अलीबाग तालुक्यातील वाडगावमध्ये बेकायदेशीर खोदकाम, प्रशासनाचे दुर्लक्ष
सिटी बेल • अलिबाग • धनंजय कवठेकर •
वाडगाव येथील डोंगरभागात असलेल्या सरकारी गुरचरण जागेत बेकायदेशीररित्या खोदकाम सुरु आहे. येथील सरपंच, त्यांचे पती व माजी सरपंच यांच्या कृपेने हा प्रकार सुरु असताना ही स्थानिक तलाठी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. या खोदाईमुळे तळीयेची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही, त्यामुळे हे खोदकाम तात्काळ थांबविण्यात यावे अशी मागणी वाडगाव येथील ग्रामस्थ प्रवीण थळे यांनी केली आहे.
अलिबाग तालुक्यातील वाडगाव हे डोंगराच्या पायथ्याशी आहे. डोंगराची जमीन सरकारी गुरचरणमध्ये येते. या डोंगरावर गेल्या सहा वर्षपासून सरपंच व त्यांचे पती तसेच माजी सरपंच यांच्या संगनमताने खोदला जात आहे. मात्र त्यासाठी लागणारी रॉयल्टी भरली जात नाही. बेकायदेशीररित्या खोदकाम करीत असतानाही आपल्या विभागातील अधिकारी कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

या डोंगराच्या अनाधिकृत खोदाईमुळे वाडगाव गावामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पोसरे, व मळीन तसेच रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीयेची पुनरावृत्ती होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
भविष्यात पावसामध्ये दरड कोसळून डोंगरातील माती खाली येऊन वाडगाव संपुर्ण नष्ट होण्याची भिती आहे. याबाबत अनेक वेळा आपल्या कार्यालयात तक्रार करण्यात आली आहे. मात्र त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत आहे.
पोकलन, जेसीबी डंपरच्या मदतीने डोंगरामध्ये खोदाई करून तेथील माती काढण्याचे काम राजरोसपणे सुरु आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वाडगाव येथील डोंगरावर सुरु असलेली बेकायदेशीर खोदाईन तात्काळ थांबविण्यात यावी अशी मागणी प्रवीण थळे यांनी केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.








Be First to Comment