Press "Enter" to skip to content

ग्रामस्थांची शासकीय यंत्रेणेवर नाराजी

श्रीमंत ऐनघर ग्रामपंचायतीमधील सुकेळी धनगरवाडा रस्त्याच्या कामाला तरुणांकडून स्वखर्चाने सुरुवात

सिटी बेल • नागोठणे • महेश पवार •

जिंदाल समुहाच्या कंपन्यांचा समावेश असल्याने भरघोस उत्पन्न असलेल्या रोहा तालुक्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायतीमधील सुकेळी धनगरवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी नाकर्त्या शासकीय यंत्रणेची वाट न बघता दोन तरुण ग्रामस्थांकडून अखेर स्वखर्चाने सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक वर्षे रखडलेल्या या रस्त्याच्या कामाला गावातील स्थानिक तरुणांनी सुरुवात केल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदी वातावरण असले तरी शासकीय यंत्रणेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

सुकेळी धनगरवाड्यातील नागरीकांना येण्याजाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. पावसाळ्यात तर मार्गात येणारे छोटे-मोठे नाले पार करतांना जीव मुठीत घेऊन जावे लागत होते. पावसाळ्यात जर एखादा व्यक्ती आजारी पडला तर त्याला झोली करुन घेऊन गेल्याशिवाय काहीच पर्याय नसतो. असे असूनही या रस्त्याच्या कामाच्या निधीसाठी कुणीही प्रयत्न केल्याचे व त्याला यश आल्याचे दिसून आले नव्हते. असे असतांनाच गावातील युवा कार्यकर्ते राजेंद्र कोकळे व जगन कोकळे या दोघांनी पुढाकार घेत स्वखर्चाने रस्त्याच्या कामाला सर्व धनगरवाडा ग्रामस्थांच्या उपस्थितीत सुरुवात केली. यावेळी धनगरवाडा ग्रामस्थांच्या चेह-यावर वेगळाच आनंद पहावयास मिळाला.

स्वातंत्र्याची अनेक वर्षे उलटुनही श्रीमंत ऐनघर ग्रामपंचायत हद्दीतील सुकेळी धनगर वाड्याकडे जाणाऱ्या या रस्त्याकडे ना ग्रामपंचायतीने लक्ष दिले ना कोणत्या स्थानिक लोकप्रतिनिधीने की, कोणत्या आमदार-खासदाराने. निवडणुका आल्या की केवळ आश्वासनांची खैरातच आजपर्यंत ग्रामस्थांच्या नशिबी आली. त्यामुळेच धनगरवाड्यातील ग्रामस्थांमध्ये शासकीय यंत्रणेविरोधात अनेक वर्षे तीव्र संताप खदखदत होता. शेवटी कुणाचीही व कोणत्याही निधीची वाट न बघता येथील तरूणांनी पुढाकार घेतला.

ऐनघर ग्रामपंचायत हद्दीतील काही आदिवासी वाड्या या आजही अनेक समस्यांच्या विळख्यात आहेत. मग तो प्रश्न रस्त्याचा असो वा पिण्याच्या पाण्याचा. या समस्यांचा आम जनतेला सामना करावा लागत आहे. त्यामुळेच कोणत्याही निधीची वाट न पाहता या रस्त्याच्या कामाला तात्पुरत्या स्वरूपात का होईना सुरुवात केली असून भविष्यात ज्यावेळी निधी उपलब्ध होईल त्या वेळी चांगल्या पद्धतीचा रस्ता बनविणार असल्याचेही राजेंद्र कोकळे व जगन कोकळे यांनी सांगितले. या दोघांचेही सर्व ग्रामस्थांनी मनापासून आभार मानले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.