Press "Enter" to skip to content

सोनिया गांधींसाठी पनवेलमध्ये काँग्रेस मैदानात

ईडीच्या नोटिशीविरोधात पनवेलमध्ये काँग्रेसचा सत्याग्रह

सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीद्वारे पुन्हा चौकशी करण्यात आली असून त्याविरोधात ठिकठिकाणी काँग्रेस आक्रमक होताना दिसून येत आहे. सोनिया गांधी यांच्या विरोधात सुरु असलेल्या चौकशीविरोधात पनवेलमध्ये देखील आज (मंगळवार दि.२६ जुलै) पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष अभिजित पां. पाटील यांच्या नेतृत्वाखाली गांधी उद्यानातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करून सत्याग्रह करण्यात आला.

यावेळी उपस्थित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून सोनिया गांधी यांना आपले समर्थन दर्शविले.

यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ.भक्तीकुमार दवे म्हणाले, कितीही संकटे आली तरी काँग्रेसच्या संस्कृती
मध्ये बदल झालेला नाही. काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून ६३ वेळा पक्षात मतभेद झालेले आहेत. असे असले तरीही काँग्रेस पक्षाचे अस्तित्व दिवसेंदिवस भक्कम होत आहे. भाजपच्या विरोधात असणाऱ्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या विरोधात ईडीच्या नोटीसा पाठवणे या गोष्टी नवीन नाहीत. हे आधीपासूनच सुरू आहे. कोणाला आणि कश्याप्रकारे त्रास द्यायचा याचेही राजकारणात काही नियम आहेत. परंतु हल्ली ते नियमही पाळले जात नाहीत. या कृत्यामुळे केंद्र सरकार मधील मंडळी जनमानसाच्या मनातुन उतरून जातील. इडीमुळे सगळ्यांची मुस्कटदाबी होत आहे.

यावेळी पनवेल शहर जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभिजित पां पाटिल यांच्यासह काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ.भक्तीकुमार दवे, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी विधी व न्याय सेलचे अध्यक्ष के एस पाटील, पनवेल तालुकाध्यक्ष नंदराज मुंगाजी, पनवेल शहर जिल्हा सरचिटणीस मल्लिनाथ गायकवाड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनंत पाटील, पनवेल शहर ब्लॉक अध्यक्ष लतीफ शेख, महिला आघाडी अध्यक्षा निर्मला म्हात्रे, रायगड जिल्हा चिटणीस नित्यानंद म्हात्रे यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्या कुटुंबाने देशासाठी आपले सर्वस्व दिले अशा कुटुंबाला मोदी सरकार, भाजप आणि आरएसएस फक्त त्रास देत आहेत. केंद्र सरकार काँग्रेसला झुकवू पाहात आहे. परंतू, ते शक्य नाही. लोकशाहीची मुल्ये व संविधानाला धाब्यावर बसवून केंद्रातील मोदी सरकार हुकूमशाही कारभार करीत आहे. मोदी सरकारच्या मनमानी कारभाराला विरोध करणाऱ्यांना संपवण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीमार्फत होत असलेली चौकशी हा सुद्धा याच षड्यंत्राचाच भाग आहे. या विरोधात पनवेल जिल्हा काँग्रेसच्या वतीने सविनय आंदोलन करण्यात आले. काँग्रेस हा गेल्या दीडशे वर्षांपासूनचा पक्ष असुन लेचापेचा पक्ष नाही. मोदी सरकारने केंद्रीय संस्थांचा कितीही गैरवापर केला तरीही काँग्रेसचा एकही पदाधिकारी व कार्यकर्ता शरण जाणार नाही.
– अभिजित पां पाटील, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.