Press "Enter" to skip to content

आतापर्यंत ११ देशांमध्ये आढळले मंकीपॉक्स

मंकीपॉक्सचा सामूहिक संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टंसिंग व तोंडावर मास्क असणे गरजेचे

सिटी बेल ∆ आरोग्य प्रतिनिधी ∆

कोरोनाशी दोन हात करून संपूर्ण जागची चांगलीच  दमछाक झाली असताना  मंकी पॉक्स या  संसर्गजन्य आजाराने सर्वांची झोप उडाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आतापर्यंत एकूण ११ देशांमध्ये मंकीपॉक्स आढळून आल्याचे सांगितले आहे. सोबतच भारताला धोक्याचा इशारा डब्लूएचओने दिला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र  सरकार सावध झाले असून मंकीपॉक्सला रोखण्यासाठी कंबर कसली आहे. मंकीपॉक्समुळे कांजण्यांसारखी लक्षणे दिसतात परंतु  ती कमी गंभीर आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

याविषयी अधिक माहिती देताना  बोरिवली येथील अपेक्स हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ. चिराग शहा म्हणाले , ” मंकीपॉक्स हा एक दुर्मिळ आजार असून याचा संसर्ग सौम्य प्रकारातील आहे, मंकीपॉक्स मुख्यतः आफ्रिकेतील काही भागांमध्ये संक्रमित वन्य प्राण्यांपासून होतो. सीडीसीच्या म्हणण्यानुसार, १९५८ मध्ये संशोधनासाठी ठेवलेल्या माकडांमध्ये तो प्रथम आढळले होता. याचा १९७० मध्ये पहिले मानव संक्रमण अफ्रिकेतील ९ वर्षाच्या मुलाला झाले होते. मंकीपॉक्सच्या लक्षणांची सुरुवात कमीत-कमी ६ ते १२ दिवसांआधीपासून दिसण्यास सुरु होतात.

ताप, डोकेदुखी, अंगदुखी, एनर्जी कमी होणे आदी लक्षणे दिसतात. यामध्ये कांजण्यां सारखे पुरळ संपूर्ण शरीरावर येतात ज्याची सुरवात बहुतांश वेळा चेहऱ्यापासून होते. या पुरळांमध्ये सतत बदल होतात. शेवटी खपली तयार होण्यापूर्वी आणि ती खपली पडण्यापूर्वी हे वेगवेगळ्या टप्प्यांतून जातं. संक्रमित रुग्णाच्या संपर्कात राहिल्याने हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो.

हा विषाणू फाटलेली त्वचा, श्वसनमार्ग, डोळे, नाक किंवा तोंडातून शरीरात प्रवेश करू शकतो. एवढेच नाही तर व्हायरसने दूषित झालेल्या वस्तू जसे की अंथरूण आणि कपडे यांच्या संपर्कातूनही त्याचा प्रसार होतो.”
मंकीपॉक्स हा आजार संसर्गजन्य असल्याने तो झपाट्याने पसरतो, या आजाराचे रुग्ण भारतात अजूनपर्यत आढळले नसून भविष्यात जर या आजाराचे  रुग्ण आढळून आले तर सोशल डिस्टिंसिंग पाळणे  व तोंडावर मास्क असणे गरजेचे असल्याची माहिती अपेक्स हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ. चिराग शहा यांनी दिली.

ब्रिटन, अमेरिका, पोर्तुगाल, स्पेन आणि काही युरोपीय देशांमध्ये मंकीपॉक्स हातपाय पसरत आहे. अफ्रिका खंड वगळता बाहेरच्या देशांमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणे कमी प्रमाणात आहे. परंतु, वेळीच धोका ओळखून याला प्रतिबंध करणे गरजेचे असल्याने भारतानेही त्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.