Press "Enter" to skip to content

पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यान 32 कि.मी. अंतराचा घाट

आंबेनळी घाटाचे म्हणजेच फिटझगेराल्डचे रूंदीकरण होण्याची गरज

सिटी बेल ∆ पोलादपूर ∆ शैलेश पालकर ∆

तालुक्यातील पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यान सुमारे 32 कि.मी. अंतराचा फिटझगेराल्ड म्हणजेच सध्याचा सर्वशृत आंबेनळी घाट पोलादपूर तालुक्यातील कापडे खुर्द येथून सुरू झाला आहे. ब्रिटीशांनी या घाटाला फिटझगेराल्ड असे संबोधिले होते. गेल्यावर्षी 2021च्या अतिवृष्टी व भुस्खलनामुळे या घाटाची वाताहत होऊन तात्पुरती दुरूस्ती करण्यात आली आहे. मात्र, नजिकच्या काळात पोलादपूर वाई सुरूर या राज्यमार्गाचे रूंदीकरण होण्यासोबतच आंबेनळी घाटाचे म्हणजेच फिटझगेराल्डचे रूंदीकरण होण्याची गरज निर्माण झाली आहे.

घाटाचा इतिहास

पूर्वी शिवकाळात महाबळेश्वरपर्यंत अथवा त्याहीपुढे जाण्यासाठी महाडच्या अग्नेय दिशेने माझेरी, वरंध, शिवथरघळ, पिंपळवाडी असा 24 कि.मी.चे सह्याद्री पर्वतराजीतून मार्गाक्रमण करून पोलादपूर तालुक्यातील किनेश्वर गावाजवळ पार घाट सुरू होत असे. या मार्गाला आजही छ.शिवाजी महाराज रस्ता म्हटले जाते. त्याकाळी महाड ही तरत्या बंदराची उतारपेठ होती. महाड तालुक्याला पोलादपूर पेटयाचा मुलूख 1948 सालापर्यंत जोडला होता. ब्रिटीशांनी पोलादपूरला महाल कचेरी ठेवली होती. पण तत्पूर्वी 1826 पर्यंत पार घाट हाच शिवकालीन मार्ग सातारा, वाई, कराडपर्यंत वाहतूकीसाठी वापरात येत होता. मात्र, आजचे थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर शिवकाळात दंडकारण्यातील श्रीक्षेत्र महाबळेश्वर असे परिचित होते. पार घाटातून 1826 पूर्वी महाबळेश्वरला जाणारी पायवाट होती.

ऐतिहासिक भौगोलिक रस्तेवाहतूक

1826 पर्यंत पार घाट हाच शिवकालीन मार्ग वाहतूकीसाठी वापरात येत असताना पारघाटाला रडतोंडीचा घाट हा पर्यायी मार्ग होता.याखेरिज, भोर संस्थानापासून कामथे आणि ढवळे घाट वाटसरूंसाठी वापरात होते. मात्र, हा घाट दूर्गम व अवघड असल्याने येथून मालवाहतूक कठीण होती. सातारा, वाईशी कमी अंतरात पोहोचण्याचा हा मार्ग बिकट तर होताच पण या मार्गाची डागडुजी, देखभाल दुरूस्ती करण्यासाठी खुपच खर्च झाला.

कसा बांधला ब्रिटीशांनी फिटझगेराल्ड ?

ब्रिटीशांना घोडागाडी अथवा मोटारगाडीसाठी उपयुक्त मार्ग तयार करण्याची आवश्यकता भासू लागल्याने पार घाटाच्या उत्तरेस 0.81 कि.मी. अंतरावर कापडे खुर्द गावाजवळ नव्याने घट बांधला. या घाटाला फिटझगेराल्ड म्हणत. हाच सध्याचा आंबेनळी घाट होय. या घाटाच्या उभारणीस 1871 साली सुरूवात होऊन केवळ 4 लक्ष 44 हजार रूपये खर्च झाला. हा घाट पाचच वर्षात वाहतुकीस खुला होऊन 1876 सालापासून ब्रिटीश आणि व्यापारी घोडयाला लगाम न लावता कापडे खुर्दपर्यंत उतरत असत. या घाट उभारणीच्या काळातच श्रीक्षेत्र महाबळेश्वरचा गिरिस्थान थंड हवेचे ठिकाण म्हणून ब्रिटीशांनी विकास केला.

फिटझगेराल्डचा झाला आंबेनळी घाट

ब्रिटीशांनी पुर्वीचा रडतोंडीचा घाट आणि पारघाट यामधून फिटझगेराल्डची बांधणी केली आणि याचदरम्यान पोलादपूर तालुक्यातील सातारा रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवरील कुडपण आणि सातारा जिल्ह्यातील श्रीक्षेत्र महाबळेश्वर या दोन थंड हवेच्या ठिकाणांपैकी श्रीक्षेत्र महाबळेश्वरचा हिलस्टेशन म्हणून विकास केला. यावेळी सक्तमजुरीच्या शिक्षेवर कैद्यांचा फिटझगेराल्ड आणि महाबळेश्वर हिलस्टेशनच्या उभारणीमध्ये श्रमसहभाग ब्रिटीशांनी वापरला. यानंतर आंबेनळी घाट म्हणून स्वातंत्र्यानंतर या घाटरस्त्याला ओळखले जाऊ लागले आणि महाड सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हा रस्ता वर्ग करण्यात आला.

2021 मध्ये आंबेनळी घाट उदध्वस्त

22 जुलै 2021 रोजी रात्रभर अतिवृष्टी आणि भुस्खलनामुळे पोलादपूर तालुक्यातील कापडे खुर्दपासून वरील भागात म्हणजे ब्रिटीशकालीन फिटझगेराल्ड घाटाच्या सुरूवातीपासूनच दरडी कोसळून राज्यमार्ग दरीमध्ये वाहून गेला आणि ठिकठिकाणी वाहने घेऊन जाणे सुमारे महिनाभर तरी अशक्य झाले होते. मोटारसायकलस्वारांनी जीव मुठीत घेऊन पोलादपूरपर्यंत वाहने आणल्यानंतर थोडाफार शिल्लक असलेल्या घाटरस्त्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्याची गरज निर्माण झाली. ज्याठिकाणी सातारा जिल्ह्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला शक्य नव्हते तिथे महाड विभाग आणि पोलादपूर उपविभागामार्फत घाटरस्ता दुरूस्त करण्यात आला. सद्यस्थितीत महाबळेश्वरपर्यतचा रस्ता काही ठिकाणी अरूंद तसेच काही प्रमाणात वाहतुकीस धोकादायक असूनही एस.टी.बसेस, जीप आणि अन्य वाहनांची वाहतूक सुरू आहे. मात्र, पावसाळयामध्ये पुन्हा या घाटरस्त्याला धोका निर्माण होणार असल्याने या घाटरस्त्याचे रूंदीकरण करण्याची गरज आहे. केंद्रीय भुपृष्ठ वाहतुकमंत्री ना.नितीन गडकरी यांनी करंजाडी रेल्वे स्थानकापासून विन्हेरे काटेतळी पोलादपूरमार्गे महाबळेश्वरपर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित करून आंबेनळी घाटाचे म्हणजेच फिटझगेराल्डचे रूंदीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. यामुळे या मार्गावरून पर्यटन विकास तसेच ऐतिहासिक दर्शन साध्य होणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.