Press "Enter" to skip to content

रस्त्यावरचा स्वस्त ज्यूस पडेल महाग

रस्त्यावरील रंगीबेरंगी ज्यूसमुळे पोटाचे विकार वाढीला : अशुद्ध बर्फाच्या वापराने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सिटी बेल • आरोग्य प्रतिनिधी •

खाऊगल्ल्या अथवा रस्त्यावरील खाद्यपदार्थ व ज्यूसचे स्टॉल हा प्रत्येक शहराचा अविभाज्य भाग झाला असून खाऊ गल्लीतील पदार्थांचा आस्वाद घेतला नाही असे नागरिक सापडणार नाही. मुंबईची हद्द थेट बदलापूर, विरार व खोपोली पर्यंत गेल्यामुळे घर व कामाच्या ठिकाणामधील अंतर वाढले त्यामुळे बाहेरील खाद्यपदार्थ खाणे ही अपरिहार्यता बनली आहे.

मुंबईतील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलच्या सर्वक्षणानुसार उन्हाळ्यामध्ये बाहेरील खाद्य पदार्थ खाल्यामुळे पोटांच्या विकारात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे तसेच किडनीच्या विकारातही लक्षणीय वाढ झाली आहे. खाद्यपदार्थ खाल्ल्यावर तेथे उपलब्ध असलेले निकृष्ट दर्जाचे ज्युस नागरिकांचे पोट बिघडविण्यास कारणीभूत ठरत आहेत.

याबाबत माहिती देताना झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे इंटर्नल मेडिसिन तज्ञ व फिजिशियन डॉ.चेतन वेलानी सांगतात, ” गेल्या १५ दिवसात हगवण व जुलाबाचा त्रास असलेल्या पेशंटमध्ये ३० ते ४० टक्के वाढ झाली असून झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलने केलेल्या अंतर्गत सर्वेसक्षणानुसार या आजारासाठी बाहेरील खाद्यपदार्थ कारणीभूत ठरत आहेत.

आपण शहरात कामानिमित्त फिरत असताना अनेकदा फुटपाथवर बर्फ ठेवून त्यावर बारदान (पोते) झाकून ठेवलेले पाहतो. पण हाच बर्फ आपण वेगवेगळ्या सरबत व पदार्थामध्ये सेवन करीत असतो. मात्र, या बर्फाचा दर्जा तपासला गेला आहे कि नाही याची नागरिकांना कल्पना नसते, उसाचे रस विक्रेते, विविध रंग टाकून आकर्षक बर्फ गोळा विकणारे, फळांचा रस विकणारे ज्यूस सेंटर, उन्हाळ्यात जागोजागी माठ घेऊन लस्सी आणि ताक विकणारे हा बर्फ घेत असतात. त्याशिवाय काही उपाहारगृहांमध्ये बर्फाचे वितरण केले जाते.

या शिवाय मोठय़ा हॉटेल्समधील ज्यूसमध्येही हाच बर्फ असतो, या शुद्ध बर्फ़ातून ई-कोलाय, कॉलीफॉर्म, स्टॅफिलोकोकस ऑरिअस अशा हगवण व जुलाबाला कारणीभूत ठरणाऱ्या जिवाणूंचा संसर्ग होत असतो, दूषित पाण्याने जे रोग होतात, तेच रोग उघडय़ावरील बर्फ खाल्ल्याने होतात. या अशुद्ध बर्फ़ाच्या सेवनाने विषमज्वर, कॉलरा, अन्नातून विषबाधा, मेटल पॉइझनिंग, अमेबिया, उलटय़ा, कावीळ, अतिसार, हगवण असे आजार होऊ शकतात.”

उन्हाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता कमी होते व कोरडेपणा वाढतो. त्यामुळे आपल्या शरीरातून घाम येण्याचं प्रमाण वाढतं व शरीरातील पाणी पातळी कमी होते. पाण्याचा समतोल ठेवण्याची जबाबदारी किडनीवर असल्याने त्याचा विपरित परिणाम सर्वसाधारण किडनीवर होत असतो. मार्च ते जून महिन्याच्या अखेरीपर्यंत मुतखड्याच्या पेशंटमध्ये ३० ते ४० टक्क्यांनी वाढ होते.

मुतखडा टाळण्यासाठी पाणी हा सर्वांत लाभदायी पेय पदार्थ आहे. दिवसभरात ८-१० ग्लास पाणी प्यायल्याने साखर, सोडियम तसेच पेय पदार्थांमधील बाकीच्या घटकांचे मूत्रपिंडातून उत्सर्जन होण्यास मदत होते, ज्यामुळे मुतखडा होण्याचे प्रमाण कमी होते.अशी माहिती झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे इंटर्नल मेडिसिन तज्ञ व फिजिशियन डॉ.चेतन वेलानी यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.