भारतात २ करोड ३४ लक्ष नागरिक उच्च रक्तदाबाचे नियमित रुग्ण
सिटी बेल ∆ आरोग्य प्रतिनिधी ∆
वर्ल्ड हायपरटेन्शन लीगच्या वतीने दरवर्षी १७ मे हा दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिन म्हणून पाळला जातो. रक्तदाब नियंत्रणात असेल, तर हृदयविकार व इतर आजारांची गुंतागुंत होण्याची शक्यता बरीच कमी होते. त्यामुळेच घरच्या घरी नियमितपणे रक्तदाबाची तपासणी करण्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. कोरोना महामारीनंतर उच्च रक्तदाब वाढल्याचे निरीक्षण मुंबईतील अपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे. गेल्या आठ दिवसात आम्ही २२० नागरिकांचा नियमित रक्तदाब तपासला असता उच्च रक्तदाबाचे रुग्ण वाढत असल्याचे निरीक्षण समोर आले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना अपेक्स हॉस्पिटलचे हृदयविकार तज्ञ डॉ. हेमंत खेमानी सांगतात, ” रक्तदाब हा बदललेल्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेला आजार आहे. गेल्या काही वर्षांत त्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. म्हणूनच अति किंवा कमी रक्तदाब निष्पन्न झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो वेळेत ओळखणे महत्वाचे आहे. २०१३ साली भारतामध्ये १५ कोटी उच्च रक्तदाबाचे रुग्ण होते या दहा वर्षात हा आकडा नक्कीच डबल अथवा त्यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. दिवसेंदिवस हृदयविकाराचे प्रमाण वाढते आहे. त्याचा महत्त्वाचा धोक्याचा घटक आहे अति रक्तदाब (Hypertension). दिवसेंदिवस अति रक्तदाबाचे प्रमाणसुद्धा वाढते आहे. तो फक्त वयस्कर व्यक्तींचा आजार राहिला नसून त्यांची पाळेमुळे तरुण पिढीमध्ये रुजली आहेत.
आजच्या धकाधकीच्या, स्पर्धात्मक, यांत्रिक युगात तणावाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तरुण पिढीमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत चालले आहे. उच्च रक्तदाब वेळीच नियंत्रणात आणला नाही तर अशा व्यक्तींना पुढे हृदयविकार किंवा इतर दुष्परिणाम होऊ शकतात. शरीरातील सर्व अवयवांना रक्तपुरवठा होण्यासाठी रक्ताभिसरण आवश्यक आहे आणि रक्ताभिसरण सुरळीत होण्यासाठी योग्य रक्तदाब आवश्यक आहे.

व्यक्तीचा वरचा रक्तदाब म्हणजेच सिस्टोलिक ब्लड प्रेशर १४० एमएमएचजीपेक्षा जास्त असेल आणि खालचा रक्तदाब म्हणजेच डायस्टोलिक ब्लड प्रेशर ९० एमएमएचजीपेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीला उच्च रक्तदाब आहे, असे जागतिक आरोग्य संघटना म्हणते. वय, अनुवंशिकता, पौष्टिक आहाराचा अभाव तसेच वेळीअवेळी खाणे, स्थुलता, अपुरी झोप, मांसाहाराचे अतिसेवन, तेलकट पदार्थ, तिखट पदार्थ आणि जंक फूडचे अतिसेवन, स्टेरॉइड्सचा वापर आदी घटक उच्चरक्तदाबाला कारणीभूत ठरतात.”
नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरचे हृदयशल्यविशारद डॉ. महेश घोगरे म्हणाले, हायपरटेन्शनला ‘सायलेंट किलर’ म्हणून ओळखले जाते. ५० % पेक्षा जास्त रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षण न जाणवता बऱ्याच वर्षांपासून उच्च रक्तदाब असतो आणि शरीराच्या महत्त्वपूर्ण अवयवांमधील रक्तवाहिन्यांना हानी पोहोचवित असतो.
काही रुग्णांना हायपरटेन्शनमुळे डोकेदुखी, हृदयाचे ठोके कमी जास्त होणे, छातीत दुखणे आणि श्वासोच्छ्वासास त्रास यासारख्या लक्षणांचा अनुभव येऊ शकतो. मार्गदर्शक तत्त्वे नेहमीच १८ वर्षे वयापासून रक्तदाब तपासण्याची शिफारस करतात, कारण लहान वयोगटातील उच्च रक्तदाब वाढत असते आणि जीवनशैलीतील बदलांमुळे पुढे वाढण्याची शक्यता असते.








Be First to Comment