कोरोनाचा संसर्गं वाढत असतानाही जय प्रेसिजन कंपनी कडून कामगार भरतीसाठी मुलाखती सुरू
# सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे #
रसायनी मोहोपाडा परीसरातील एनआयएसएम सेबी रस्त्यालगत जय प्रेसिजन प्रोडक्ट ही कंपनी आहे.या कंपनीतील काही कामगारांना कोरोना विषाणुची लागण होवून त्यांचे कोरोना अहवालही पाॅजिटीव्ह येत आहेत.शिवाय कंपनीतील बरेच कामगार व त्यांचे कुटुंबीय विविध आजारात त्रस्त आहेत.यातच जय कंपनीने डाव साधून बाहेरील कामगार मुलाखती सुरू केल्याने त्या थांबविण्यासाठी वासांबेतील भाजपाचे विभाग अध्यक्ष सचिन तांडेल यांच्या नेतृत्वाखाली कामगार भरतीचा डाव हाणून पाडला. मोहोपाडा सेबी वलणावरील जय प्रेसिजन कंपनीतील काही कामगारांचे कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत, शिवाय अनेक कामगार ताप , खोकला व इतर आजारात त्रस्त झाले आहेत.परीसरात भितीचे वातावरण असतानाही जय कंपनीने शंभरपेक्षा जास्त बाहेरील नागरिकांना मुलाखतीसाठी बोलावून स्थानिकांना डावलण्याचा प्रयत्न करीत आहे, ही माहिती वासांबे मधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना समजताच वासांबे भाजपा जिल्हा परिषद अध्यक्ष सचिन रामदास तांडेल यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते जय प्रेसिजन कंपनीला जाब विचारायला गेले.यावेळी कंपनी आवारात आतमध्ये सोशल डिस्टिंक्शनचे पालन न करता जवळपास 60 ते 70 तरुण मुलाखतीसाठी एकत्र होते. हा कारभार पाहून सचिन तांडेल यांनी व्यवस्थापनाला धारेवरती धरून सवाल केले.कोरोना भितीमुळे स्थानिक कामगार कामावरुन जाण्यासाठी घाबरत आहेत.परंतु बाहेरून कामगार भरती करून, अगोदर असलेल्या स्थानिकांच्या नोकरींवर गदा आणण्याचा कंपनीचा डाव असल्याने हा डाव आम्ही आणून पाडू असा इशारा कंपनीला दिला आहे. यावेळेस सचिन तांडेल, मंदार गोपाळे, आकाश जुईकर,प्रमोद जांभळे, जयदत्त भोईर, प्रतीक पारंगे, भरत मांडे, प्रविण ठाकूर, विशाल मुंढे, दिलीप पाटील, निकेश पाटील, व अन्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
Be First to Comment