ज्ञान दानाचे कार्य करणे हि खरोखर वाखाण्यासारखी : आमदार महेंद्र दळवी यांचे प्रतिपादन
सिटी बेल • अलिबाग • अमूलकुमार जैन •
एखादी शाळा निर्माण करून ती वाढवणे व तिची प्रतिमा जपून ज्ञान दानाचे कार्य करणे हि खरोखर वाखाण्यासारखी बाब आहे.शाळा चालवणे हि सर्वात कठीण बाब आहे.म्हणजेच हि तारेवरची कसरत असून संस्थाचालकांचे ते कौशल्य सुद्धा आहे.कोरोना कालावधीत शाळा बंद होत्या अश्यावेळी खाजगी शाळांना खूप समस्यांना तोंड द्यावे लागले आहे.अश्या प्रतिकूल परिस्थितीवर सुद्धा मात करून शाळा ज्ञान दानाचे कार्य करतात हि अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपदान अलिबाग मुरुड विधानसभा क्षेत्राचे आमदार महेंद्र दळवी यांनी केले आहे.
तेलवडे येथे इंग्रजी माध्यम डकलिंग्ज इंटरनॅशनल स्कूल चे उद्धघाटन आमदार अनिकेत तटकरे यांच्या शुभ हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी आमदार महेंद्र दळवी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आमदार अनिकेत तटकरे,मुरुड तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दिलावर महाडकर,डकलिंग्ज इंटरनॅशनल स्कूल चे सचिव सुशीलकुमार शिंदे,तेलवडे सरपंच प्रमोद तांबडकर,माजी नगरसेवक संजय गुंजाळ,नांदगाव येथील सहजीवन विद्या मंडळाचे अध्यक्ष फैरोज घलटे,रोह्याचे माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे,नगरसेवक समीर सकपाळ,माजी नगरसेवक संदीप पाटील,मुख्याध्यापिका श्रध्दा लाड, हसमुख जैन,समीर दौनाक,भरत बेलोसे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार दळवी यांनी सांगितले कि, महाराष्ट्रात अनेक शैक्षणिक संस्था आहेत.यातून ज्ञान दानाचे बहुमूल्य कार्य सुरु आहे.दिलावर महाडिक व सचिव सुशीलकुमार शिंदे यांनी अथक परिश्रम घेऊन सदरची इंग्रजी माध्यम शाळा काढून मुरुड तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये मोलाचे सहकार्य केले आहे.शाळेने ज्या प्रमाणे नवीन इमारत बांधली त्याच प्रमाणे मुलांच्या सुरक्षितेसाठी सीसीटीव्ही सुद्धा बसवावेत अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे.शासनाकडून व माझ्या कडून सदरील शाळेस यथोचित मदत करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार अनिकेत तटकरे मुरुड सारख्या परिसरात इंटरनॅशनल स्कूल होणे हे धाडसाचे पाऊल आहे.डकलिंग्ज इंटरनॅशनल स्कूल मधून मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे त्यांच्या प्रगतीत या शाळेचा मोठा सहभाग असावा अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.शासनाकडून लागणाऱ्या सर्व परवानग्या त्याच प्रमाणे शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशीलराहणार असल्याचे प्रतिपादन यावेळी अनिकेत तटकरे यांनी केले.
सचिव सुशीलकुमार शिंदे यांनी शैक्षणिक कार्यासाठी स्थानिक सरपंच व सर्व पदाधिकारी यांनी बहुमूल्य सहकार्य केल्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका श्रध्दा लाड यांनी केले.सदरच्या कार्यक्र्मसाठी असंख्य पालक व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.








Be First to Comment