Press "Enter" to skip to content

सरकारी कर्मचारी संघटनांचे २७ मे रोजी धरणे आंदोलन

सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆

राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीतर्फे देश व्यापी धरणे आंदोलन दिनांक 27 मे 2022 रोजी घोषीत करण्यात आले आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा रायगड ची वार्षिक सभा कॉ. र. ग. कर्णिक सभागृह, पंतनगर, चेंढरे अलिबाग येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

यावेळी राज्य स्तरावरील पदाधिकारी प्रसिद्धी प्रमुख सुरेंद्र सरतापे, संघटक सुबोध किर्लोस्कर यांनी संघटने विषयी मार्गदर्शन केले. राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीतर्फे देशव्यापी धरणे आंदोलन 27 मे 2022 रोजी घोषीत करण्यात आले आहे. या आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांना सादर केले आहे. राज्य सरकारने सुद्धा राज्यातील सर्व सरकारी, निम सरकारी कर्मचारी व शिक्षक यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्याकरिता महाराष्ट्रातील 17 लाख कर्मचारी धरणे आंदोलन करणार आहेत. रायगड जिल्हयातील सर्व राज्य सरकारी, निम सरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

खाजगीकरण, कंत्राटीकरण धोरण रद्द करुन सध्याच्या अंशकालीन व कंत्राटी व बंधपत्रित कर्मचार्‍यांच्या सेवा नियमित करा, सर्व संवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरा व ही पदे भरतानाच अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या विनाअट करा, चतुर्थश्रेणी कर्मचारी यांच्या वारसांना शासकीय नोकरीत सामावून घ्या, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे प्रलंबित प्रश्‍न तात्काळ सोडवा, लिपीक वर्गीय कर्मचारी व अन्य कर्मचार्‍यांचे वेतनश्रेणी त्रुटी दूर करा, कंत्राटी कर्मचारी, कोतवाल, आशा, अंगणवाडी ताई, महिला परिचर सह सर्व कंत्राटी कर्मचारी व शिक्षक यांना किमान वेतन दया व त्यांना पेन्शन योजना लागू करा, इतर सर्व प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी सर्व संबंधित संवर्ग संघटनेच्या प्रतिनिधींसोबत निर्णायक चर्चा करा.या मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. या सभेमध्ये जिल्ह्यातील तालुका स्तरावर उत्तम कार्य करणारे कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संदिप नागे, सरचिटणीस प्रभाकर नाईक, उपाध्यक्ष परशुराम म्हात्रे, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, कोषाध्यक्ष दर्शना पाटील, प्रफुल्ल कानिटकर, नीला देसाई, प्रणाली म्हात्रे, दर्शना कांबळे, वाय. एन. थळे, गोवर्धन माने, वल्लभ मसके, संतोष पेरेकर, चतुर्थ श्रेणी संघटनेचे अध्यक्ष सरचिटणीस विकास पवार, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.