
नवी मुंबई मध्ये ग्लोबल बिझनेस समिट चे आयोजन ; थायलंड आणि नवी मुंबईत व्यावसायिक पूल
यु बिझनेस मिट यांचा अनोखा उपक्रम
नवी मुंबई : प्रतिनिधी
नवी मुंबई मधील प्रथमच ग्लोबल बिझनेस समिट चे आयोजन करण्यात आले आहे. भारत आणि थायलंड यांच्यामधील व्यापार वृद्धीच्या अनुषंगाने हे समिट अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बेलापूर येथील पार्क या तारांकित हॉटेल मध्ये १८ मे रोजी ही समिट संपन्न होणार आहे.
थायलंडचे माजी उपपंतप्रधान एच इ कॉर्न दब्बरान्सी, इंजीनियरिंग इन्स्टिट्यूट ऑफ थायलंडचे संचालक तथा PEITA चे सल्लागार प्रो. डॉ. चियांचुंग ओदि कलायांनामित्र, भारतातील थाई दुधावासाचे माजी सदस्य तथा PEITA चे सल्लागार थाराडोल थाँगग्रंग, पंतप्रधान कार्यालयातील फॉरेन अफेयर्स सचिव प्रसर्त पियासाचादेश यांचे शिष्टमंडळ या बिझनेस सबमिटमध्ये थायलंड देशाच्या वतीने उपस्थित राहणार आहे.
तूर्तास युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांतील व्यापार वृद्धी हा विषय संपुष्टात आलेला आहे. होर्मुज समुद्रधुनी रोखून ठेवल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर त्याचे अत्यंत विपरीत परिणाम दिसून येत आहेत. युनायटेड नेशन्स सोबत महत्त्वपूर्ण बिजनेस ट्रेड डील झालेली असली तरी देखील ती अमलात आणण्यासाठी किती वेळ लागेल याचे कुणाकडे शाश्वत उत्तर नाही. व्यवसायाच्या दृष्टीने महासत्ता असणाऱ्या अमेरिकेला सध्या युद्धाची झळ सोसावी लागत असल्या कारणामुळे भारतीय गुंतवणूकदार व्यवसाय वृद्धी करता या देशाकडे देखील सकारात्मक दृष्टीने पाहत नाहीत.

चीन सारखा व्यवसाय वातावरण पोषक देश आपल्या शेजारी असून देखील या देशासोबत असणारी विश्वासार्हता ही नेहमीच वादातीत राहिलेली आहे. याच कारणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये व्यवसाय वृद्धी करण्याकरता भारतातील लघु मध्यम आणि मोठे व्यावसायिक योग्य संधीच्या शोधात आहेत.
दुसरीकडे थायलंड सारखा देश हा सातत्याने ऐयाशी करण्याकरता प्रसिद्ध राहिलेला आहे. परंतु या देशातील असणाऱ्या व्यवसाय पोषक परिस्थितीचा भारतातील गुंतवणूकदार आणि व्यावसायिक यांना फायदा होऊ शकतो. याच गोष्टीची चाचपणी करण्याकरता दोन्ही देशांतील व्यावसायिक आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करण्याकरता यु बिझनेस मीट यांच्यावतीने ग्लोबल समिट २०२६ चे आयोजन करण्यात आलेले आहे.
१८ मे रोजी संपूर्ण दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून या ठिकाणी व्यवसायाचे प्रचार आणि प्रसार करण्यासाठी स्टॉलचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या समितीमध्ये सहभागी होण्याकरता सशुल्क नावे नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली असून बुक माय शो च्या माध्यमातून देखील या समितीमध्ये रजिस्ट्रेशन करता येऊ शकेल.
रियल इस्टेट, इम्पोर्ट एक्सपोर्ट, बँकिंग, एज्युकेशन, टेक्नॉलॉजी, मेडिकल टुरिझम, लाईफस्टाईल आणि हेल्थकेअर, स्पेशल टुरिझम, स्पिरिचुअल टुरिझम ग्लोबल मीडिया अँड एंटरटेनमेंट या व्यवसाय क्षेत्रांवर प्राधान्य क्रमाने फोकस ठेवण्यात आलेला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर द्विदेशीय व्यवसाय संधी शोधण्याच्या प्रयत्नात यु बिझनेस मीट यांनी थायलंड या देशापासून सुरुवात केलेली असून नजीकच्या भविष्यात अशाच पद्धतीच्या व्यवसाय सुलभ पोषक वातावरण असणाऱ्या देशांसोबत बिझनेस समिट आयोजित करण्याचे मानस आहे. यू बिझनेस मिटचे फाउंडर वैभव सोनटक्के, को फाउंडर रवींद्र गुप्ता, को फाउंडर तथा सिटी बेलचे समूह संपादक मंदार दोंदे, को फाउंडर तथा सिटीबेल समूह संपादक विवेक पाटील, को फाउंडर समृद्धी वाणी यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला.


Be First to Comment