भारतामध्ये डोक्याला दुखापत होऊन दरवर्षी एक लाखाहून अधिक नागरिकांचा बळी !! मेंदूच्या दुखापतीमुळे १० लाख नागरिक होतात कायमस्वरूपी जायबंदी
सिटी बेल • आरोग्य प्रतिनिधी •
गाडया वेगात हाकण्याची नशा अनेक तरुणांना असते, आता तर सोशल मीडियामध्ये लाईक्स व कंमेंट वाढविण्यासाठी अनेक तरुण तरुणी जीवघेणे स्टंट करत असतात मात्र त्या वेगाच्या नशेपायी हि तरुण मंडळी जीवाशी खेळ करतात याचं भान त्यांना राहत नाही. दुचाकी असो अथवा चारचाकी असो अपघात झाल्यावर ९० टक्के नागरिकांना डोक्याला दुखापत होते. उंचावरून जोरात खाली पडणे, डोक्यावर जोरदार आघात करणारी वस्तू पडणे, नैसर्गिक आपत्तीमधील अपघात , बाथरूममध्ये पडून डोक्याला मार लागणे, दहीहंडीसारख्या खेळांमध्ये अपघात होणे व हाणामारीमध्ये डोक्याला जबरदस्त मार लागणे , दुचाकी अपघात, चालत्या रेल्वेतुन पडणे अशा अनेक कारणांनी डोक्याला दुखापत होत असते. या आघातांचा परिणाम मेंदूवर होत असतो. मेंदू हा डोक्यावरील कठीण आवरणाने बनवलेला असला तरीही डोक्यावर कोणतीही गोष्ट आदळण्याची तीव्रतेवर मेंदूला होणाऱ्या दुखापतीची तीव्रता अवलंबून असते.
२० मार्च हा जागतिक हेड इंज्युरी दिन साजरा केला जातो. या दिनानिमित्त भारतामध्ये अपघात टाळण्यासाठी अथवा अपघातामध्ये जखमी नागरिकांना समुपदेशन करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.

जागतिक हेड इंज्युरी दिनानिमित्त अधिक माहिती देताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरचे मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. आदित्य पाटील सांगतात, “वेगेवगळ्या कारणांनी डोक्याला झालेल्या इजेमुळे कोणते शारिरिक आघात होतात ते वेळीच ओळखायला हवेत, डोक्यावरील आवरणाला खोक पडणे, कवटीचे फ्रॅक्चर होणे, मेंदू आणि अंतस्तरातील ड्युरामॅटर द्रावात रक्त साकळणे तसेच मेंदूच्या आतमधील द्राव्यामध्ये रक्तस्त्राव होतो. मेंदूमध्ये एकाच ठिकाणी इजा झाली असेल तर तुलनेने ही व्याधी जलदरित्या सुधारते. मात्र जर मेंदूच्या आतील मज्जातंतूची इजा ही पसरलेली असेल तर शस्त्रक्रिया करूनही रुग्णाला पुर्ववत होण्यासाठी वेळ लागतो. उपचारानंतरही काही व्यंग यात राहतात. पक्षाघात, विस्मृती, बोलण्यात अडखळणे, दृष्टीदोष राहण्याच्या तक्रारी यात दिसून येतात. मेंदूवरील इलाज हे तातडीने होणे गरजेचे असते परंतु अनेकवेळा अपघातानंतर तत्काळ इलाज न मिळाल्यामुळे ७० टक्के नागरिकांचा मृत्यू होतो अथवा ते कायमचे जायबंदी होतात. बहुतेक हेड इंज्युरी जीवावर बेतते. आयुष्य अपंग करून टाकते. नाक, कान, डोळे या अवयवांची कार्य मंदावतं. म्हणजे गंधाची (वास) समज कमी होते. कानांनी ऐकू कमी येतं किंवा कायमचा बहिरेपणा येते. अनेकदा ‘हेड इंज्युरी’च्या अपघातात, अपघाती रुग्णाची मान सावरली जात नाही. प्रत्यक्षात मान सावरणं गरजेचं असतं. मानेतून मज्जारज्जू गेलेला असतो. मज्जारज्जूच्या माध्यमातून हाता-पायांच्या हालचालींचं नियंत्रण केलं जातं. हेड इंज्युरीच्या अपघातात रुग्णाची मान न सावरल्यास त्याला अर्धांगवायूचा झटका येतो. नाही तर हातपाय अधू होतात.”

घरात अथवा रस्त्यावर होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अपघातांमध्ये ‘हेड इंज्युरी’ अर्थात डोक्याला मार लागून रुग्णाच्या जीवावर बेतण्याच्या प्रमाणात विलक्षण वाढ होत आहे. अशा अपघातांमध्ये समाजात म्हणावी तितकी जागृती नाही. या अपघातामध्ये रुग्णाला हॉस्पिटलमध्ये आणताना सामान्य माणसांकडून नीट हाताळलं जातं नाही. ‘हेड इंज्युरी’च्या अपघातांचं प्रमाण कमी व्हावं, तसंच अपघातानंतर रुग्णाला वेळीच हॉस्पिटलमध्ये भरती केलं तर अपघाती मृत्यूंची संख्या कमी होईल.
आज भारतामध्ये रस्त्याच्या आधुनिकीकरणाचे काम वेगाने सुरु असले तरी आपल्या स्वतःच्या वाहनाचा वेग सांभाळणे हि आपली सर्वांची जबाबदारी आहे. वेगावर नियंत्रण आणले तरच हेड इंज्युरीच्या समस्येला कुठेतरी आळा बसेल असे मत तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरचे मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. आदित्य पाटील यांनी व्यक्त केले. इंडियन हेड इंज्युरी फाऊंडेशनच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये डोक्याला दुखापत होऊन दरवर्षी १ लाखाहून अधिक नागरिक मृत्युमुखी पडतात तसेच १० लाखाहून अधिक नागरिक कायमस्वरूपी जायबंदी होतात.








Be First to Comment