Press "Enter" to skip to content

आमदार अनिकेत तटकरेंच्या हस्ते सत्कार

बालेवाडीतील शरीर सौष्ठव स्पर्धेत चिकणीतील उदय देवरेची सुवर्णमय कामगिरी

सिटी बेल • नागोठणे • महेश पवार •

भारतीय बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने पुण्यातील बालेवाडी क्रिडा संकुलात नुकत्याच संपन्न झालेल्या मिस्टर इंडिया आणि मिस्टर युनिव्हर्स २०२२ या दोन्ही स्पर्धेतील ७० किलोग्रॅम वजनी गटात नागोठण्याजवळील चिकणी (ता.रोहा) गावचा सुपुत्र उदय राजाराम देवरे यांनी दोन सुवर्ण पदक पटकावत सुवर्णमय कामगिरी केली आहे.

याबद्दल आयोजकांच्या वतीने त्याचा सुवर्णपदक, चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. उदय देवरे यांनी यापूर्वीही मेन्स क्लासिक महाराष्ट्र श्री २०२२ व रायगड श्री २०२२ हे किताब मिळविले आहेत.

मिस्टर युनिव्हर्स उदय देवरे याच्या या यशाबद्दल चिकणी येथील एका कार्यक्रमात आ. अनिकेतभाई तटकरे यांच्या हस्ते त्याचा चिकणी ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे विभागीय नेते भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, मधुकर ठमके, गुरूवर्य ह.भ.प. नारायणमहाराज वाजे, विलास चौलकर, भरतदादा वाजे, राष्ट्रवादीचे विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी, कार्याध्यक्ष सचिन कळसकर, बाळासाहेब टके, विनायक गोळे, सीताराम देवरे, अशोक भोसले, बाळकृष्ण देवरे आदींसह अनेक मान्यवर व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

बालेवाडी पुणे येथे संपन्न या स्पर्धेत ५० ते १०० किलोग्रॅम वजनी गटातील भारतातील विविध राज्यातील बॉडी बिल्डर्सना खेळण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतांना रोहा तालुक्यातील चिकणी येथील उदय देवरे या बॉडी बिल्डर्सने मिस्टर इंडिया आणि मिस्टर युनिव्हर्सलच्या ७० किलोग्रॅम वजनी गटात दोन सुवर्ण पदकांना गवसणी घातली.

या स्पर्धेसाठी विनायक फिटनेस जिम कडून उदय देवरे याची सर्वोत्तम तयारी करून घेण्यात आली होती. या स्पर्धेच्या निमित्ताने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर्सने सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत दोन सुवर्ण पदक मिळविल्याबद्दल उदय देवरे याच्यावर संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.