सिटी बेल • नागोठणे • याकूब सय्यद •
रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी रमजान ईद सणाच्या अनुषंगाने व सध्या संपूर्ण राज्यात लावस्पीकर वरून सुरू असलेल्या गदारोळ या पार्श्वभूमीवर जिल्हा शांतता समितीचे सदस्य यांची रोहा उपविभागीय बैठक नागोठणे पोलिस ठाण्यात आयोजित केली होती.
शांतता कमिटीच्या बैठकीत रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, पाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगंडे, नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर, कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव, जिल्हा शांतता समितीचे सदस्य रविंद्र लिमये रोहा येथील डॉक्टर फरीद चीमावकर, प्रदीप देशमुख, नागोठणे येथील पत्रकार याकूब सत्तार सय्यद, अब्दुल अजीज पानसरे, बिलाल कुरेशी, रोहा पंचायत समिती सदस्य वसंत जाधव, किशोर म्हात्रे, साईनाथ धुळे, प्रकाश कांबळे, महेंद्र दिवेकर, महेश कोलटकर यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.
या शांतता कमिटीच्या बैठकीत रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी रमजान ईद निमित्ताने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत सर्वांनी आनंदात हा उत्सव सादर करायचा आहे. आपल्या गावात व शहरात शांतता भंग होणार नाही याची दक्षता घेऊन हिंदू-मुस्लीम एकता कायम ठेवून एकत्रित राहायचे आहे, तसेच सोशल मीडिया वरून दोन्ही समाजामध्ये कोणीही तेढ निर्माण करण्याचा कृत्य केल्यास किंवा पोस्ट टाकल्यास त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
त्यासाठी सर्वांनी त्या गोष्टीची काळजी घेणे अतिशय महत्वाचे तसेच गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत सर्वांनी जबाबदारीने वागणे समाज हित करिता योग्य आहे. कोणीही समाज कंटक गैरकृत्य करताना आढळल्यास त्वरित पोलिसांना कळविण्यात यावे गावाच्या बाहेरील अन्य कोणत्या व्यक्तीच्या अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या गावात व शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची देखील सर्वांनी खबरदारी घ्यावी असे रायगड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक माननीय अशोक दुधे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे रायगड जिल्ह्यातील जनतेला आवाहन केले आहे.








Be First to Comment