पार्टेकोंड – सावंतकोंड रस्त्यावरील लोखंडी पूलाची नटबोल्ट कापून चोरी
विरोधी गटनेत्यांची पोलादपूर नगरपंचायतीकडे तक्रार
सिटी बेल • पोलादपूर • शैलेश पालकर •
तालुक्याच्या मुख्य गावाची ग्रामपंचायत असलेल्या पोलादपूरमध्ये नगरपंचायत झाल्यानंतर झालेल्या रस्त्यामुळे वापरात नसलेला लोखंडी पूल सोमवारी काही व्यक्तींनी ग्रामस्थांच्या डोळयांदेखत कापून एका परिचित वाहनातून चोरून नेल्यानंतर बुधवारी पोलादपूर नगरपंचायतीच्या विरोधी गटनेत्यांनी मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्याकडे लेखी तक्रारवजा निवेदन देऊन संबंधितांविरूध्द कारवाईची मागणी केली आहे.
पोलादपूर तालुक्यात यापूर्वीही लोखंडी पूल चोरी करणाऱ्याचा फोटो गळयामध्ये पाटी बांधून पोलादपूर पोलीस ठाण्यातील काचेच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आला असताना आता काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलादपूर ग्रामपंचायतीने पार्टेकोंड-सावंतकोंड भागातील विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना पायी तसेच दुचाकीवरून शहराशी संपर्कात राहण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत साधारणपणे 10-12 फूट लांबीचा आणि 6 फूट रूंदीचा एक लोखंडी पूल बांधून घेतला होता. यानंतर नगरपंचायत अस्तित्वात आल्यावर या पार्टेकोंड सावंतकोंड भागात रस्ता करण्यात आल्याने या लोखंडी पुलावरील रहदारी बंद झाली.
गेल्या काही वर्षांपासून वापराविना असलेल्या या लोखंडी पुलाकडे रस्त्यावरून जाणाऱ्या व येणाऱ्या स्थानिक लोकांचे लक्ष असे. सोमवारी सायंकाळी पोलादपूर नगरपंचायतीचा लोकप्रतिनिधी याठिकाणी येऊन पाहणी करून गेला आणि रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एक ओळखीचे वाहन येऊन गेले. दुसऱ्या दिवशी मंगळवारी हा लोखंडी पूल नटबोल्ट कापून चोरीला गेल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात आले.
याबाबत पोलादपूर नगरपंचायतीचे विरोधी गटनेता दिलीप भागवत, नगरसेवक स्वप्नील भुवड आणि ऍड.सचिन हांडे यांच्या निदर्शनास ही बाब स्थानिक ग्रामस्थांनी आणून दिल्यानंतर या चोरीस गेलेल्या लोखंडी पुलासंदर्भात माहिती घेतल्यानंतर रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने हा पूल बांधल्यानंतर नगरपंचायतीच्या निर्मितीनंतर हा पूल नगरपंचायतीकडे वर्ग केल्याचे समजून आल्याने पोलादपूर नगरपंचायतीच्या विरोधी गटनेते दिलीप भागवत यांच्या लेटरपॅडवरून मुख्याधिकारी पोलादपूर नगरपंचायत यांना सदर लोखंडी पुलाच्या चोरीसंदर्भात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
पोलादपूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी या निवेदनाची दखल घेऊन गुरूवारी सकाळी जाऊन लोखंडी पुल नटबोल्ट कापून चोरून नेल्याच्या घटनास्थळी पाहाणी केली असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पोलादपूर तालुक्यात यापूर्वी साधारणपणे 25 वर्षांच्याआधी बाजिरे ते रानवडीदरम्यानचा एक लोखंडी पूल कापून विकण्यात आल्याच्या घटनेमध्ये आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केल्यानंतर शिक्षेला पाठविण्यात यशस्वी झालेल्या पोलादपूर पोलीसांनी पोलीस ठाण्याबाहेरील सूचना विषयक काचेच्या कपाटामध्ये आरोपीचा फोटो तब्बल पुढे पाच वर्षे ठेवला होता. पुर्वीच्या लोखंडीपूल चोरीची आठवण या लोखंडी पुलाच्या चोरीमुळे जागी झाल्याने पोलादपूर शहरातील या लोखंडी पुलचोरासोबत आताचे पोलादपूर पोलीस काय भुमिका घेतात, याकडे पोलादपूरवासियांचे लक्ष लागले आहे.
पोलादपूर तालुक्यातील अनेक भरवशाच्या कार्यकर्त्यांनी गावोगांवी अशी कांड घडवून आणली असून सर्वचठिकाणी कारवाईपर्यंत विषय न पोहोचल्याने विकासकामे करणाऱ्यांच्या इतिहासाबाबत उजळणी केली जात आहे.








Be First to Comment