चाळीसगाव वारकरी सांप्रदायाचे दुसरे कीर्तन महोत्सव उत्साहात संपन्न
सिटी बेल ∆ नागोठणे ∆ महेश पवार ∆
सद्गुरू श्री गणपतबाबा अलिबागकर महाराज प्रेमवर्धक वारकरी सांप्रदाय, स्वानंद सुख निवासी सद्गुरू स्वामी गणेशनाथ महाराज सांप्रदाय व आदिनाथ नामधारक सांप्रदाय यांच्या आशीर्वादाने चाळीसगाव वारकरी सांप्रदाय, नागोठणे विभाग यांच्या वतीने नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेच्या प्रांगणात आयोजित केलेला दुसरा कीर्तन महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
चाळीसगाव वारकरी सांप्रदायाचे संस्थापक ह.भ.प. रायगड भूषण दळवी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन दिवसांच्या भरगच्च सोहळ्यात विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा सांप्रदायाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कीर्तन महोत्सवात ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या ९ व्या व १२ व्या अध्यायाचे पारायण, अखंड हरीनाम तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कीर्तन महोत्सवास आमदार रविशेठ पाटील, शिवसेना नेते किशोरभाई जैन, श्री जोगेश्वरी माता देवस्थान विश्वस्त समितीचे सचिव भाई टके, रोहा तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष शिवरामभाऊ शिंदे, नागोठण्याचे सरपंच डाॅ. मिलिंद धात्रक, शिवसेना विभाग प्रमुख संजय भोसले, पेण संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष उदय जवके, राष्ट्रवादीचे नेते विलास चौलकर, एकनाथ ठाकूर आदींसह अनेक मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
या कीर्तन महोत्सवाची सुरुवात मंगळवारी (दि.१७) सकाळी नऊ वाजता मंगल पूजनाने झाली. त्यानंतर दीप प्रज्वलन, मंगल पूजन, कलश पूजन, ध्वजारोहण, वीणा पूजन, श्री ज्ञानेश्वरी पूजन, नंतर श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन, सायंकाळी नागोठणे विभागातील चाळीसगाव वारकरी सांप्रदायाचे सामुदायिक हरिपाठ होऊन व रात्री ७ वाजता जळगाव येथील प्रसिद्ध कीर्तनकार खानदेश्वररत्न ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली जळकेकर यांच्या प्रबोधनपर कीर्तनाचा भाविकांनी लाभ घेतला.
या कीर्तन महोत्सवाच्या दुस-या दिवशी बुधवार दि. १८ मे रोजी सकाळी दहा वाजता वाणीभुषण, भिवंडी येथील ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाने या कीर्तन महोत्सवाचा समारोप करण्यात आला.
हा किर्तन महोत्सव यशस्वी होण्यासाठी या कीर्तन महोत्सवाच्या आयोजक समितीचे अध्यक्ष ह.भ.प. हिराजी महाराज शिंदे, कार्याध्यक्ष के.के. कुथे भाऊसाहेब, उपाध्यक्ष ह.भ.प. नानाजी महाराज शिरसे, खजिनदार उदंड(आप्पा) रावकर व सचिव घनश्याम जंगम, सहखजिनदार तुकाराम राणे, सहसचिव ह.भ.प. नरेश महाराज जाधव, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज हाडपे, ह.भ.प. गजानन महाराज बलकावडे, ह.भ.प. दिलिप महाराज शिंदे, बापू महाराज रावकर, रमेश महाराज तुरे, नागोठणे वारकरी सांप्रदायाचे अध्यक्ष रतन हेंडे, विजयभाऊ शहासने, किशोर नागोठणेकर, ज्ञानेश्वर शिर्के, संतोष इप्ते, नागोठणे विभाग चाळीसगाव वारकरी सांप्रदायचे सर्व पदाधिकाऱ्यांसह आयोजक समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी मेहनत घेतली.
Be First to Comment