Press "Enter" to skip to content

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पनवेलने उत्साहात साजरी केली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती

सिटी बेल • पनवेल • विजयकुमार जंगम •

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पनवेल केंद्र हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते. ह्याच अनुषंगाने आज महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पनवेलने बालग्राम, खांदा कॉलनी, पनवेल येथे मोठ्या उत्साहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची जयंती साजरी केली.

याप्रसंगी शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. नीलिमा अरविंद मोरे, बँक ऑफ महाराष्ट्र, नवीन पनवेल शाखेचे विशेष सहाय्यक व गुणवंत कामगार, अरविंद मोरे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे केंद्र प्रमुख, प्रवीण सकट, सहाय्यिका शोभा पाटील, बालग्रामचे अधीक्षक डॉ. विनायक पाटील व रेखा दीपक जाधव हे मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी प्रमुख वक्ते अरविंद मोरे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे सर्वच भारतीयांसाठी महान आहे. त्यांनीच खऱ्या अर्थाने समानता व लोकशाही आपल्या देशात रुजविली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना समानता प्राप्त करून दिली. त्यांनी कामगारांसाठी समान वेतन, समान कामाचे तास दिले. विशेष म्हणजे त्यांच्या वर एव्हढे अन्याय होऊन सुद्धा त्यांनी देशवासियांसाठी मोलाचे कार्य केले हे विशेष. ते ग्रंथप्रेमी होते. त्यांनी पुस्तकासाठी राजगृह घर बांधले. त्यांचे सर्वात मोठे उपकार भारतीयांसाठी असेल तर ते म्हणजे भारताची राज्यघटना होय.

अरविंद मोरे पुढे म्हणाले की अजूनही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य सर्व नागरिकांपर्यंत पोहचलेले नाहीत. जर आपला देश सुजलाम सुफलाम करावयाचा असेल तर डॉ. बी. आर. आंबेडकरांचे कार्य हे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचविणे ही काळाची गरज आहे. या प्रसंगी त्यांनी तसा संकल्प ह्या मंगल दिनी करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी प्रमुख पाहुण्या प्रा. डॉ. नीलिमा अरविंद मोरे म्हणाल्या की, स्त्रियांना खऱ्या अर्थाने जर स्वतंत्र प्राप्त करून दिले असेल तर ते केवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच. अगोदरच्या काळी स्त्रियांचे जीवन हे खूपच हालापेष्टांचे होते. त्यातून स्त्रियांना बाहेर काढण्याचे काम डॉ. बी.आर. आंबेडकरांनीच केले. आज स्त्री स्वाभिमानाने व अभिमानाने आपल्या पायावर उभी राहिलेली आहे ती केवळ डॉ. बी. आर. आंबेडकरांमुळेच होय. खऱ्या अर्थाने सर्वच जाती, धर्मातील स्त्रिया डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऋणी आहेत.

डॉ. नीलिमा मोरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई आंबेडकरांच्या बलिदानाची सुद्धा आठवण करून दिली. डॉ. नीलिमा अरविंद मोरे यांनी डॉ. बी. आर. आंबेडकरांनी जे शिक्षणाचे मूल्य रुजविले आणि आज जी शैक्षणिक क्रांती शिक्षणामुळे झाली ती डॉ. बी. आर. आंबेडकरांमुळेच. त्यांनी सुद्धा डॉ बी. आर. आंबेडकरांचे अध्ययन करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी अरविंद मोरे व डॉ नीलिमा अरविंद मोरे यांच्या तर्फे डॉ. बी. आर. आंबेडकरांची प्रतिमा, त्यांच्या जीवनावरील पुस्तके ‘माझी आत्मकथा’ व “ग्रंथप्रेमी डॉ. बी. आर. आंबेडकर’ बालग्राम ग्रंथालय, पनवेल व यश दीपक जाधव, उदय कांबळे, रेखा दीपक जाधव व मीनाक्षी अविनाश भाकरे याना भेट म्हणून देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्र संचालन व आभार प्रदर्शन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पनवेलचे केंद्र प्रमुख, प्रवीण सकट यांनी केले तर कार्यक्रम यशस्विते करिता सहाय्यिका शोभा पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.