Press "Enter" to skip to content

अर्धा किलो मोफत बदाम पडले महागात

अर्धा किलो बदाम मोफत मिळविण्याच्या नादात गमावले ४ लाख १० हजार रुपये

सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆

खारघर भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने अर्धा किलो काजू वर अर्धा किलो बदाम मोफत मिळविण्याच्या नादात ४ लाख १० हजार रुपये गमावल्याचा प्रकार घडला आहे.

सदर प्रकरणात फसवणूक झालेल्या व्यक्तीला अज्ञात सायबर चोरट्याने अर्धा किलो काजू वर अर्धा किलो बदाम मोफत देण्याचा बहाणा करुन तक्रारदाराकडून क्रेडीट कार्डची माहिती घेऊन त्याच्या खात्यातून ४ लाख १० हजार रुपये परस्पर काढून घेतले आहेत. त्यामुळे खारघर पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.

सदर प्रकरणात फसवणूक झालेले शरद बिबवे (४९) खारघर, सेक्टर- ३६ मध्ये राहण्यास असून ते मिनी बस चालवतात. सायबरचोरट्यांनी फसवणूक करण्यासाठी फेसबुकवर टाकलेली अर्धा किलो काजू वर अर्धा किलो बदाम मोफत देण्याची डी-मार्टची जाहिरात त्यांच्या निदर्शनास आली. अर्धा किलो काजू वर अर्धा किलो बदाम मोफत मिळणार असल्याने शरद बिबवे यांनी सदर जाहिरातीवरुन अर्धा किलो काजुची ऑर्डर बुक केली. तसेच त्यावर आपल्या क्रेडीट कार्डचा क्रमांक आणि सीव्हीव्ही नंबर टाकला.

त्यानंतर सदरची जाहिरात बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यातून बिबवे बाहेर पडले.त्यानंतर दुसऱ्या दिवशी सायबर चोरट्याने डी-मार्टचा प्रतिनिधी असल्याचे भासवून बिबवे यांना संपर्क साधला. तसेच त्यांनी आदल्या दिवशी ऑनलाईन मागवलेले काजू आणि बदाम त्यांना घरपोच मिळतील असे सांगून त्यांच्या व्हॉटस्अॅपवर एक लिंक पाठवून दिली. तसेच सदरचे अॅप डाऊनलोड करुन पुढील खरेदीसाठी देखील त्याचा वापर करता येईल, असे सांगितले.

त्यामुळे बिबवे यांनी सदरची लिंक उघडून त्यात आपली सर्व माहिती भरल्यानंतर त्यांच्या क्रेडीट कार्डवरुन १० हजार रुपये गेल्याचे त्यांना समजले. त्यामुळे बिबवे यांनी तत्काळ बँकेच्या हेल्पलाईनला संपर्क साधून सदर क्रेडीट कार्ड बंद करुन घेतले. मात्र, तोपर्यंत सायबर चोरट्याने त्यांच्या बँक खात्यातील एकूण ४ लाख १० हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर बिबवे यांनी खारघर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.