पोलादपूर शहरात माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा पथनाटयातून झाला जागर
योजनांची माहिती पोहोचण्यासाठी पथनाटय उपयुक्त : तहसिलदार दिप्ती देसाई
सिटी बेल • पोलादपूर • शैलेश पालकर •
महाराष्ट्र शासनाने गेल्या दोन वर्षांच्या काळात जनकल्याणासाठी ज्या अनेक योजनांचा प्रभावीपणे अंमल करून जनतेला दिलासा देण्यासह विकासालाही चालना देण्याचे काम केले आहे. या योजनाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पथनाटय उपयुक्त माध्यम असल्याचे मत पोलादपूर तहसिलदार दिप्ती देसाई यांनी केले.
याप्रसंगी रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यामधील खरसई येथील अरूणोदय सुशिक्षित बेरोजगार संस्था मर्यादितच्या कार्यकर्त्यांनी पोलादपूर शहरात सादर केलेल्या पथनाटयामुळे पोलादपूर शहरामध्ये महाआघाडी सरकारच्या कामांची जाणीव नागरिकांना झाली.
दि.9 ते 17 मार्च 2022 या कालावधीत रायगड जिल्ह्यात दररोज चार ठिकाणी रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप तसेच महाराष्ट्र राज्य माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत या पथनाटयाचे आयोजन करण्यात आले आहे. पोलादपूर शहरामध्ये महाआघाडी सरकारने सुरू केलेले शिक्षण, कोरोना मृतांच्या वारसांना मदत तसेच रोजगार योजनांची माहिती या पथनाटयाद्वारे देण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी राज्यसरकारच्या माहिती आणि जनसंपर्क खात्याच्या राज्यमंत्री रायगडच्या पालकमंत्री ना.अदिती तटकरे असून या खात्याचे कॅबिनेटमंत्रीपद राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांकडे असते. कोविड लॉकडाऊन काळामुळे जनतेला महाआघाडी सरकारकडून कोणत्या जनकल्याणकारी योजना राबविण्यात आल्या, याबाबत माहिती देण्यासाठी अरूणोदय सुशिक्षित बेरोजगार संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सादर केलेल्या प्रयोगसिध्द कलाविष्कारामुळे जनतेचे लक्ष वेधले गेल्याचे मत मांडले.
यावेळी नायब तहसिलदार समीर देसाई, मंडल अधिकारी मुंडेकर, ज्येष्ठ अधिस्विकृतीप्राप्त पत्रकार शैलेश पालकर तसेच स्थानिक नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते. यावेळी पोलादपूर एस.टी. बसस्थानकामध्ये वाहतूक नियंत्रक राजन सुतार हेदेखील उपस्थित होते. बाजारपेठेतील गांधी चौकामध्ये नागरिक तसेच व्यापारी वर्गाने हे पथनाटय पाहण्यासाठी गर्दी केली होती.








Be First to Comment