सिटी बेल ∆ पोलादपूर ∆ शैलेश पालकर ∆
शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या विद्यामंदिर पोलादपूरमध्ये शनिवारी व्यसनमुक्तीसंदर्भात पथनाटय सादर करण्यात आले. यावेळी संस्थेचे स्थानिक शाळा सभापती निवास शेठ तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील अध्यापकवर्ग आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि विद्यार्थी यांनी या पथनाटयापासून बोध घेतला.
देशात व्यसनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्याच्या आणि राष्ट्राच्या युवा शक्तीचा ऱ्हास होत आहे. यामुळे व्यसनाला आळा घालणे, हे राज्याचे सामाजिक दायित्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या व्यसनमुक्ती धोरणाच्या अंमलबजावणीसाठी तसेच नशायुक्त औषधे व अन्य नशायुक्त पदार्थ सेवनापासून समाज दूर राहावा याकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि नमू डायनॅमिक आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 20जुलै ते 25 जुलै 2022 ह्या कालावधीत पथनाटय सादरीकरणाचे अभियान राबविले आहे.
यावेळी पथनाटय कलावंत संकेत धनावडे, स्वप्नील धनावडे, तन्मय राऊत, श्रेयस माईन, तन्वी शिंदे, ॠतुजा पाठक यांनी व्यसनमुक्तीबाबतचे पथनाटय रयत विद्यामंदिर पोलादपूरच्या प्रांगणात सादर केले. यानंतर महाड येथील एस.टी.आगारात आणि त्यानंतर ऐतिहासिक चवदारतळे येथे या पथनाटयाचे सादरीकरण करण्यात आले. यानंतर म्हसळा येथे पथनाट्य सादरीकरणास लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
नमू डायनॅमिक आर्ट संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आंगणे आणि त्यांचे सहकारी संदीप सावंत, रवी लोहार, राजू मोरे, अनंत अंकुश, आर्यन देसाई, रामदास तांबे, सुनील देवळेकर, संजय चाचे व दिलीप परळकर आणि मुंबई रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील पथनाटय सादर करणारे 40 कलावंत मिळून कोकण विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हयामधील 51 तालुक्यामध्ये व्यसनमुक्ती अभियान राबविण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत.








Be First to Comment