नागोठण्यातील नवीन पुलावरून दुचाकींची वाहतूक सुरु : भाजपा शहराध्यक्ष सचिन मोदी यांच्या निवेदनाची घेतली दखल
सिटी बेल ∆ नागोठणे ∆ महेश पवार ∆
नागोठण्यातील मुख्य रस्त्यावर विशाल मेडिकलच्या समोरच सार्वजनिक बांधकाम खात्याकडून अनेक दिवसापासून सुरु असलेल्या एका छोट्या पुलाच्या कामात शासकीय अधिकाऱ्यांनी व ठेकेदाराने पर्यायी वाहतुक व्यवस्थेचे कोणतेही नियोजन न केल्याने सर्वच वाहन चालकांची अडचण झाली होती. असे असतांनाच पुलाचे स्लॅबला अनेक दिवस झाल्याने किमान दुचाकी वाहनांना तरी पुलावरून जाण्याची सवलत मिळावी अशाप्रकारचे निवेदन भाजपा शहराध्यक्ष सचिन मोदी यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला देत अधिका-यांशी चर्चा केल्यानंतर हा पूल मंगळवार दि. १४ जून पासून दुचाकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे वाहन चालकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या पुलाचे काम सुमारे दिड महिन्यापूर्वी सुरु करण्यात आले होते. तेव्हापासून वाहनचालक व नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. नागोठणे एसटी स्टँड जवळील विशाल मेडिकल समोर हे काम सुरु होते. हा नागोठ्यातील मुख्य रस्ता असून याच ठिकाणावरून नागोठणे मध्ये मध्ये एसटी बस ची ये-जा असते तसेच याच रस्त्यावरून नागोठण्यासह विभागातील नागरिक तलाठी कार्यालय, पेट्रोल पंप, बँक, सरकारी दवाखाना येथे सतत ये-जा करत असतात. त्यामुळे वर्दळीचा रस्ता आहे हे माहित असूनही संबंधित खात्याच्या लोकांनी सदर पूलाचे काम करताना पर्यायी रस्ता न बनवता केवळ छोटा पूल निर्माण करून पायी चालणाऱ्यांना तात्पुरती वाट निर्माण करून हा रस्ता हा खूप दिवसापासून बंद ठेवला होता. या पुलाच्या बाजूलाच मिनीडोर स्टॅन्ड आहे. त्यामुळे याचा परिणाम या लोकांच्या रोजीरोटी वरही झाला होता. याशिवाय नागरिकांना नागोठणे हायवे नाक्यावर जाण्यासाठी खूप दुरून गावाला वळसा मारून, त्रास सहन करुन जावं लागत होते.

भाजपाचे नागोठणे शहराध्यक्ष सचिन मोदी यांनी सदर बाब आमदार रवीशेठ पाटील यांच्याशी यासंबंधी चर्चा करुन संबंधित अधिकार्यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. या निवेदनात त्यांनी कमीतकमी दुचाकी वाहनांना तरी पर्यायी रस्ता करून द्यावा अशी विनंती केली होती. तसेच भविष्यात आपण योग्य नियोजन करूनच विकास कामे करण्यात यावी असे सुचवले होते. संबंधित अधिकाऱ्याने व ठेकेदाराने काम सुरू करण्यापूर्वी जो तात्पुरती स्वरूपाचा पादचारी पूल बांधला आहे तो नियोजन करून व्यवस्थित बांधला असता तर त्यावरून नक्कीच दुचाकी वाहनांना जाता येता आले असते व लोकांचा त्रास कमी झाला असता असेही निवेदनात नमूद केले होते. तसेच आपण या प्रकरणाची तातडीने व गांभीर्याने दखल न घेतल्यास भाजपाच्या नागोठणे शाखेतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही मोदी यांनी दिला होता. तसेच हा पूल वाहतुकीसाठी लवकरात लवकर सुरू करावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. तसेच हा पूल वाहतुकीसाठी कधी चालू करणार आहात याची नक्की तारीख जाहीर करावी त्यामुळे किमान लोकांना थोडाफार दिलासा मिळेल अशी विनंती संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनी द्वारे मोदी यांनी केली होती. त्याची दखल घेत हा पूल दुचाकींसाठी सुरु करण्यात आल्याचे बोलले जात आहे. तर भविष्यात विकासकामे करताना लोकांना त्रास. होणार नाही याचे नियोजन करूनच कामाला सुरुवात करू व याची काळजी घेऊ असे आश्वासनही त्यांनी मोदी यांना दिले आहे. दरम्यान शहराध्यक्ष सचिन मोदी हे सतत जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेले सामान्य प्रश्न पण अधिकाऱ्यांपुढे प्रखडपणे मांडत असल्यामुळे त्यांच्या कामगिरीबाबत नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.








Be First to Comment