अनैतिक संबधातून त्रासदायक ठरणाऱ्या चुलत आत्याचा आरोपी भाच्याने काढला काटा
जागरूक सुरक्षा रक्षकांमुळे नागोठणे पोलिसांनी आरोपीला तीन तासांत केले जेरबंद
सिटी बेल • नागोठणे • महेश पवार •
स्वतःच्याच चुलत आत्याशी असलेले अनैतिक संबध व त्यातून आत्याकडून वारंवार होणारी पैशांची मागणी यातून त्रस्त झालेल्या भाच्याने आत्याच्या त्रासातून आपली सुटका करून घेण्यासाठी आत्याचा दगडाने ठेचून खून करून काटा काढल्याची व नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्यावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केल्याने सर्वांना हादरवून टाकणारी घटना नागोठण्याजवळील रिलायन्स निवासी संकुला समोरील डोंगराळ भागातील जंगलात घडली.
घटनास्थळाच्या जवळच एका बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे शिहू गावातील जयेश घासे व चेतन गदमले यांच्या जागरूकतेमुळे व समयसुचकतेमुळे तसेच पोलीस नाईक गंगाराम डूमना यांच्या सहकार्याने नागोठणे पोलिसांनी आरोपीला तीन तासांत केले जेरबंद केले.
दरम्यान मृत महिला व आरोपी हे नागोठण्याजवळीलच उनाठवाडीतील असून मानवतेला कालिमा फासणाऱ्या या घटनेमुळे नागोठणे परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या गुन्ह्याची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी सोमवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याची माहिती घेतली. यावेळी श्रीवर्धनचे पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी व नागोठण्याचे पोलीस निरीक्षक तांजी नारनवर हेसुद्धा त्यांच्या सोबत होते. त्यानंतर अतुल झेंडे यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून या गुन्ह्याची सविस्तर माहिती दिली.
३२ वर्षीय मृत महिलेचा पहिल्या लग्नानंतर घटस्फोट झाला होता. त्यानंतर तिने दुसरे लग्नही केले होते. सध्या ती पेण येथील एका दवाखान्यात परिचारिका म्हणून नोकरीला होती. या गुन्ह्यातील २२ वर्षीय आरोपी हा या महिलेच्या चुलत भावाचा मुलगा आहे. या दोघांचे गेली २-३ वर्षांपासून अनैतिक संबध होते. आरोपी हा एका खासगी कंपनीत केवळ रोजंदारीवर कामाला होता. असे असूनही अनैतिक संबधामुळे वारंवार होणाऱ्या पैशांच्या मागणीमुळे यापूर्वीही या दोघांच्यात वाद होऊन मृत महिलेने आरोपीवर दवाखान्यातीन शास्त्राने वार केल्याचा राग आरोपीच्या मनात होता. याच पार्श्वभूमीवर तिला संपविण्याचा कट त्याने रचला होता.
रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रिलायन्स निवासी संकुलाच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या करकरणी मातेच्या मंदिराकडील डोंगराकडे जाण्यासाठी एक जोडपे मोटारसायकलवरून आल्याचे या दोन्ही सुरक्षा रक्षकांनी पाहिले होते. आरोपीने गाडी उभी केल्यानंतर दोघेही जंगलाकडे जातांना या दोघांत वाद सुरु असल्याचे जयेशला संशय आला व त्याने आपल्या मोबाईल मध्ये गाडीचा फोटो काढला. नंतर सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आरोपी एकटाच खाली आला. त्याने गाडीतील पेट्रोल बाटलीत भरून तो पुन्हा जंगलात गेला. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारस पुन्हा खाली आला.
याचदरम्यान जंगलातील वरील भागांत धूर येत असल्याचे सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरोपीस थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी तो पळून जाण्यास यशस्वी झाला. मात्र नंतर याची माहिती सुरक्षा रक्षकांनी पोलीसांन कळविली. पोलिसांनी गाडीचा फोटो त्यांच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर टाकला असता पो.ना. गंगाराम डूमना यांनी ही गाडी याआधी नागोठणे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एक व्यक्तीच्या मिसिंग तक्रारी मधीलच असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसारच उपलब्ध माहितीच्या आधारे पोलीस पथकाने आरोपीस त्याच्या घरी जाऊन ताब्यात घेतले.
दरम्यान रात्री आठ वाजण्याच्या ही घटना समजली आणि रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास संपूर्ण गुन्ह्याची उकल झाली. घटनास्थळ हा जंगल परिसर असल्याने तपासात अडथळे येऊ शकत होते मात्र दोन्ही सुरक्षा रक्षक जयेश घासे, चेतन गदमले व पो.ना. गंगाराम डूमना यांच्या जागरूकतेमुळे आरोपीला तत्काळ ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आल्याने त्यांचा पोलीस मुख्यालयातील आढावा बैठकीत सन्मान करण्यात येणार असल्याचे यावेळी अतुल झेंडे यांनी स्पष्ट सांगितले.
Be First to Comment