Press "Enter" to skip to content

जागतिक क्षयरोग (टीबी) दिवस

भारतात लॉकडाऊन आणि लॉकडाऊन नंतर क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये झाली वाढ

सिटी बेल • आरोग्य प्रतिनिधी •

क्षयरोग हा जगातील सर्वात प्राणघातक संसर्गजन्यरोगांपैकी एक आहे. जगामध्ये दररोज, सुमारे चार हजार लोक क्षयरोगाने आपला जीव गमावतात आणि जवळपास २८ हजार नागरिकांना क्षयरोगाचा संसर्ग होतो. दरवर्षी, २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग (टीबी) दिन साजरा करतो, ज्यामुळे क्षयरोगामुळे आरोग्य, सामाजिक आणि आर्थिक विनाशकारी परिणामांबद्दल जनजागृती केली जाते आणि जागतिक क्षयरोगाची साथ संपवण्याचे प्रयत्न केले जातात.

गेल्या २० वर्षात विविध जागतिक प्रयत्नांमुळे अंदाजे ६३ दशलक्ष नागरिकांचे जीव वाचले आहेत. कोव्हीड-१९ या जीवघेण्या संसर्गजन्य आजारानंतर क्षयरोग (टीबी) हा दुसरा सर्वात प्राणघातक संसर्गजन्य आजार सिद्ध झाला आहे. क्षयरोग हा आजार मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस जिवाणूमुळे होतो जो फुफ्फुसांवर आघात करतो. दरवर्षी चार लाख नागरिकांचा जीव घेणारा टीबी आजही भारतीयांचा कर्दनकाळ म्हणून ओळखला जातो. परंतु, वेळेवर निदान आणि औषधोपचारांनी यावर आपण मात करू शकतो.

जागतिक क्षयरोग (टीबी) दिनानिमित्त घाटकोपर येथील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलमध्ये एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात क्षयरोग आणि छाती रोग विशेषज्ञ आणि श्वसनविकारतज्ञ डॉ. तन्वी भट्ट यांनी रोगप्रतिकारक शक्ती आणि क्षयरोगाच्या खबरदारी या विषयावर व्याख्यान दिले.

क्षयरोगाविषयी अधिक माहिती देताना झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलमधील श्वसनविकारतज्ञ डॉ. तन्वी भट्ट म्हणाल्या, “दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारा ताप, वजन कमी होणे, भूक न लागणे किंवा दीर्घकाळ खोकला अथवा जुलाब – हे आरोग्य स्थितीतील बदल आरोग्यतज्ञाकडून तपासून घेणे गरजेचे आहे, कारण जगातील २७% टीबी प्रकरणे भारतात आढळून येतात. जितका जास्त काळ क्षयरोग शरीरात राहतो तेवढे जास्त नुकसान शरीराचे होते त्यामुळे या रोगाचे निदान लवकरात लवकर केले पाहिजे. संसर्ग झाल्यानंतर व निदान होईपर्यतच्या मधल्या काळात क्षयरोगाचा रुग्ण खोकल्याच्या माध्यमातून अनेकांना संसर्ग करू शकतो. कुपोषण, एचआयव्ही संसर्ग, मद्यपान विकार, धूम्रपान आणि मधुमेह. हि पाच प्रमुख कारणे क्षयरोगाला कारणीभूत आहेत.

क्षयरोग टाळता येण्याजोगा आणि बरा करता येण्याजोगा आहे, क्षयरोगाचा आजार झालेल्या नागरिकात सुमारे ८५ % नागरिकांवर ६ महिन्यांच्या नियमित औषधाने यशस्वीपणे उपचार केले जाऊ शकतात; संक्रमणाचा पुढील प्रसार कमी करण्यासाठी नियमित उपचार करणे फार गरजेचे आहे कारण भारतात प्रति १ लक्ष लोकसंख्येमागे १९२ नागरिकांना क्षयरोगाची लागण होत असते.”

कोविड-19 आणि क्षयरोगाच्या सहसंबंधाचे स्पष्टीकरण देताना मुलुंड येथील अपेक्स हॉस्पिटलचे श्वसनविकार तज्ञ डॉ. प्रसाद पडवळ म्हणाले, “ अनेक प्रकरणांमध्ये, क्षयरोगाची व कोविड-१९ ची लक्षणेनागरिकांना गोंधळात टाकतात. लॉकडाऊन दरम्यान लोक हॉस्पिटलमध्ये प्रवेश करू शकत नव्हते, कारण बहुतेक हॉस्पिटल कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित झाले होते, त्यामुळे इतर आजार असलेल्या बहुतेक रुग्णांना स्वीकारले जात नव्हते किंवा त्यांच्यावर उपचार केले जात नव्हते.त्यामुळे गेल्या दोन वर्षांत क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली कोरोना संक्रमित नागरिकांची बदललेली प्रतिकारशक्ती, कोरोनामुळे होणारे फुफ्फुसाचे नुकसान, कोविड मुळे होणारा मानसिक ताणतणाव तसेच कोविड उपचारासाठी केलेला स्टिरॉइड्सचा वापर आणि रक्तातील साखरेचे नियंत्रण बिघडणे हे घटक क्षयरोगाची शक्यता वाढविण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत.

टीबीचे जंतू मुख्यतः हवेतून पसरतात. फुप्फुसाचा टीबी असलेला पेशंट जेव्हा खोकतो किंवा शिंकतो तेव्हा टीबीचे हे जंतू हवेत पसरतात व जवळचा निरोगी मनुष्य श्वास घेतो तेव्हा ते जंतू त्याच्या शरीरात प्रवेश करतात. रोगप्रतिकारक शक्तीचा अभाव असल्यास अशा मनुष्याला टीबीची बाधा लवकर होऊ शकते. क्षयरोगाचे दोन मुख्य भागांमध्ये वर्गीकरण करण्यात येते. एक म्हणजे फुप्फुसाचा क्षयरोग आणि फुप्फुसांव्यतिरिक्त इतर अवयवांत होणारा क्षयरोग जो ग्रंथीत, हाडांमध्ये, सांध्यांमध्ये, जनन व विसर्जन संस्थेमध्ये, मज्जासंस्था व आतड्यांमध्ये आढळतो परंतु याचे प्रमाण कमी असते. भारतामध्ये मुख्यतः फुप्फुसाचा क्षयरोग आढळतो.”

या वर्षी, जागतिक क्षयरोग दिनाची थीम “क्षयरोग संपवण्यासाठी गुंतवणूक करा. जीव वाचवा.” या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी आवश्यक असलेल्या गुंतवणूक आणि संसाधनांच्या गरजेवर थीम केंद्रित आहे. क्षयरोग ही भारतातील प्रमुख सार्वजनिक आरोग्य समस्यांपैकी एक आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या अंदाजानुसार, भारतामध्ये क्षयरोगाची महामारी अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. २०२० सालामध्ये मध्ये, जगभरातील टीबीच्या घटनांपैकी २६ % प्रकरणे भारतामध्ये होती.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.