Press "Enter" to skip to content

चोरांनी वाचनालय ही सोडलं नाही

उरणच्या देऊळवाडीतील श्री गोपाळकृष्ण वाचनालयात चोरी : कॉम्प्युटर, रोख रक्कम लंपास

सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •

ज्ञानाचे मंदिर म्हणून वाचनालयांना ओळखले जाते.. वाचनालय हे ज्ञानाचे मंदिर आहेत.मात्र या ज्ञानाच्या मंदिरातच चोरी झाल्याची घटना उरणमध्ये झाली आहे. उरण शहरातील देऊळवाडी येथे असलेल्या श्री गोपाळकृष्ण वाचनालयात दिनांक 28/3/2022 रोजी रात्री ही घटना घडली. चोरी झाल्याची घटना दिनांक 29/3/2022 रोजी सकाळी 8:30 वाजता वाचनालय कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली.

सविस्तर वृत्त असे की, मंगळवार दिनांक 29/3/2022 रोजी नेहमी प्रमाणे सकाळी 8:30 वाजता वाचनालय उघडण्यास कर्मचारी आले. वाचनालयाचे मुख्य दोन खोल्या आहेत. ते एकमेकांना तुटून(वेगवेगळे ) आहेत. एका खोलीचे लॉक काढून झाल्या नंतर दुसऱ्या खोलीचे लॉक काढण्यासाठी वाचनालयाचे लेखणीक वृषाली पाठारे दार उघडण्यासाठी गेले असताना त्यांना त्या दाराचे कुलूप कोणीतरी तोडले असल्याचे दिसले. दार उघडेच होते. तेव्हा त्यांनी तेथूनच आत डोकावून पाहिले असता 1कॉम्प्युटर,2 कॉम्प्युटर स्क्रीन, रोख रक्कम 14,400 रुपये,1 इंडक्शन प्लेट व इतर सामान गायब झाल्याचे दिसले. कपाटाचे दारही उघडे होते. कपाटाला चावी होती. तसेच टेबल वरील सामान इकडे तिकडे पसरलेले होते. या सर्व गोष्टी वरून त्यांना चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी त्वरित वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना फोन करून कळविले.

चोरी झाल्याचे लक्षात येताच कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष ऍड पराग म्हात्रे, उपाध्यक्ष अरुण पाठारे,सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार आदी मान्यवर घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी लगेचच चोरी झाल्याची घटना फोन द्वारे उरण पोलीस स्टेशनला कळविली. चोरी झाल्याचे समजताच उरण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास गवते यांनी हरविलेल्या सर्व वस्तूंचा पंचनामा केला. ज्या ज्या वस्तू जिथे जिथे चोरीला गेल्या त्या जागेची त्यांनी पाहणी केली.

ग्रंथपाल जिजा घरत, सहाय्यक ग्रंथपाल अंजली कालेकर, लेखणीक वृषाली पाठारे यांनी हरविलेल्या वस्तू बद्दल माहिती पोलीस अधिकारी कैलास गवते यांना दिली. चौकशी अंती चोरी करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरात लवकर आरोपींना पकडण्यासाठी पुढील कार्यवाही सुरु केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास गवते यांनी दिली.

श्री गोपाळकृष्ण वाचनालय हे उरण मधील सर्वात जुने व उत्तम सेवा सुविधा देणारे वाचनालय म्हणून प्रसिद्ध आहे. श्री गोपाळकृष्ण वाचनालय हे 1943 साली स्थापन झाले. रजि नं. ई (के)41, तालुका अ वर्गात मोडणारे वाचनालय आहे. संपूर्ण उरण तालुक्यातून वाचक येथे वृत्तपत्रे, पुस्तके, ग्रंथ वाचण्यासाठी येत असतात. इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेतील वृत्तपत्रे येथे सर्वांना मोफत वाचायला मिळत असतात. वाचक वर्ग याचा पुरेपूर फायदा घेतात.

शाळा कॉलेज विद्यार्थ्यांसाठी येथे मोफत अभ्यासिका (अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था )आहे. एकूण 32000 हुन जास्त पुस्तके येथे वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. श्री गोपाळकृष्ण वाचनालयाचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष ऍड पराग म्हात्रे, उपाध्यक्ष अरुण पाठारे, सचिव श्रीकांत वैशपायन, सहसचिव प्राजक्ता बोन्द्रे, कोषाध्यक्ष ललित पाटील, सदस्य परेश मेस्त्री,श्रीमती कल्पना गोगटे, श्रीमती मालती भावे, सल्लागार -वैशाली कोळगावकर, वर्षा पाठारे, सदानंद गायकवाड, राजेश शहा आदी कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी सदस्य वाचकांना उत्तम सेवा सुविधा उपलब्ध करून देत आहेत.

मात्र अशा चोरीच्या घटनेमुळे सर्वांना एकच धक्का बसला आहे. चोरी करणाऱ्या व्यक्तीला लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अध्यक्ष पराग म्हात्रे, उपाध्यक्ष अरुण पाठारे यांनी केली आहे.चोरांनी आता आपला मोर्चा वाचनालयांकडे वळविल्याने उरण तालुक्यातील इतर वाचनालयातील कर्मचाऱ्यांना आता सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.