सिटी बेल ∆ नागोठणे ∆ महेश पवार ∆
नागोठण्यातील ग्रामपंचायत कार्यालय परिसरातील रहिवासी दत्ताराम गणपत नगरकर (वय ६५) यांचे पनवेल येथील एम.जी. एम. हाॅस्पीटल मध्ये उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले आहे. कै. दत्ताराम नगरकर यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, बहिण, एक विवाहित मुलगा प्रसन्ना, दोन विवाहित मुली भारती व कीर्ती, सुन, जावई, नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे.
दिवंगत दत्ताराम नगरकर हे मितभाषी परंतु प्रेमळ स्वभावाचे होते. अनेक वर्षांपासून भारती सायकल मार्ट नावाचे दुकान व सायकल दुरूस्ती व विक्रीचा व्यवसाय होता. त्याकाळात जेव्हा कुणा स्वत:कडे सायकल नसायची तेव्हा सायकल भाड्याने देण्याचा व्यवसायही ते करीत होते. त्यांच्याकडून भाड्याने सायकल घेऊन त्यावेळी अनेक मुले सायकल चालवायला शिकली होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत तर मुले आपल्या आवडत्या नगरकर काकांकडून सायकल भाड्याने घेऊन सायकल चालविण्याची आपली हौस पूर्ण करीत असत. त्यामुळे दिवंगत दत्ताराम नगरकर यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कै. दत्ताराम नगरकर यांच्यावर येथील आंबा नदीकिनारील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे नातेवाईक, विविध क्षेत्रातील मान्यवर, समाज बांधव व नागरिक उपस्थित होते. कै. दत्ताराम नगरकर यांचे दशक्रिया विधी गुरुवार दि. २ जून रोजी उध्दर येथे तर उत्तरकार्य(तेरावे) रविवार दि. ५ जून रोजी त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याची माहिती नगरकर कुटुंबियांनी दिली.
Be First to Comment