कर्जत उपविभाग महसूल कर्मचारी बेमुदत संपावर
सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड •
दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने रायगड जिल्ह्यातील शेकडो महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. यामुळे जिल्ह्यातील, तालुक्यातील महसूल विभागातील कामकाज ठप्प झाले आहे.
राज्यातील महसूल विभाग आणि जिल्ह्यातील महसूल संघटनांनी 21 मार्च 2022 पासून निदर्शने, काळ्या फिती लावून काम, एक दिवसाचा लाक्षणिक संप अशी आंदोलने केली आहेत.तरीही सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे आता महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपावर जाण्याचे हत्यार उपसले आहे.
तहसील कार्यालय, उपविभाग व जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असून महसूल सहाय्यक भरतीसाठी राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून देखील भरती करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. यामुळे एका कर्मचाऱ्याला दोन ते तीन कर्मचाऱ्यांचे काम करावे लागत असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण येत आहे.

शासन निर्णय महसूल व वन विभाग 10 मे 2021 अन्वये नायब तहसीलदार संवर्ग म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. त्यानुसार सर्व अव्वल कारकून व मंडळ अधिकारी यांची सेवा ज्येष्ठता याद्या राज्य स्तरावर एकत्रित करण्याबाबत पत्र काढलेले आहे; परंतु अव्वल कारकून व मंडळ अधिकारी हा जिल्हास्तरीय संवर्ग असल्यामुळे त्यांच्या याद्या या राज्यस्तरावर एकत्रित करण्याची प्रक्रिया ही अन्यायकारक असल्याने पत्र तात्काळ रद्द करावे, अशीही संघटनेची मागणी आहे. इतर मागण्यांबाबत सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही फक्त आश्वासन मिळत असून त्यांची पूर्तता होत नसल्याने संपात कर्जत उपविभागातील कोतवाल – 17, शिपाई- 2, महसूल सहायक – 14,अव्वल कारकून – 09, नायब तहसीलदार (पदोन्नत)- 03,पुरवठा निरीक्षक – 01,मंडळ अधिकारी – 03 असे एकूण -49 महसूल कर्मचारी सहभागी झाले आहेत.








Be First to Comment