रोहा कस्टडीत आदिवासी कैदी आत्महत्या प्रकरणी विविध आदिवासी संघटना झाल्या आक्रमक
आदिवासी संघटनांना आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही दोषींवर लवकरच कारवाई होईल :- पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांचे आश्वासन
सिटी बेल • गोवे-कोलाड • विश्वास निकम •
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील शेनवई आदीवासीवाडीतील पत्नीच्या खून प्रकरणी अटकेत असणारा रोहा पोलिस कस्टडीतअसणारा रविंद्र वसंत वाघमारे वय २५ वर्षे रा. शेनवई ता. रोहा या कैद्यांनी चादरीच्या किनारीने लॉकअपमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. घटनेचे वृत्त समजताच रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली.
आदिवासी तरुण कैद्याने गळफास लावून आत्महत्या केल्याने रायगड जिल्ह्यामध्ये सदरच्या घटनेने एकच खळबळ माजली असून याप्रकरणी आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असून या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटीलसह संबंधित कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे असे निवेदनपत्र जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांना विविध आदिवासी संघटना यांनी दिले आहे.
या प्रकरणी संपूर्ण जिल्ह्यातील आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असून आदिवासी संघटनाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली असता सदर प्रकरणाची सीआयडी तसेच दंडाधिकारी यांच्या मार्फत सदर प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई केली जाईल असे आश्वासन देत आदिवासी संघटनाना मी आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार अशी ग्वाही रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी आक्रमक पवित्रा घेतलेल्या आदिवासी संघटना व त्यांच्या पदाधिकारी यांना दिली आहे.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलेल्या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य आदिम कातकरी संघटनेचे दत्तू वाघ, रायगड ज़िल्हा एकलव्य आदिवासी संघटनेचे भिवा पवार,राम कोळी,माणगाव आदिवासी हितरक्षक संघटनेचे उमेश जाधव, बबन कोळी, निजामपूर एकलव्य संघटनेचे नथुराम वाघमारे, रायगड आदिम कातकरी संघटनेचे लहू वाघमारे, पांडुरंग वाघमारे, शशिकांत कोळी, महिला अध्यक्षा गुलाब ताई वाघमारे बेबीताई कापरे, एकनाथ वाघे, विठोबा जाधव, रोहाच्या सभापती गुलाबताई वाघमारे चंद्रकांत पवार विकास कोळी राम सावर, सर्वहारा जन आंदोलनाचे सोपान सुतार,अंकुश वाघमारे आदी कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांची भेट घेऊन आदिवासी तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या रोहा पोलीस निरीक्षक संजय पाटील सह संबधित पोलीस कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली असून त्वरित कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
Be First to Comment