Press "Enter" to skip to content

30 मार्च रोजी आदित्य ठाकरे रायगडात

शिवसेनेच्या बॅनर वरुन माजी केंद्रीय मंत्री ,ज्येष्ठ नेते अनंत गीते यांची छबी गायब

सिटी बेल • रायगड • धम्मशील सावंत •

शिवसेना नेते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे ३० मार्च रोजी रायगड दौऱ्यावर येत आहेत . स्वागतासाठी या दौऱ्याचे बॅनर जिल्ह्यात ठिकठिकाणी झळकत आहेत . मात्र या बॅनरवरून माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे छायाचित्र गायब झाले आहे . याची चर्चा सध्या रायगडच्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे .

आदित्य ठाकरे यांचा २८ , २ ९ व ३० मार्च असा ३ दिवसांचा कोकण दौरा आहे . यात सिंधुदुर्ग , रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात विविध विकासकामांची उद्घाटने , भूमिपूजने तसेच शिवसैनिकांशी संवाद असा कार्यक्रम आहे . पक्षीय संघटनात्मक कामासह त्यांच्या खात्यांच्या कामांसंदर्भात हा दौरा असल्याचे सांगितले जाते .

३० मार्च रोजी रायगडमधील लोणेरे येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात वसतीगृहाचे भूमिपूजन तसेच दुपारी ३ वाजता माणगाव येथे शिवसैनिकांचा मेळावा होत आहे . या मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे . याचे फलकही जिल्ह्यात ठिकठिकाणी लागलेले पहायला मिळतात . या बॅनरवर उद्योगमंत्री सुभाष देसाई , उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत तसेच शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांची छबी झळकलेली आहे .

याखेरीज जिल्ह्यातील आमदार आणि प्रमुख पदाधिकारी यांचेही फोटो आहेत . मात्र ६ वेळा खासदार आणि दोन वेळा केंद्रीय मंत्री राहिलेले अनंत गीते यांच्या फोटोला बॅनरवर स्थान मिळालेले दिसत नाही .

पक्ष नेतृत्त्वावर नाराजी

मागील लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांचा सुनील तटकरे यांनी पराभव केला . विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले . त्या सरकारमध्ये तटकरे यांची कन्या आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री पद देखील मिळाले . तेव्हापासून गीते पक्षनेतृत्वावर नाराज आहेत .

श्रीवर्धनमधील मेळाव्यात व्यक्त केला होता संताप

अतिशय संयमी अशी ओळख असलेल्या अनंत गीते यांनी सप्टेंबर महिन्यात श्रीवर्धन येथे झालेल्या मेळाव्यात आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली . राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर थेट शरसंधान करत जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली . मातोश्रीबरोबरचे दुरावलेले संबंध आणखी ताणले गेले . गीतेच्या वक्तव्याची पक्षनेतृत्वाला गंभीर दखल घ्यावी लागली .

अनंत गीते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, त्यानंतर काही दिवसातच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या रायगडमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत गीतेंच्या वक्तव्यावर चर्चा झाली . जिल्ह्यातील सेनेच्या कार्यक्रमाला गीतेंना बोलवायचे नाही किंवा त्यांचे छायाचित्र बॅनरवर वापरायचे नाही असा अलिखित निर्णयदेखील त्या बैठकीत घेण्यात आला होता . तेव्हापासून अनंत गीते रायगडच्या राजकारणात कुठेही सक्रिय दिसत नाहीत . आता आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने हा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे .

ज्येष्ठ नेता अडगळीत गेल्याचे शल्य

निष्ठावान आणि प्रामाणिक शिवसैनिक अशी अनंत गीते यांची ओळख आहे . दीर्घ राजकीय कारकीर्दीत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा कुठलाही आरोप नाही . मिस्टर क्लीन अशी प्रतिमा असलेले अनंत गीते यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली ती शिवसैनिकांनी पटलीदेखील . परंतु सत्तेच्या सारीपाटाचा डोलारा सांभाळताना गीतेंसारखा नेता अडगळीत गेल्याचे शल्य रायगडमधील सामान्य शिवसैनिकांना सळते आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.