Press "Enter" to skip to content

काँग्रेस कार्यकर्त्यांकडून काम बंद करण्याचा प्रयत्न

पोलादपूर येथे पूर्वेकडील सर्व्हिस रोड ढासळतोय

सिटी बेल • पोलादपूर • शैलेश पालकर •

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील पोलादपूर शहरातील एसटी स्थानक परिसराबाहेरील पूर्वेकडील सर्व्हिसरोड ढासळत असल्याने दुहेरी वाहतूक करणे नजिकच्या काळात धोकादायक ठरणार असल्याने काँग्रेस पदाधिकारी व नगरसेवकांनी यावेळी अंडरपासमधील काम बंद करण्याचा प्रयत्न केला. काही काळ एलऍण्डटी कंपनीने काम थांबविल्यानंतर हे पदाधिकारी निघून गेले.

पोलादपूर एस.टी.स्थानकातील सांडपाण्याच्या निचऱ्यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेमध्ये श्रेयवाद झाला होता. यावेळी स्थानकाबाहेरील सांडपाणी असलेले मोठे डबके एलऍण्डटी कंपनीने बुजविले होते. याच जागेवर सध्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची वाहतुक करणारा पूर्वेकडील सर्व्हिसरोड असून या सर्व्हिसरोडवरून दुहेरी वाहतूक होत आहे. पोलादपूर एस.टी.स्थानकाबाहेर पडण्याच्या ठिकाणी सांडपाण्याचे डबके बुजविल्यानंतर सर्व्हिसरोडखालील लालमाती कमकुवत झाली असून सध्या केवळ पूर्वेकडील रस्त्यावरून अवजड वाहने जात असल्याने रत्नागिरी गोव्याच्याबाजूने येणाऱ्या वाहनांसाठी धोका निर्माण झाला आहे.

मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पूर्वेकडील सर्व्हिसरोड अंडरपासमधून भविष्यात जाणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात लालमातीचे ढिगारे मोठया प्रमाणात ढासळू लागले. यामुळे या सर्व्हिसरोडवरून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक झाले असून अंडरपासच्या खंदकात लालमातीचे ढिगारे कोसळल्याच्या ठिकाणी सर्व्हिसरोडला तडे पडून डांबरी रस्ता व त्याखालील लाल मातीचे ढिगारे केव्हाही कोसळू शकतील अशी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. यावेळी काँग्रेसचे शहरअध्यक्ष अमोल भुवड, नगरपंचायतीचे विरोधीगटनेते दिलीप भागवत, नगरसेवक स्वप्नील भुवड, सचिन गायकवाड, अभिषेक गरूड, सचिन दुदुस्कर आदी कार्यकर्ते व पदाधिकारी कोसळणाऱ्या सर्व्हिसरोडच्या ठिकाणी जमून आतील काम बंद करून कोसळणाऱ्या सर्व्हिसरोडवर तातडीने उपाययोजना करून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांसाठी सुरक्षित प्रवास होईल, यासाठी प्राधान्य देण्याची मागणी केली. यावेळी एलऍण्डटीच्या अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या अचानक झालेल्या आंदोलनामुळे काही काळ काम थांबविले असून यानंतर काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी ढासळणाऱ्या सर्व्हिसरोडपासून दूर निघून गेले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.