पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
सिटी बेल • अलिबाग • अमूलकुमार जैन •
शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य, जिल्हा रायगडची सभा राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग येथे संपन्न झाली. सदर सभेसाठी संपूर्ण जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातील पुनर्नियुक्त माजी सैनिक उपस्थित होते.
सभेसाठी राज्य कार्यकारणीचे प्रतिनिधी म्हणून सहसचिव श्री दीपक पाटील उपस्थित होते त्याचप्रमाणे मंत्रालय विभाग अध्यक्ष श्री. भुजबळ साहेब व राज्य समन्वयक श्री दिलावर शादिवान तसेच मुख्य अथिती श्री व सौ भीम इंगळे उपस्थित होते. श्री भिम इंगळे हे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
सदर सभेमध्ये पुनर्नियुक्त माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेतल्या. राज्य संघटने कडून जुनी पेन्शन योजना, आश्र्वासित प्रगती योजना, पाल्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश व फी माफी तसेच इतर महत्वाच्या मुद्यांवर सुरू असलेल्या कार्यवाही बाबत विस्तृत माहिती देण्यात आली तसेच संघटनेच्या मजबुतीकरणासाठी जिल्ह्यातील सर्व पुनर नियुक्त माजी सैनिकांना भविष्यातील व सद्यस्थितीतील आपल्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्वतः संघटनेत सामील होऊन आजिवन सदस्यत्व घेण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी संघटनेद्वारे रक्तदान शिबिर, सायकल अभियान, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम अशा सामाजिक उपक्रमात संघटनेच्या सहभागाची माहिती देण्यात आली व भविष्यात देखील अशा सर्व सामाजिक कार्यात सहभागी होण्याची तसेच युवकांना सेनेमध्ये भरती होण्यासाठी निशुल्क मार्गदर्शन व सहकार्याची संघटनेची भूमिका ठाम असल्याचे नमूद करण्यात आले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री सोमनिंग बिराजदार सचिव श्री संतोष तावडे उपाध्यक्ष श्री संदेश पाटील, कोषाध्यक्ष श्री महेश सप्रे व इतर मान्यवर उपस्थित होते. आजच्या सभेमध्ये ०५ सदस्यांनी आजीवन सभासदत्व घेतले. रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जाऊन तेथील पूनर्नियुक्त माजी सैनिक तसेच माजी सैनिकांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना संघटने विषयी माहिती देऊन संघटनेत सहभागी करून घेणार असल्याचे सांगितले.
माजी सैनिकांना संघटनेची माहिती व्हावी यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालया समोर संघटनेचा फलक लावून त्याचे अनावरण श्री दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.सभा श्री दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेची प्रस्तावना सचिव श्री संतोष तावडे यांनी केली तसेच आभार प्रदर्शना मध्ये सर्व उपस्थितांचे व मान्यवरांचे व विशेषतः निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती पद्मश्री बैनाडे यांचे व जिल्हा प्रशासनाचे राजस्व सभागृह उपलब्ध करून दिल्या बद्दल आभार मानले.
संघटना वाढीसाठी तालुका भेटीचा आराखडा लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असून त्या वेळी सर्व माजी सैनिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. पुनर्नियुक्त माजी सैनिक ९७६४६७४७७७ या क्रमांकावर अधिक माहिती साठी फोन करू शकतात.








Be First to Comment