आशा सेविका आणि अंगणवाडी ताईंचा सन्मान
कारकिर्दीतील केवळ सहा दिवस राहिल्याने आशा दिनानिमित्त शुभेच्छा देण्यास आवर्जून आलो : चंद्रकांत कळंबे यांचे भावनोद्गार
सिटी बेल • पोलादपूर • शैलेश पालकर •
कोविडसारख्या संकटाच्या काळात घरदाराची पर्वा न करता पोलादपूर तालुक्यातील आशा सेविका आणि अंगणवाडी ताईंनी केलेली आरोग्यसेवा निश्चितच कौतुकास्पद असून दरवर्षी निमंत्रण मिळाल्यानंतर भेटण्याची इच्छा असूनही कामांमुळे शक्य झाले नाही. मात्र, आता कारकिर्दीतील केवळ सहा दिवस शिल्लक राहिल्याने आशा दिनानिमित्त आशाताईंना शुभेच्छा द्यायला व त्यांचे अभिनंदन करण्यास आवर्जून आलो, असे भावनिक उदगार राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी व्यासपिठावर सेवानिवृत्त तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गुलाबराव सोनावणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन बावडेकर, तालुका पर्यवेक्षक जितेंद्र अहिरराव, संचिता तांबे व पी.एल.पाटील, रूपाली लिंगायत, गितांजली लकोळे, लक्ष्मण जाधव, सचिन कदम आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
याप्रसंगी आशासेविकांच्या रांगोळी स्पर्धा आणि वत्तृफ्त्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी जागतिक क्षयरोग दिन येत्या 24 मार्चरोजी असल्याने संयुक्त कार्यक्रम करण्यात आला. यावेळी तालुका पर्यवेक्षक जितेंद्र अहिरराव यांनी आशा सेविकांना क्षयरूग्ण शोधून त्याची नोंद तातडीने करण्यासंदर्भात सामुदायिक शपथ दिली. रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी रांगोळी स्पर्धेतील कलाकृतींचे अवलोकन करून कौतुक केले. यावेळी नम्रता विश्वनाथ चव्हाण , हर्षदा हरिश्चंद्र भिलारे व रेश्मा कोंडीराम जाधव यांच्या रांगोळी कलाकृती पहिल्या तीन क्रमांकांच्या मानकरी ठरल्या. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या वत्तृफ्त्व स्पर्धेमध्ये संगिता मोरे कोंढवी या आशासेविका सर्वप्रथम आल्या तर द्वितीय क्रमांक हर्षदा भिलारे व प्राजक्ता मोहिते यांना विभागून देण्यात आला. तिसऱ्या क्रमांकाच्या मानकरी अनिता रमेश मोरे ठरल्या.
दरवर्षीप्रमाणे आशासेविकांच्या या सरकारी कार्यक्रमामध्ये निमंत्रित करण्यात येणारे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष शैलेश पालकर यांनी आवर्जून शुभेच्छा दिल्या.








Be First to Comment