पालीत सार्वजनिक स्वच्छतागृहाची वानवा, महिला व नागरिकांची कुचंबना…
मूलभूत व पायाभूत सेवा सुविधांचे वाजलेत बारा
सिटी बेल ∆ पाली/बेणसे ∆ धम्मशील सावंत ∆
महाराष्ट्रातील अष्टविनायकाचे प्रख्यात धार्मिक स्थळ व सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पालीत विकासाच्या नावाची बोंबाबोंब दिसून येते, पालीत अत्यंत महत्वाचा प्रश्न व समस्या जनतेला सतावते आहे.
सद्यस्थितीत सार्वजनिक स्वच्छतागृहाची वानवा आहे, त्यामुळे महिला व नागरिकांची कुचंबना होताना दिसून येतंय. येथे मूलभूत व पायाभूत सेवा सुविधांचे बारा वाजलेत तर नेते, लोकप्रतिनिधी, प्रशासन यांचा बोलाचा भात अन बोलाची कडीच दिसून येते. पालीत सार्वजनिक स्वच्छतागृहाभावी महिला, युवती विद्यार्थिनीची प्रचंड कुचंबना होत आहे, नैसर्गिक विधी करायचा कुठे, महिला पुरुषांची अक्षरश तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी परिस्थिती होतेय.
शनिवार ,रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पाली शहर गजबजलेले असते. सुधागड तालुक्यातील व तालुक्याबाहेरील नागरीक रोजची खरेदी, शासकीय कामे करण्यासाठी तसेच विद्यार्थी शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी , रुग्ण दवाखान्यासाठी पालीत येतात. तसेच तीर्थक्षेत्र असल्याने असंख्य भाविक देखील पालीत नियमित येत असतात.
मात्र बाजारात फिरतेवेळी किंवा कुठे जातांना नैसर्गिक विधी करायचा झाल्यास कुठे जावे हा प्रश्न त्यांना पडतो. कारण पालीत कुठेच सार्वजनिक स्वच्छतागृह किंवा मुताऱ्या नाही आहेत. त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी परिस्तिती अनेकांची होते. विशेषतः यामध्ये महिलांची अक्षरशः कुचंबना होते.

अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत ठिकठिकाणी सार्वजनिक स्वछतागृह नाहीत ही खूप मोठी समस्या आहे.पालीत “सु”चे वांदे झाले आहेत. स्वच्छतागृहाअभावी शासकीय कामांसाठी किंवा खरेदीसाठी बाजारात आलेले नागरिक व भाविक यांची खूप कुचंबना होत आहे. त्यामुळे पालीत महत्वाच्या ठिकाणी तसेच नाक्यांवर सार्वजनिक स्वच्छतागृह व मुताऱ्या बांधाव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रश्नाकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी संवेदनशील भावनेने पाहिलं का ? व ही समस्या सोडवली जाईल का ? हा खरा सवाल आहे.
स्वच्छता गृहाची उपलब्धता नसल्याने नागरिकांना अक्षरशः पोट दाबूनच त्यांना हा त्रास सहन करावा लागतो. ज्या व्यापाऱ्यांच्या दुकानात स्वच्छतागृह नाहीत त्यांची देखील गैरसोय होते. मधुमेह व मुतखडा असलेल्या लोकांना सुध्दा खूप त्रास होतो. एकवेळ पुरुष मंडळी कुठेतरी निभावून घेतात मात्र वृद्ध व स्त्रियांचे तर खूपच हाल होतात. आदिवासी व्यवसायिक महिला यांचे तर स्वछताग्रहा अभावी प्रचंड हाल होतात, तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था महिलांची होते.
पालीत बल्लाळेश्वर देवस्थानच्या वतीने भक्तनिवास क्रमांक 1 जवळ स्वच्छतागृह व मुतारी आहे. मात्र भाविकांसाठी ते बनविले आहेत. भाविकांबरोबरच जवळचे काही लोक व व्यवसायिक त्यांचा वापर करतात. मात्र त्यांचा वापर पादचारी व इतर लोकांना शक्य नाही आणि त्यांची निर्मिती देखील त्या उद्देशाने केलेली नाही. अटीतटीच्या वेळी काही लोक पूर्वी अस्तित्वात असलेल्या बस स्थानकातील स्वच्छतागृहाच उपयोग करीत होते. मात्र आता हे बसस्थानक देखील तोडले आहे.

पालीत दर्ग्यानजीक असलेल्या स्वच्छता गृहांची तर प्रचंड दुरावस्था झाली आहे. त्याची सुधारणा केल्यास त्याचा वापर होण्यासारखे आहे. पालीत ठराविक ठिकाणी स्त्रिया व पुरुषांसाठी मुताऱ्या स्वच्छतागृह असणे ही अतिशय महत्त्वाची गरज निर्माण झाली आहे. जेव्हा पालीत येतो तेव्हा स्वच्छतागृहाआभावी नेहमीच गैरसोय होते. आजारी माणूस किंवा स्त्रियांची देखील त्यामुळे मोठी परवड होते. किमान मोक्याच्या ठिकाणी तरी सार्वजनिक मुतारी किंवा स्वच्छतागृह असणे गरजेचे आहे. असे संदीप पाटील, बोकडविरा या पर्यटकांनी सांगितले.
जुन्या मुताऱ्यांची दुरावस्था
काही वर्षांपूर्वी पालीत ठिकठिकाणी जसे जुने पोलीस स्थानक, मधली आळीतील लवाटे चौक आदी ठिकाणी सार्वजनिक मुताऱ्या होत्या. काही ठिकाणी सिमेंटच्या पाईपच्या मुताऱ्या देखील होत्या. त्यामुळे लोकांची काही प्रमाणात सोय होत होती. मात्र सध्या या मुताऱ्यांची पडझड झाली आहे. त्या वापरण्यायोग्य राहिलेल्या नाहीत. परिणामी नव्याने मुताऱ्या व स्वच्छतागृहाची गरज निर्माण झाली आहे.
पालीत आजघडीला सर्वात मोठी समस्या म्हणजे स्वच्छतागृहांचा अभाव. सार्वजनिक मुतारी व स्वच्छतागृह नसल्याने अनेकांची गैरसोय होते. बाहेरगावाहून आलेले लोक, पादचारी आणि भाविक यांचे यामुळे हाल होतात. त्यामुळे पालीत किमान दोन ठिकाणी नाक्यांवर तरी मुतारी किंवा स्वच्छतागृह बांधणे आवश्यक आहे.
शरद गोळे, नागरिक पाली सुधागड
सुधागड तालुका आदिवासी बहुल तालुका आहे, रोजगार व इतर कामासाठी पालीत रोज हजारो लोक खेड़यापाड्यातुन पालीत येतात, मात्र येथे स्वछतागृह नसल्याने महिला पुरुषांची कुचम्बना होते. महिलांना नाइलाजाने झाड़ झुड़पाचा आधार घ्यावा लागतो. ही शोकांतिका वाटते. शासनाने याचा विचार करावा व सुविधा द्याव्यात.
रमेश पवार, आदिवासी समाज नेते सुधागड








Be First to Comment