Press "Enter" to skip to content

पद्मश्री डॉ.हिंमतराव बावस्कर यांची मॅरेथॉन मुलाखत

विंचूदंशावर प्रादुशिनी ड्रग्जचा यशस्वी वापर करणारा जगातील पहिला डॉक्टर

प्रादुशिनी आणि प्रतिलशीचा एकाचवेळी वापर विंचूदंश रूग्णांच्या तब्येतीत वेगाने प्रगती घडवू लागला – : पद्मश्री डॉ.हिंमतराव बावस्कर यांची स्पष्टोक्ती

सिटी बेल • शैलेश पालकर • पोलादपूर •

विंचुदंश प्रतीलशीचे संशोधनाचे श्रेय हे हाफकीन इन्स्टिटयूट आणि हाफकीनच्या संशोधकांच्या आहे. पद्मश्री मिळालेल्या डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी हे संशोधन स्वत:चे असल्याचे खोटे सांगणे ही अतिशय गंभीर बाब असल्याचा आरोप डॉ. विवेक नातू यांनी सोमवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला. विंचुदंश प्रतीलस उपलब्ध नव्हती, तेव्हा डॉ.बावस्कर यांच्या उपचारपध्दतीमुळे मृत्यूदर कमी झाला हे डॉ. विवेक नातू यांना मान्य असून, त्यात डॉ.बावस्कर यांचे योगदान डॉ. विवेक नातू नाकारत नाहीत. सन 1997 पासून विंचुदंश प्रतीलस उपलब्ध आहे. 2008 पर्यंत म्हणजे जवळजवळ 11 वर्षे डॉ. बावस्कर विंचुदंश लस उपयोगी नाही, असे सांगत होते. त्यानंतर त्यांनी घूमजाव कसे केले,’ असा प्रश्न याच विषयावर संशोधन केलेल्या डॉ. विवेक नातू यांनी उपस्थित केला आहे. याबाबत पद्मश्री डॉ.हिंमतराव बावस्कर यांच्यासोबत मुलाखतीसदृश्य प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर डॉ.बावस्कर यांच्या रूग्णसेवेबाबतचा विश्वास अधिकच दृढ होईल, अशी माहिती प्राप्त झाली.

महाड आणि कोकणातील डॉ.हिंमतराव बावस्कर यांनी विंचूदंश, सर्पदंश, कोरोना काळातील इंजेक्शनविना उपचार पध्दती याद्वारे केलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील मानवसेवेनंतर त्यांना पद्मश्री जाहिर झाला आणि त्यानंतर पुण्यातील हाफकिनच्या श्रेय चोरल्याबाबत मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आरोप केला जातो. पाहुयात याबाबत डॉ.बावस्कर यांचे काय म्हणणे आहे ?

डॉ.बावस्कर : आरोप करणारे डॉक्टर हाफकिनचे नाहीत. ते चिपळूण व माणगांव येथील आहेत. पद्मश्री पुरस्कार मिळण्यासाठी मी संशोधन केले नसून मानवजातीला उपयुक्त ठरण्यासाठी संशोधन केले. 1976 साली महाड कोकणात आल्यानंतर विंचूदंश रूग्णांवर उपचार सुरू केले. मात्र, मृत्यूचे प्रमाण 30 टक्के एवढे चिंताजनक होते. त्यामुळे संशोधन करण्याची गरज भासली. विविध उपचार प्रयोग करून विंचूदंश झालेले रूग्ण वाचविण्याचा प्रयत्न केला. कोणतीही उपचारपध्दती व साधनसामुग्री निदान आणि वैद्यकीय साह्यासाठी उपलब्ध नसताना प्रयत्न सुरू होते. अशातच 1987 साली प्रादूशिनी नावाचे औषध उपलब्ध झाले. त्याचा वापर करणारा मी जगातील पहिलाच डॉक्टर होतो. याचा मी त्यावेळी लॅन्सेंट वैद्यकीय नियतकालीकामध्ये उल्लेख केला होता. त्यावेळी कोणतीही लस अथवा प्रतिलस अस्तित्वात नव्हती. प्रादुशिनीचा वापर करून विंचूदंश रूग्णांच्या दगावण्याचे प्रमाण 30 टक्क्यांवरून 4 टक्केपर्यंत आणले. यासाठी अनेक डॉक्टर सहकाऱ्यांना प्रशिक्षित केले. मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याने डॉक्टरमंडळी खुश होती. यासाठीच मी प्रतिलस अथवा लस शोधण्याकामी विरोध करीत होतो की आता प्रादुशिनी हे औषध उपलब्ध असून योग्य उपाय करीत होते. लस तयार करायची झाल्यास विंचू शोधून आणावे, विष संकलित करायचे, घोडा आणि खेचरांवर विषाची मात्रा देऊन त्यांच्या रक्ताचे नमूने संकलित लस किंवा प्रतिलशीची निर्मिती करायची, यासाठी लॅबोरेटरी आणि सायंन्टीस्टपासून मोठया प्रमाणात आर्थिक तसेच मनुष्यबळ उभे करावे लागल्यास प्रभावी प्रादूशिनी हे औषध उपलब्ध असताना तयार होणारी लस अथवा प्रतिलस खर्चिक होऊन विंचूदंश रूग्णास परवडणारी नसेल, या हेतूने मी सुरूवातीला विरोध केला. जेव्हा 1997 मध्ये प्रतिलस आणली तेव्हा डॉ.नातू आणि सहकाऱ्यांनी व्हि.एस.मेडीकल कॉलेजमध्ये ट्रायल सुरू केली आणि प्रतिलस उपलब्ध झाल्याचे जाहिर केले. हे त्यांचेच क्रेडीट आहे हे मान्य आहे. 2011 मध्ये संशोधनादरम्यान मी विंचूदंश रूग्णांना प्रादुशिनीसोबतच या प्रतिलशीचाही वापर केला असता निरिक्षणांती रूग्ण वेगाने बरे होण्यास प्रतिलस उपयुक्त असल्याचे आढळून आले. विज्ञानामध्ये परिवर्तनशीलता असते. नवनवीन शोध लागत असतात. पूर्वीची मते बदलत असतात नवीन मते काही काळ रूढ राहून कालांतराने ती देखील बदलतात ही प्रक्रिया सुरू असते. प्रादुशिनी आणि प्रतिलशीच्या एकाचवेळी सोबत वापराने मृत्यूदर झपाटयाने कमी झाल्याने 2010 मध्ये डॉ.नातू यांनी जे आर्टीकल लिहिले त्याचा संदर्भ देऊन मी प्रादुशिनी व प्रतिलस यांचा सोबत वापर करून केलेल्या उपचाराबाबतच्या माझ्या विषयामध्ये डॉ.नातू यांना प्रतिलस संदर्भात स्पष्टपणे क्रेडीट दिले आहे तर मग यात चोरला म्हणण्यासारखे काय आहे ?दुसरी गोष्ट पद्मश्री पुरस्कार कमिटी देत असते. त्यासाठी वैद्यकीय जीवनातील विविध योगदानाचा विचार केला जात असतो. केवळ विंचूदंश उपचार पध्दतीसाठी पद्मश्री नसून डॉ.बावस्करांनी आयुष्यभर केलेल्या संशोधनाद्वारे मानवसेवा केल्यासाठी आहे. यामध्ये विंचूदंशापाठोपाठ सर्पदंशदेखील 30 टक्क्यांवरून 4 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. याखेरिज फॉरॉन्सिक्युया डायग्नोस केला आहे. विदर्भातील अमरावती, अकोला आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यातील तरूण शेतकऱ्यांमध्ये होणाऱ्या किडनी फेल्युअरवर संशोधन करून सुचविलेल्या उपायांमुळे सरकारला तेथे भुजल देण्याऐवजी जमिनीवरील जलस्रोत निर्माण करून त्यांचे शुध्दीकरण करावे लागले. सुमारे साठ तरूण शेतकऱ्यांना तसेच माती, पाणी व दगडांचाही अभ्यास करून कॅडमियम आणि लेड यांचे प्रमाण अधिक असल्याने शरीरामध्ये या पाण्याद्वारे किडनी हा अवयव निकामी होत असल्याचे लिहिले. यासंदर्भात अमेरिकेमध्ये संशोधनपर लेख प्रसिध्द झाल्याने शासनाला याची दखल घ्यावी लागली. अल्झायमर्स सारखा स्मृतीभ्रंश सदृश्य आजार समजून येण्यासाठी न्यूरोसर्जनकडे जाण्याआधीच रूग्ण उपचार करण्यापलिकडील अवस्थेत पोहोचला असतो. याबाबतदेखील संशोधन करून उपाययोजना सुचविल्या. थॉयरॉईडबाबत संशोधन करून आयोडीन मीठामुळे हा आजार बळावत असल्याचे सिध्द केले. बी-12 म्हणजेच बी ट्वेल्व बाबत केलेल्या संशोधनामध्ये पूर्ण शिजविलेल्या भाज्या आणि मांसाहारामधून बी-12 नष्ट होत असून गोळयांद्वारे बी-12 दिल्यास ते पुरेसे नसते. इन्टेस्टाईनमध्ये बी-12ची निर्मिती होत असून आदिवासी लोकं कच्च्या भाज्या, कंदमुळे तसेच भाजून कमी शिजलेल्या खेकडया व मासळीचा आहार करीत असल्याने बी-12 मुबलक प्रमाणात शरिरात निर्माण होत असते. नागरी जीवनात माणसांच्या शरिरामध्ये बी-12 च्या निर्मितीसाठी आम्ही दही खाण्याचे प्रमाण वाढविण्याचा सल्ला देत असतो हा शोध आम्ही लावला आहे. ज्या माणसांच्या कानावर पट्टी आली अशांना हार्ट डिसीज लवकर होत असल्याचे संशोधन करून त्यास लवकरात लवकर उपचार करण्याची संधी मिळू शकते. जगातील एकूण 347 पब्लिकेशनपैकी 108 पब्लिकेशन गुगलवर माझ्या नावावर ऑथोराईज आहेत. मणेर नावाचा साप रात्री घरात दबा धरून बसतो त्याचे दांत लहान असतात तो चाटून जातो असे म्हणतात. त्याच्या दंशावर उपचार करण्यासाठी तो साप चावल्याचे निदान करण्याची आवश्यकता असते अन्यथा अन्य आजारांची लक्षणे रूग्णांमध्ये दिसतात. यासंदर्भात आपण असंख्य डॉक्टरांना प्रशिक्षित केले असल्याने रूग्णांच्या भागातच तातडीने वैद्यकीय उपचार करणारी डॉक्टरमंडळी उपलब्ध झाली आहेत.

दंश हा शब्द आला अथवा उपचार आणि माणूस वाचविण्याची वेळ आली की डॉ.बावस्कर यांच्याकडे जायला पाहिजे, हे महाडच नव्हे कोकणात सर्वत्र माहिती आहे. विषारी मद्य प्यायलेल्यांवर उपचार करताना डॉ.बावस्कर यांच्याकडून आगळीवेगळी उपचार पध्दती करताना जी हिंमत दाखविली गेली तो काय विषय आहे ? या भागातील स्थानिक पत्रकार असल्यामुळे ही घटना माहित आहे.

डॉ.बावस्कर : महाड तालुक्यातील बिरवाडी येथे असताना 1996 दरम्यान रात्री नऊ साडेनऊ वाजता दवाखान्यामध्ये वाळण जाधववाडी येथे विषारी मद्य म्हणजे खोपडी दारू पिऊन आठ दहा माणसं गंभीररित्या अत्यवस्थ झाल्याची आणि दोन मृतदेह आणल्याची माहिती प्राप्त झाली. सर्वांनी खोपडी हे विषारी गावठी दारू प्यायले असल्याची माहिती पक्की झाल्यानंतर मी महाड शहरातील जोशीच्या देशी विदेशी दारूच्या दुकानातून चांगल्या दारूच्या चार पाच बाटल्या विकत घेऊन उपचारासाठी वापरल्या. रूग्णांना अल्कोहल दिले आणि त्यांच्यातील विषारी अल्कोहलचे प्रमाण कमी होऊन त्यावेळी उर्वरित रूग्ण वाचले आणि सुस्थितीत आले. हा केवळ ते मरत आहेत तर वाचविण्याचा प्रयत्न करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

उपचार पध्दतीचे जनक म्हणजे डॉ.बावस्कर असे म्हटले तर वावगे ठरत नाही. दंश, विषबाधा आणि कोणत्याही आजारावर प्रायोगिक पध्दतीने उपचार करणे महाडकर नागरिकांना डॉ.बावस्करांकडे गेल्यावर जीवदान असल्याचा आत्मविश्वास वाटतो, हा प्रकार काय आहे ? कोविड-19 काळातही रेमडीसिव्हीरऐवजी इंजेक्शनविरहित उपचार पध्दती केली कुठून येतात अशा कल्पना ?

डॉ.बावस्कर : मी एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझी नैतिक कर्तव्यभावना आहे. माझा भाऊ, माझे वडील, माझा मुलगा, अशी नाती जिवानिशी जाणार असतील तर काही तरी उपाय केले पाहिजेत. काम… काम… आणि काम… याखेरिज काहीच केले नाही आम्ही गोवा देखील बघितले नाही. काम करणं महत्वाचं आहे. रेमेडीसीव्हर नसताना साध्या गोळया देऊन मिथीलीन बी देऊन नाकामध्ये बेटाडीन टाकायचो, ऑक्सीजनचे सिंलींडर एमआयडीसीमधून सहकार्य मोठया प्रमाणात झाले. अनेक व्हीआयपी लोकांसाठी घरांमध्ये जाऊन उपचार केले. सुरूवातीला कोणतेही औषधं नसताना आठशेहून अधिक लोकांवर घरी उपचार केले.

2019 ते 2022 या काळामध्ये डॉ.हिंमतराव बावस्कर हे नांव हजारभर लोकांना वाचविणारे असताना केवळ पत्रकार परिषद घेऊन त्या माध्यमातून त्यांच्याप्रती कलुषित वातावरण निर्माण करण्याचा प्रकार कितपत योग्य ?

डॉ.बावस्कर : ही व्यक्तीगत मानसिकता आहे. त्यांनी कसे वागावे काय बोलावे यावर आपण कशाला प्रतिक्रिया द्याव्यात ? आम्ही या कोविड काळात सुमारे 3 हजार लोकांना वैद्यकीय उपचाराचा लाभ दिला. आपल्याला संशोधन करायचे असेल तर स्वत:ची मानसिकता निखळ ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे या वादात पडायचे नाही.

हाफकिन इन्टीटयूटमधील संशोधनाचा उल्लेख करताना डॉ.तात्यासाहेब नातू, बॅ.अंतुले. डॉ.काणकोणकर तसेच अन्य घटनाक्रमांची मांडणी करून बातमी खरी वाटेल असा इतिहास मांडला गेला. मात्र, 1976 साली हाफकीनमध्ये काय परिस्थिती होती ? बॅ.अंतुले यांनी मुख्यमंत्री असताना आणि केंद्रीय आरोग्यमंत्री असताना हाफकीनची परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला होता.याबाबत काय मत ?

डॉ.बावस्कर : 1976 साली हाफकीनबाबत न बोलणं योग्य ठरेल, बॅ.अंतुले साहेबांनी प्रत्येकवेळी सहकार्य केले हे खरे आहे. गरीबाच्या मुलांचा गरिबाचा जीव विंचू आणि सर्पदंशाने जातो हे न सोसणारे होते. लॅन्सेन्टमध्ये 25-30 वेळा संशोधन आणि उपचार पध्दतीवर लिहिले. पेशंटला काय होते यावरील निबंध प्रसिध्द झाला मग उपचार काय करायचे हे लिहिलं.

ग्रामीण रूग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी प्रतिलशीचा तुटवडा असल्याने काही घटना घडणे कितपत योग्य ?

डॉ.बावस्कर : प्रादुशिना आणि प्रतिलसींचा तुटवडा नाही. सरकार भरपूर देत असतो. पण डॉक्टरांना सपोर्ट करण्याची गरज आहे. प्रतिलस का देताना घाबरतात तर रिऍक्शन येते. पण आपण कधीही पेशंट पाठवा असा आग्रह धरला नसून मोफत उपलब्ध झालो आहे. किमान फोन आला तरी सल्ला देणार मोफत. पेशंट येणे म्हणजे फेल्युअर असल्याचे मत आहे.

प्रादुशिना असो अथवा प्रतिलस असो मानव कल्याणासाठी वापर केला गेलाच पाहिजे. विंचूदंश सर्पदंशातून जीव वाचलेच पाहिजेत. काय उपदेश कराल पद्मश्री डॉ.बावस्कर म्हणून ?

डॉ.बावस्कर : सरकारने प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टरांना चांगल्या सुविधा चांगला पगार तसेच त्यांच्या मुलांना चांगली शिक्षणसुविधा देण्याची गरज आहे. सरकारी डॉक्टरांना चांगले एअरकंडीशन्ड बंगला राहायला द्या. डॉक्टर रात्री अपरात्री उपलब्ध राहिलेच पाहिजेत अशी व्यवस्था करा. आरोग्य कर्मचारीदेखील केव्हाही उपलब्ध राहायला पाहिजेत. त्यामुळे रूग्ण येण्यावेळी आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर्सदेखील उपलब्ध राहतील, असे नियोजन करणे सरकारची जबाबदारी असावी.

डॉ.बावस्कर हे आठवडयाचे सातही दिवस चोवीस तास दररोज उपलब्ध राहिल्यानेच त्यांचे हे पद्मश्रीपर्यंतचे मानवसेवेचे यश दिसून येत आहे. कशाप्रकारे मानसिकता बाळगली आहे ?

डॉ.बावस्कर : पोलादपूर येथील आरोग्य केंद्रामध्ये असताना पहिला उपचार झालेले विंचूदंश रूग्ण ह.भ.प.मारूती कळंबे होते. यानंतर दिवसरात्र खेड, पनवेल, माणगांव, महाड, मंडणगड, चिपळूण अशा कोणत्याही भागातून विंचूदंश व सर्पदंशावरील रूग्णांची उपचारासाठी नातेवाईकांसोबत गर्दी होत असे. त्याकाळी मी माझ्या सरकारी निवासस्थानी राहात असे. परिणामी, रूग्णांवर तातडीने उपचार करण्यास उपलब्ध होत असे. पण एकेदिवशी वॉचमनला वाटले डॉक्टर आताच तासाभरापूर्वी रूमवर गेले आहेत तर झोप लागली असेल म्हणून त्याने पेशंटच्या नातेवाईकांना परत पाठविले आणि याची जराही कल्पना मला देण्यात आली नव्हती. दुसऱ्यादिवशी एक वृध्द पिता आला आणि म्हणाला, ‘डॉक्टरसाहेब, माझा मुलगा वारला.’ मी सहजच विचारले ‘कशामुळे’ तर त्याने सांगितले, ‘डॉक्टरसाहेब, तुम्ही झोपायला रूमवर गेल्याचे वॉचमनने सांगितले म्हणून मुलाला महाडला हलविताना वाटेत जीव गेला.’ त्या दिवसापासून मी माझा बेड पोलादपूरच्या सरकारी दवाखान्यामध्ये प्रवेशद्वाराजवळ रात्री लावण्यास सुरूवात केली म्हणजे पेशंटचे नातेवाईक पहिल्यांदा वॉचमनला नव्हे तर डॉक्टरांनाच भेटेल आणि पेशंटचा जीव वाचण्याचे प्रयत्न वेळीच होतील, अशी कार्यतत्परता मी नेहमीच दाखविली. सर्वच डॉक्टरांनी ही भूमिका घेतल्यास मृत्यूदर कमी होण्यासह वैद्यकीय क्षेत्रातील विविध प्रकारचा हलगर्जीपणाही कमी होईल, असा आशावाद व्यक्त केला.

पद्मश्री डॉ.हिंमतराव बावस्कर यांच्यासारख्या संशोधक आणि मानवसेवी डॉक्टरांविरूध्द आरोप करणाऱ्या डॉक्टरमंडळीना ज्याप्रकारे प्रेस कॉन्फरन्स या माध्यमाचा वापर केला ; त्यामुळे डॉ.बावस्कर जसे जरादेखील डळमळीत झाले नाही तसेच त्यांच्यावरील कोकणवासियांचा विश्वासही थोडादेखील ढळलेला दिसून येत नाही.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.