारातील टॉवरवाडी ते वांगणी -बदलापूर या पायवाटेपासून काही अंतरावर झाडीझुडूपात एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत सापडले असल्याबाबत स्थानिक गावकर्यांनी पोलिसांनी माहिती दिली. सदर ठिकाणी जावून पोलिसांनी पाहणी केली असता ते प्रेम कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. प्रेताच्या चेहर्यावर कोणत्यातरी हत्याराने घाव घालनू चेहरा विद्रुप करून सदर मृतदेहाची ओळख पडू नये याकरिता खांद्याच्या वरील भाग, मान, चेहरा ज्वलनशील पदार्थाने जाळला असल्याचे दिसून आले. प्रेताचा चेहरा पूर्णपणे कुजलेला होता.
याबाबतचा गुन्हा अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा अधिक तपासासाठी पोलीस उपायुक्त गुन्हे परिमंडळ 2 शिवराज पाटील, सा.पोलीस आयुक्त भागवत सोनावणे, पनवेल विभाग सा.पोलीस आयुक्त, पोर्ट विभाग धनाजी क्षिरसागर यांनी घटनास्थळी भेट देवून तपासाची सुत्रे हलविण्याच्या सुचना दिल्या. या मृत प्रेताची ओळख पटविण्यासाठी कोणताही धागादोरा नसताना त्याची ओळख पटवून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला.
वपोनि रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली 5 पथकाची स्थापना केली. त्यामध्ये सपोनि संजय गळवे, सपोनि अविनाश पाळदे, सपोनि निलेश फुले, सपोनि विवेक भोईर, पोउपनि आकाश पवार व त्यांच्या सहकार्यांनी अधिक तपास केला.
गुन्ह्याचे घटनास्थळ हे निर्जनस्थळी असल्याने घटनास्थळी व आजूबाजूचे परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नव्हते. अशा वेळी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून सतत चार दिवस तांत्रिक तपास करून सपोनि संजय गळवे व पथकाने अत्यंत मेहनतीने आजूबाजूच्या गावामधून गुन्ह्याचे घटनास्ळिी येणार्या जाणार्या रस्त्यांचे एकूण 15 ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि मृतदेह मिळाल्याच्या चार दिवस अगोदर घटनास्थळाच्या आजूबाजूच्या गावामध्ये आलेल्या संशयित इसमांची यादी तयार केली. त्यामध्ये मयत इसमाचे अर्धवट जळालेल्या कपड्यांशी साधर्म्य असलेली हाफ पॅन्ट परिधन केलेली एक व्यक्ती ही एका ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका स्ुटीवरुन 3 इसमांसोबत टॉवरवाडीच्या दिशेने जाताना दिसत असल्याचे निष्पन्न झाले.
त्याबाबत सखोल तपास केला असता सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती हीच मयत व्यक्ती असू शकते अशी शक्यता लक्षात घेवून सदर स्कुटी नेमकी कुठून आली आहे ? हे शोधत असताना पोलिसांना एका दुकानामध्ये सदर हाफ पॅन्ट घातलेला इसम किरकोळ खरेदी करताना फोन-पे-मार्फत पेमेंट करीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. सदर प्राप्त माहितीवरुन तंत्रिक तपास करून मयत इसम हा प्रवीण सुरेश शेलार असावा असा अंदाज बांधण्यात आला.
सदर इसमाचे राहते घर शोधून काढून तेथे जावून खात्री केली अता सदर इसमाचे घरी त्याची वयोवृद्ध आई व भाऊ मिळून आले. चौकशीअंती ते दोघेही मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांच्याकडे प्रवीण शेलारबाबत विचारणा करून माहिती काढण्याचा प्रयत्न केला. परंतु सदर मयत प्रवीण हा कुठे आहे ? याबाबत त्यांना काही एक माहिती नव्हती. पोलिसांनी तांत्रिक तपास व साक्षीदारांकडे केलेल्या चौकशीमध्ये मयत प्रवीण हा 3 इसमांसोबत स्कुटीवरुन कुठेतरी गेल्याचे समजले.
सदर माहिती घेवून तपास सुरू केला असता मयत इसमाचा मित्र यानेच प्रवीण शेलार यास सोबत घेवून त्याचा खुन केल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदर नरेश शांताराम बेटकर (42 रा.रत्नागिरी) यांस तांत्रिक तपासावरुन उसर्ली बु. येथून ताब्यात घेतले व त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे दोन मित्रांसोबत मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
आरोपी नरेश बेटकर व मयत प्रवीण शेलार हे मित्र होते. मयत प्रवीण शेलार हा अविवाहित असून त्यला विवाहासाठी एका मुलीची आवश्यकता होता. त्याकरिता आरोपी बेटकर याने मयत प्रवीणकडून 40 हजार रुपये घेतले होते. परंतु त्याने मयत प्रवीणचे काम न केल्याने ती रक्कम मिळावी याकरिता प्रवीणने नरेश बेटकर याच्याकडे तगादा लावला होता.
सदर रक्कम प्रवीण यास देवू नये व प्रवीणचे घरात त्याचा शोध घेणारी कुणीही सुज्ञ व्यक्ती नसल्याचे लक्षात घेवून त्याचे भावाने बुकींग केलेलया रुमची बुकींग त्याच्या मनोरुग्ण आईचा अंगठा घेवून रद्द करून सहा लाख रुपये मिळवता येईल हा उद्देश मनात ठेवून मुख्य आरोपी नरेश बेटकर याने दोन साथीदारांच्या मदतीने प्रवीणचा खुन करण्याचे ठरविले. त्यांनी दोन दिवस मयत प्रवीण याचे घरी राहून दारु पिण्याच्या बहाण्याने त्याचेच ज्युपिटर स्कुटीवर निर्जस्थळी घेवून जावून त्याचा गमचाने गळा आवळून खुन केला व ओळख पटू नये याकरिता त्याचा चेहरा दगडाने ठेचून मृतदेह झाडाझुडपात टाकून पसार झाले.
दुसर्या दिवशी सदर तिन्ही आरोपींनी पुन्हा त्याच स्कुटीवरुन घटनास्थळी जावून प्रेत कोणी ओळखू नये याकरिता एका पेट्रोल पंपावरुन पेट्रोल घेवून मयत प्रवीणवर पेट्रोल टाकून त्याचा चेहरा जाळला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या तिन्ही आरोपींपैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून दिलीप शुक्ला (34) व अमनसिंग सिंह (25) यांना उत्तरप्रदेशमधून अटक केली आहे.
Be First to Comment