कोरोना महामारीमध्ये वाढलेल्या वजनामुळे यकृताच्या विविध आजारात झाली वाढ
सिटी बेल • आरोग्य प्रतिनिधी •
यकृत दिनाच्या निमित्ताने आपल्या शरीरातील यकृताचे महत्व समजविण्याचा नागरिकांना जगभरात प्रयत्न केला जातो. अनेक रोगांना दूर ठेवणाऱ्या यकृताच्या आजाराबद्दल अजूनही जागरूकता आलेली नाही. दूषित पाण्यातून अथवा मद्याच्या सेवनातून यकृताला होणारे व्याधी कायम असताना आता लठ्ठपणामुळे होणाऱ्या आजारांची त्यात भर पडली आहे. कोरोना महामारीमध्ये अनेक नागरिक लॉकडाउनमुळे घरात अडकून पडले होते. समतोल आहार व व्यायामाच्या अभावामुळे यकृताच्या आजारात वाढ झालेली दिसून येत आहे.
याविषयी अधिक माहिती देताना मुलुंड येथील प्लॅटिनम हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट व यकृत तज्ज्ञ डॉ. विनय पवार म्हणाले ,” यकृत हा आपल्या शरीरातील सर्वांत मोठा अवयव आहे. चयापचयाच्या सर्व क्रियांमध्ये यकृताच्या महत्वाचा वाटा असतो आणि त्यामुळेच यकृताला शरीराची केमिकल फॅक्टरी असे संबोधले जाते आणि ५०० हून अधिक कार्य यकृत करत असते.
शरीरातील विशेषत: आतड्यांमधून येणाऱ्या अशुद्धी यकृतात शुद्ध केल्या जातात तसेच शरीरातील प्रमुख प्रथिने तसेच रक्त गोठविण्यासाठी लागणारे घटक यकृतात बनविले जातात. शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीचाही यकृत एक प्रमुख घटक आहे.आणि म्हणूनच यकृताला आजार झाल्यावर शरीरात अनेकविध गुंतागुंतीचा प्रादुर्भाव होतो आणि काही प्रसंगी शरीराचे अस्तित्वही धोक्यात येऊ शकते.
चुकीच्या आहारामुळे तसेच बैठ्या जीवनशैलीमुळे शरीरामध्ये मेदाचे (चरबीचे) प्रमाण अधिक वाढते. यामुळे यकृत तसेच शरीराच्या इतर भागांमध्ये चरबी साठते. यालाच फॅटी लिव्हर असे म्हणतात. चरबीयुक्त यकृताच्या आजारामध्ये यकृतात अतिरिक्त चरबी साचण्यापासून (स्टिटॉसिस) ते यकृत सुजणे (स्टिटोहेपटायटिस) या आजारापर्यंत विविध आजारांचा समावेश होतो.
स्टिटो हेपटायटिस पूर्णपणे बरा होऊ शकतो. पण, वेळेवर उपचार केले नाहीत तर यकृताला सूज येऊन त्याला भेगा पडू शकतात किंवा यकृतातील ऊती कडक होऊ शकतात आणि त्याचं रूपांतर सिऱ्हॉसिसमध्ये होतं. काही रुग्णांना यामुळे यकृताचा कर्करोग होऊ शकतो”.
हेपेटायटिस म्हणजेच कावीळ हा आजार आजही भारतात चिंतेचा विषय आहे. सर्वात जास्त मृत्यू होण्यामध्ये कावीळ या आजाराचा तिसरा क्रमांक लागतो. यकृत व कावीळ याचा संबंध सांगताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरचे हिपॅटोलॉजिस्ट – यकृतविशेषतज्ञ डॉ. कुणाल अध्यारु म्हणाले, ” यकृत खराब झाले कि कावीळ होते परंतु कावीळ बाबत भारतामध्ये बरेच गैरसमज आहेत. जसे की, माळ बांधणे आणि कावीळ उतरणे या गैरसमजुतींचा या रोगाशी काहीही संबंध नाही. या अंधश्रद्धेमुळे वैद्यकीय उपचारांना विलंब झाल्याने भारतामध्ये विशेषतः अगदी शहरी भागात सुद्धा अनेक नागरिक मृत्युमुखी पडतात.
जगभरात दरवर्षी १५ लाख लोकांचा म्हणजेच दर मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू होतो. हेपटायटीसचे चार प्रकार आहेत, हेपटायटीस-ए, हेपटायटीस बी, हेपटायटीस सी, हेपटायटीस ई हे त्याचे सर्वसाधारण प्रकार आहेत.
हिपेटायटिस ए आणि हिपेटायटिस ई व्हायरस – हे व्हायरस दूषित पाणी किंवा दूषित अन्नातून आपल्या पोटात जातात. ते यकृतावर हल्ला करतात आणि आपण जी कावीळ म्हणतो ती याचमुळे होते. यामध्ये रुग्णाला थकवा आणि ताप येतो. डोळे पिवळे होतात आणि लघवी पिवळसर लाल होते. यकृताला सूज येते.
काविळचे निदान लवकरात लवकर होणं आवश्यक असतं. मुंबई- नवी मुंबई ठाणे इथे ‘ए’ आणि ‘ई’ प्रकारच्या काविळीच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. या काविळीच्या व्हायरसचा दूषित पाण्यातून प्रसार होतो, असे गेल्या १० वर्षाच्या निरीक्षणांमधून सिद्ध झाले आहे”.
जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार, आतापर्यंत जगातील २ अब्ज लोक काविळीने बाधित झाले आहेत. जगातली प्रत्येक पंधरावी व्यक्ती या विषाणूने बाधित होत असते. जगभरात दरवर्षी ७ लाख लोक या रोगाच्या गंभीर दुष्परिणामामुळे मृत्युमुखी पडतात. हेपेटायटिसच्या बाबतीत जागतिक क्रमवारीत भारत देश पहिल्या १० मध्ये येत असून लोकसंख्येच्या ४ ते ८ टक्के लोक दरवर्षी या विषाणूने बाधित होतात.








Be First to Comment