पाणीपुरवठा योजना भ्रष्ट्राचार प्रकरणी कडसुरे सरपंच राजेंद्र शिंदे यांची सरपंच व सदस्य पदावरून उचलबांगडी
कोकण विभागीय आयुक्तांचा आदेश : ग्रामस्थांनी केला फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष
फौजदारी गुन्हा दाखल न झाल्यास ग्रामस्थांचा आमरण उपोषणाचा इशारा
सिटी बेल • नागोठणे • महेश पवार •
राज्यात विविध भ्रष्ट्राचार प्रकरणी अनेक दिग्गजांना जेलची हवा खाण्याची वेळ आल्याचे आपण पाहिले आहे. असे असूनही त्यापासून बोध न घेता आपले कुणीही काही करू शकत नाही अशा तोऱ्यात मिरवणाऱ्या कडसुरे सरपंच राजेंद्र शिंदे यांना कोकण विभागीय आयुक्तांनी चांगलीच चपराक दिली आहे. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत नागोठण्याजवळील कडसुरे(ता.रोहा) गावातील नळ पाणीपुरवठा योजनेतील प्रचंड भ्रष्ट्राचार प्रकरणी दोषी ठरवत राजेंद्र शिंदे यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चा मुंबई अधिनियम.क्र. ३, कलम ३९(१) अन्वये सरपंच व सदस्य पदावरूनही काढून टाकण्याचे आदेश १९ एप्रिल, २०२२ रोजी काढले आहेत. या आदेशाची प्रत मिळताच, उशिरा का होईना सततच्या पाठपुराव्याला यश आल्याचा व सत्याचा विजय झाल्याचा आनंद कडसुरे ग्रामस्थांनी आदेशाची प्रत मोठ्या बॅनर स्वरुपात गावाच्या प्रवेशद्वारात भिंतीवर लावून व फटाक्यांची आतषबाजी करून विजयी जल्लोष साजरा केला. दरम्यान सरपंच राजेंद्र शिंदे यांच्यावर लवकरात लवकर फौजदारी गुन्हा दखल न झाल्यास आम्ही आमरण उपोषणास बसु असा इशारा कडसुरे ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिला.

कडसुरे नळ पाणीपुरवठा योजनेत पाणीपुरवठा योजनेचे तत्कालीन अध्यक्ष व विद्यमान सरपंच राजेंद्र यशवंत शिंदे यांनी लाखो रुपयांचा भष्ट्राचार केला असल्याची तक्रार कडसुरे ग्रामस्थ महेश गोपाळ शिंदे, दिलीप शिंदे, पांडुरंग शिंदे व इतर ग्रामस्थांनी यांनी २६ डिसेंबर २०१९ रोजी रोहा पंचायत समितीचे गटविकास अधिका-यांकडे केली होती. कडसुरे सरपंच राजेंद्र शिंदे हे पाणी पुरवठा योजनेतील भष्ट्राचाराबाबत जबादार असल्याचा अभिप्राय रायगड जिल्हा परिषदेचे मुख कार्यकारी अधिकाऱ्यांनी कोकण आयुक्तांना दिला होता. नंतर आयुक्त विलास पाटील यांनी सखोल चौकशी केल्यानंतर हे आदेश पारित केले आहेत.
याबाबत ज्येष्ठ ग्रामस्थ दिलिप महाराज शिंदे यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य तक्रारदार महेश शिंदे, माजी सरपंच दत्तात्रेय शिर्के, पांडुरंग शिंदे, दिलिप महाराज शिंदे, माजी सरपंच भाई शिर्के, काशीराम गवंडकर, धनंजय महाडिक, सुनील शिंदे, अनिल शिंदे, भानुदास शिंदे, निवृत्त ग्रामसेवक रामभाऊ शिंदे, कल्पेश शिंदे, समाधान शिंदे, ज्ञानदेव शिंदे, सुनिल शिर्के, विकास शिंदे, सुभाष शिर्के, भानुदास शिंदे आदी प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत माहिती देताना या लढ्याचे मुख्य शिलेदार महेश शिंदे, दत्तात्रेय शिर्के, दिलिप महाराज शिंदे व पांडुरंग शिंदे यांनी सांगितले की, आमच्या गावात पाणी पुरवठा योजनतील भष्ट्राचार प्रकरण हे गेली दोन वर्ष ग्रामस्थांच्या चर्चेतील महत्वाचा विषय होता. आज आम्हाला न्याय मिळाला याचा आनंद आम्हा ग्रामस्थांना निश्चितच आहे. परंतु सत्याला न्याय मिळण्यास उशीरच लागतो याची देखील खंत आहे. राजेंद्र शिंदे यांना आम्ही बिनविरोध सरपंच पद दिले परंतु ते स्वतःला किंगमेकर समजायला लागले. आमच्या गावात कुणीही किंगमेकर नाही आम्ही सर्व ग्रामस्थ किंगमेकर आहोत हे आजच्या निकालावरून सिद्ध झाले. सरपंचांनी आपल्या खुर्चीचा घेतलेला गैरफायदा व त्यातून केलेला प्रचंड भष्ट्राचार आज संपूर्ण जगाला दिसुन आला. आम्ही ग्रामस्थांनी एक होतकरू म्हणून सरपंच राजेंद्र शिंदे यांना नावारूपाला आणले परंतु त्यांनी गावातील घाणेरड्या विचारसरणीला बळी पडून स्वतःची “धोबिका कुत्ता ना घरका, ना घाटका” अशी स्वताची स्थिती करून घेतली असे शेवटी ग्रामस्थांनी पत्रकारांना सांगितले.
याप्रकरणी राजेंद्र शिंदे यांना दोषी ठरवितांना कोकण आयुक्तांनी काही निष्कर्ष नोंदविले आहेत. त्यानुसार राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम अंतर्गत कडसुरे गावातील नळ पाणीपुरवठा योजनेतील ४९ लाख ५४ हजार ६६१ रकमेची निविदा न काढता कायद्यानुसार भंग केल्याचे दिसुन येत आहे. तसेच बँक ऑफ इंडियाच्या नागोठणे शाखेतून ११ फेब्रुवारी, २०२० रोजी ३ लाख ५० हजार व १३ फेब्रुवारी, २०२० रोजी २ लाख स्वतःच्या नावे काढून आर्थिक घोटाळा केला असल्याचे स्पष्ट होत असल्याचे म्हटले आहे.

अन्यथा गावात कोणत्याही योजना पुन्हा आल्या नसत्या : भाई शिर्के
राष्ट्रीय पेय योजना पाणीपुरवठा योजनेतील भष्ट्राचार जर आम्ही ग्रामस्थांनी उघडकीस आणला नसता तर भविष्यात गावात कुठलीही योजना आली नसती. त्यामुळे पुढील पिढीस नाहक त्रास झाला असता. आमच्या लढ्याला यश आले याचा धडा पुढील येणाऱ्या सरपंच, सदस्यांनी घ्यावा व गावाची भरभराट करावी अशी अपेक्षा कडसुरे माजी सरपंच भाई शिर्के यांनी व्यक्त केली
या लढ्याचे यश सर्व ग्रामस्थांचे : पांडुरंग शिंदे
आम्ही आमच्या गावात झालेल्या भष्ट्राचाराबाबत सतत पाठपुरावा केला. त्याला यश आले त्यामुळे पुढील येणाऱ्या सरपंच व सदस्यांना भष्ट्राचार करताना आळा बसेल व आमची पुढील पिढी सुखी-समाधाने जगेल असे मत यावेळी या लढ्याचे गावातील मुख्य व्यक्तीमत्व पांडुरंग शिंदे यांनी सांगितले.
ग्रामस्थांनी मानले स्थानिक वृत्तपत्रांचे आभार
आम्ही गेले दोन वर्ष जरी लढा देत असलो तरी या लढ्याला काही ठराविकच स्थानिक वृत्तपत्रांनी सातत्याने प्रसिद्धी दिली. वृत्तप्रत्रे न्याय देण्याचे काम करतात हे आज सिद्ध झाले असल्याची भावना कडसुरे गावातील एक प्रमुख ज्येष्ठ व्यक्तीमत्व व माजी सरपंच दत्तात्रेय शिर्के यांनी व्यक्त करून आम्ही त्या स्थानिक वृत्तपत्रांचे व त्यांच्या प्रतिनिधींचे ऋणी आहोत असेही यावेळी दत्तात्रेय शिर्के यांनी सांगितले.








Be First to Comment