सिडकोमार्फत रायगडकरांसाठी अद्ययावत कोविड रूग्णालय उभे करण्याची बबनदादा पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
# सिटी बेल लाइव्ह / पनवेल #
सिडकोने पनवेल उरणच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनींवर अनेक मोठे प्रोजेक्ट आजवर उभे केलेले आहेत. त्याचजीवावर आज सिडको मोठी झाली आहे. आता ह्या कोविड संकटकाळी सिडकोने मुलुंडप्रमाणेच रायगड मधील प्रकल्पग्रस्तांसाठी एक अद्ययावत इस्पितळ उभे द्यायला हवे अशी आग्रही मागणी शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार बबनदादा पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांच्याकडे केली आहे.
याबाबत त्यांनी मुख्यमंञ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल महापालिका क्षेत्रात बाधितांची संख्या वाढत असल्याने पनवेल महापालिका क्षेत्रात संपूर्ण रायगड बाधित धाव घेतात. तसेच पनवेल मधील बाधितांची वाढती संख्या पाहून पनवेलमध्ये महापालिका तर्फे शासनाने उभारलेले रुग्णालय कमी पड़त आहेत. तसेच बाधित प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये गेल्यावर मोठ्या प्रमाणात डिपॉझिट मागितले जाते. हे डिपाॅजीट सर्वसामान्य जनतेला जनतेला ताबडतोब भरणे शक्य नसते. त्यामुळे बाधितांचा जीव जातो. तरी याबाबत पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी २५/०६/२०२० रोजी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्रा यांच्याकडे रुग्णालय स्थापन करण्याबाबत पत्र दिले आहे. तसेच सिडको प्रकल्पग्रस्तांच्या वतीने सिडकोकडे अशा प्रकारची मीटिंगमध्ये मागणी केली आहे. सिडको ही संस्था पनवेल, उरण तालुक्यातील शेतक-यांच्या जमिनी घेऊन उभारलेली संस्था आहे. अशाच प्रकारचे सर्व सोयीयुक्त रुग्णालय मुलुंड येथे सिडको बनवत आहे. त्याच प्रकारचे रुग्णालय पनवेलमध्ये व्हावे अशा सूचना कृपया आपण सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांना कराव्यात हि विनंती.
दरम्यान बबनदादा पाटील यांनी आजपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेल्या अनेक मागण्यांना यश आले असून ही मागणी देखील लवकरच पूर्ण होणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Be First to Comment