नागोठणे पोलिसांकडून वाघ्रणवाडी जंगलातील गावठी दारूच्या दोन हातभट्टी उध्वस्त : एक हजार लिटर गुळमिश्रित रसायनही केले नष्ट
सिटी बेल • नागोठणे • महेश पवार •
नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दितील चेराठी, काळकाई जंगल परिसरात धाड टाकून तेथील गावठी दारूच्या चार हातभट्टी नागोठणे पोलिसांनी उध्वस्त केल्याची घटना ताजी असतांनाच नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दितील वाघ्रणवाडी पश्चिम व उत्तर दिशा जंगल परिसरात धाड टाकून तेथील गावठी दारूच्या दोन हातभट्टी उध्वस्त करण्याची मोहिम नागोठणे पोलिसांनी फत्ते केल्याने गावठी दारु माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
नागोठणे पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिसांच्या पथकाने गुरूवारी (दि.३१) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली.
नागोठणे परिसरातील जंगलांचा फायदा उचलत फोफावत चाललेल्या गावठी दारु तयार करणाऱ्या हातभट्टींना नष्ट करण्याची मोहिम नागोठण्याचे पोलिस निरिक्षक तानाजी नारनवर यांनी येथील पदभार स्वीकारल्यापासून हाती घेतलीवहोती. त्यातच नागोठण्याजवळील ऐनघर, सुकेळी परिसरात गावठी दारूचे धंदे तेजीत आल्याच्या व त्यामुळे तरुण पिढी गावठी दारूच्या आहारी जाऊन अनेकांचे संसार उध्वस्त झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. असे असतांनाच वाघ्रणवाडी जंगल परिसरात गावठी दारूच्या हातभट्टी पेटवून गावठी दारु तयार करीत असल्याची गुप्त माहिती खबरीकडून नागोठणे पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे नागोठणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईत प्लास्टिकच्या ३ ड्रम मध्ये प्रत्येकी २०० लिटर प्रमाणे ६०० लिटर क्षमतेचे व सुमारे रु. २४ हजार किंमतीचे गुळ मिश्रित रसायन व २ लोखंडी टाक्यांमध्ये ४०० लिटर क्षमतेचे सुमारे १६ हजार किंमतीचे असे एकूण ४० हजार रुपये किंमतीचे १ हजार लिटर गुळ व नवसार मिश्रित रसायन सापडले. सापडलेला मुद्देमाल वाहतुकीस अवजड व अवघड असल्याने नागोठणे पोलिस पथकाकडून तो जागेवरच पेटवून नष्ट करण्यात आला.
नागोठणे पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदार व पोलिस पथकाने ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. नागोठणे पोलिस ठाण्याच्या या पथकात हे.काॅ. चंद्रकांत पाटील, हे.काॅ. विनोद पाटील, पोलिस नाईक निलेश कोंडार, पो.काॅ. रामनाथ ठाकूर, पो.काॅ. निशांत पिंगळे यांच्यासह होमगार्ड देवरे, डोबळे, भोईर, बांगरे, दरोडे, हंबीर आदींचा समावेश होता.
नागोठणे पोलिसांनी गावठी दारु विरोधात केलेल्या या कारवाईचे नागरिकांतून, विशेषतः महिलांकडून स्वागत करण्यात येत असून या गावठी दारु धंदेवाल्यांचा पोलिसांनी कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणीही महिला वर्गातून होत आहे.
Be First to Comment