चाळीस डिग्री तापमानात पोटाचे व किडनीचे आजार बळावण्याची शक्यता वाढली
सिटी बेल • आरोग्य प्रतिनिधी •
मार्च महिन्यातच तापमान ४० डिग्रीच्या आसपास पोहचले असून अजून एप्रिल व मे महिना बाकी आहे. तापमान वाढीमुळे शरीरातील पाणी कमी होते व आपणास तहान जास्त लागते, कामावर जाणाऱ्या तसेच ऑफिसच्या बाहेर कामे करणारे अनेक नागरिक , फेरीवाले, टेम्पो, रिक्षा टॅक्सी चालविणारे अनेकजण उन्हाळ्याच्या कालावधीत रस्त्यावर उपलब्ध असलेल्या फेरीवाल्यांकडील लिंबू सरबत, इतर फळांचे ज्यूस व शीतपेये विकत घेतात व पोटाच्या आजाराला निमंत्रण देतात. चाळीस डिग्री तापमानात चाळीसहुन अधिक प्रकारचे आजार बळावण्याची शक्यता वाढण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.
याविषयी अधिक माहिती देताना नेरुळ येथील शुश्रूषा हार्ट केयर व स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदय शल्यविशारद डॉ. संजय तारळेकर म्हणाले, , ” मार्च ते मे महिन्याच्या कालावधीत नागरिकांच्या पोटांच्या विकारात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ होते. उष्णता दिवसेंदिवस वाढत असून लोकांना डिहायड्रेशनची समस्या, घसा कोरडा पडणे, मळमळ होणे, डायरिया, अपचन, असे आजार होऊ शकतात. आपल्या शरीरातही विशिष्ट प्रकारचे जंतू असतात. त्यांना संधिसाधू जंतू म्हणता येईल. अनेकदा घशात किंवा पोटामध्ये आतडय़ात हे जंतू असतात. संधी मिळाल्यावर हे जंतू डोके वर काढतात. अतिश्रम, उन्हात अधिक वेळ फिरणे, अस्वच्छ अन्नपदार्थ खाणे, अशुद्ध पाणी पिणे आदी अनेक कारणांचा हे संधिसाधू जंतू फायदा घेतात आणि जुलाबाला व पोटातील समस्यांना आयतेच निमंत्रण मिळते.
सध्या तापमानात झालेल्या वाढीमुळे सतत घाम येतो. त्यातच खाद्यपदार्थ तयार होत असलेल्या भट्टीशेजारी काम करणाऱ्या आचाऱ्यांची स्थिती अधिक वाईट असते त्यांना येणाऱ्या सततच्या घामामुळे जीवाणूंचा संसंर्ग वाढण्याचा धोका असतो अन्न शिजवताना, वाढताना हातमोजे (ग्लोव्ह्ज ) घालणे फार महत्वाचे आहे. डोसा, पावभाजी, चहा असे पदार्थ गरम असल्याने त्यातून संसर्ग कमी होतो परंतु मात्र सॅण्डविच, भेळपुरी-शेवपुरी- चायनीज , फ्रॅंकी अशा पदार्था साठी कांदे, टोमॅटो कोथींबीर तसेच ज्यूस बनविण्यासाठी लागणारी फळे खूप आधीपासून चिरलेले असण्याची शक्यता असल्याने त्यातून ई-कोलाय, कॉलीफॉर्म, स्टॅफिलोकोकस ऑरिअस अशा हगवण व जुलाबाला कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंचा संसर्ग होत असतो. सहज उपलब्ध होणारी रस्त्यावरील लिंबू पाणी, ताक, फळांचे ज्यूस, आणि इतर ड्रिंक्ससुद्धा पोटांच्या विकाराला कारणीभूत ठरत आहेत.”
उन्हाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता कमी होते व कोरडेपणा वाढतो. त्यामुळे आपल्या शरीरातून घाम येण्याचं प्रमाण वाढतं व शरीरातील पाणी पातळी कमी होते. पाण्याचा समतोल ठेवण्याची जबाबदारी किडनीवर असल्याने त्याचा विपरित परिणाम सर्वसाधारण किडनीवर होत असतो. मूत्रपिंड विकाराची कारणे बरीच आहेत परंतु सर्वांत महत्वाचे कारण लघवीचे प्रमाण कमी होते. लघवीचे प्रमाण कमी झाल्यामुळे रक्तदाब वाढतो. शरीरात पाणी व क्षारांचे प्रमाण वाढल्याने सर्वत्र सूज येते. डायबेटीस, उच्चरक्तदाब असलेल्या नागरिकांच्या या काळात मूत्रपिंडांना संसर्ग होण्याचे प्रमाण दुपटीने वाढण्याची शक्यता असते अशी माहिती हृदय शल्यविशारद डॉ. संजय तारळेकर यांनी दिली.








Be First to Comment