Press "Enter" to skip to content

रायगड जिल्हा परिषदेचा अजब कारभार

महिला व बाल विकास व आरोग्य विभागाची पुस्तके रात्री रस्त्यावर !

सिटी बेल • अलिबाग • अमूलकुमार जैन •

रायगड जिल्हा परिषदेचा अजब कारभार अलिबागच्या सजग नागरिकांमुळे चव्हाट्यावर आला आहे. महिला व बाल विकास व आरोग्य विभागाची नवीन पुस्तके रात्री रस्त्यावर ठेवली असल्याची बाब उघड झाली आहे. अलिबागमधील सजग नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांना दूरध्वनी करून याबाबत माहिती दिली.

सावंत यांनी याबाबत रात्री १०.४५ मिनिटांनी पहाणी केली असता ही बाब खरी निघाली. अलिबाग येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ इमारतीच्या बाजूला रस्त्यावर नवीन पुस्तकांचे गठ्ठे पडलेले त्यांना दिसून आले.

कोव्हीडच्या साथीमध्ये लहान मुलांची घ्यावयाची काळजी, सूचना इत्यादी बाबतची ही पुस्तके असल्याचे प्राथमिक दृष्टया दिसून आले आहे. कोव्हीडच्या साथी मध्ये शासनाने करोडो रुपये उपाय योजना व प्रतिबंधात्मक मार्गदर्शन यासाठी खर्च केले आहेत. अर्थात यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी वारंवार केलेला आहे. करोडो रुपयांची बिले काढून छापलेली ही पुस्तके अशी रात्री रस्त्यावर निष्काळजीपणे ठेवल्याने अधिका-यांना शासनाच्या पैशाची किंमतच नाही अशी टीका सावंत यांनी केली आहे. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील आता काय कारवाई करतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.