Press "Enter" to skip to content

पेण पत्रकारांचे तहसीलदारांना निवेदन

मुंबई – गोवा महामार्गाला दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचेच नाव द्या

सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆

मुंबई गोवा महामार्गाला आद्य पत्रकार, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्यावे या मागणीसाठी कोकणातील सर्व तालुक्यातील पत्रकारांनी निवेदन दिले. आज पेण तालुक्यातील पत्रकारांनी पेण तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना याबाबत निवेदन दिले.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडसह कोकणातील पत्रकारांनी सातत्यानं दहा वर्षे रस्त्यावर उतरून लढा दिला. महाराष्ट्रा पासून दिल्लीपर्यंत पाठपुरावा केल्यानंतर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले. काम रखडल्यानंतर देखील वेळोवेळी पत्रकारांनी पाठपुरावा केला होता. पत्रकार लढत होते तेव्हा सर्व राजकीय पक्ष मूग गिळून गप्प होते. मात्र आता रस्त्याचे काम पूर्णत्वास येत असताना अनेक नेते श्रेय लाटण्यासाठी समोर येत आहेत. तसेच काहींनी महामार्गासाठी वेगवेगळी नावं सूचवून मोडता घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे कोकणचे सुपूत्र आहेत. पत्रकारांमुळे हा महामार्ग होत असल्याने बाळशास्त्रींचे महामार्गाला नाव देणे औचित्यपूर्ण ठरणार असल्याने सरकारने तातडीने तसा निर्णय घ्यावा अशी मागणी कोकणातील सर्व पत्रकार करीत आहेत.

विविध प्रकल्पांना राजकीय नेत्यांची नावं दिली जात असतात. मुंबई – गोवा महामार्गाला एक पत्रकार, विचारवंत, समाजसुधारक असलेल्या बाळशास्त्रींचे नाव देऊन औचित्य साधावे अशी भावना राज्यातील पत्रकारांची आहे.

मुंबई – गोवा महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्यावे या मागणीसाठी कोकणातल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यातील पत्रकारांनी तालुका पातळीवर तहसिलदारांना निवेदनं दिले.

अशाच प्रकारचे निवेदन पेण तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांना पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी कोकण विभागाचे सचिव विजय मोकल, उपाध्यक्ष सुनील पाटील, सदस्य कमलेश ठाकूर, संतोष पाटील, प्रकाश माळी, राजेश कांबळे, स्वप्नील पाटील, विनायक पाटील, प्रशांत पोतदार, किरण बांधणकर, अरविंद गुरव, मीतेश जाधव आदीं पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.